Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी असे जरी आमुची मायबोली

- सूर्यकांत कुलकर्णी

Webdunia
मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली.      
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे?

मातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत.

ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.

आर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.

गेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते.

  प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो.      
भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.

शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते?

महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे.

महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे.

  आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील.      
मराठी भाषा व मराठी माणूस यांना केन्द्रीभूत धरून या समाजाच्या घटकांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय, शैक्षणिक इ. दृष्ट्रीकोनातून स्वतंत्र वेगवेगळ्या पातळींवर शास्त्रीय पाहणी करून त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष काय निघतात ते पाहणे मोठे उदबोधक ठरेल हे निश्चित. अशा निष्कर्षांवरून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने व्हायला हवी हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे काम हाती घ्यायला हरकत नाही.

मराठी भाषा व भाषिकांच्या समस्या महाराष्ट्रापुरत्या वेगळ्या, तर महाराष्ट्राबाहेर भारतात म्हणजे बृहन्महाराष्ट्रात वेगळ्या, तसेच भारताबाहेर परदेशात आणखीन वेगळ्या आहेत. मराठी भाषा व संस्कृतीची पाळेमुळे महाराष्ट्रात असल्यामुळे तेथे खतपाणी जितके जास्त मिळेल तितकी त्याची फळे सुमधुर चाखायला मिळतील. राज्यकर्ते मराठी असल्याने या बाबतीतले नीतीनियम हवे तसे योग्य तर्‍हेने ठरविणे कठीण नाही.

बृहन्महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा तर इतर प्रांतात मराठी व मराठीपण टिकविण्यासाठी हजाराहून अधिक संस्था धडपडत आहेत. त्यांची माहिती ''बृहन्महाराष्ट्र परिचय सूची'' या पुस्तकात अलिकडेच प्रसिध्द झाली आहे. बृहन्महाराष्ट्रात मराठी शिक्षणाच्या संस्था हळूहळू कमी होत आहेत. संस्थाचालक मराठी असले तरी मराठी शिक्षणाची तेथील लोकांना गरज वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी विद्यार्थी नाहीत अशी अवस्था आहे. इतर 'महाराष्ट्र मंडळ' किंवा 'समाज' नावाच्या संस्था आहेत. त्या आर्थिक दृष्ट्या तितक्या सबळ नाहीत. (अपवाद सोडून). तेव्हा महाराष्ट्र शासनाने व तेथील जनसामान्यांनी आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील. याबाबतीत महाराष्ट्राचा दूरदर्शीपणा कमी पडू नये.

भारताबाहेरचा मराठी समाज हा मुख्यत: धनिक वर्ग आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनार्थ कार्य करणे त्यांना सुलभ जाते. सर्व क्षेत्रातील मराठी श्रेष्ठ दिग्गज व्यक्तींना महाराष्ट्रातून आमंत्रित करून मराठीचा संपर्क कायम ठेवणे तेथे पैशाच्या पाठबळावर सोपे काम आहे. मराठीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ते भरपूर उपयोग करीत असतात. तिकडील मराठी संस्था व त्यांचे कार्यकर्ते मराठीच्या संवर्धनार्थ नेहमी प्रयत्नशील असतात. हे उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे.

मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक स्वत:च्या अभिमानाखातर टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली?

खरे तर सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यात निरनिराळ्या भाषांची वर्चस्वासाठी स्पर्धा टाळता येणार नाही. मराठीपुरते बोलायचे तर मराठीने आपली खिडक्यादारे दुसर्‍यांना आत शिरण्यासाठी सदैव खुली ठेवली. आपण त्यांची भाषा शिकलो ते त्यांच्या भाषेतील साहित्य आमच्या भाषेत आणण्यासाठी. हा उदारपणा एकतर्फी असता कामा नये हे भान मात्र आम्ही ठेवले नाही. महाराष्ट्राजवळ व मराठी साहित्यात असलेला अमोल ठेवा इतर भाषिकांनी घ्यावा यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न झाले असले तर ते नगण्यच.

तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी. सुरूवातीस शंभर उत्कृष्ठ मौल्यवान मराठी ग्रंथांची निवड करून त्यांचे रूपांतर, भाषांतर निदान बंगाली, उडीया, तेलगु, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराथी, असमी, हिंदी भाषांमध्ये करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. तसेच या भाषांमधून स्वतंत्र मासिक अथवा द्वैमासिक काढून त्यातून मराठीतील निवडक ललित व इतर साहित्याचे अनुवाद प्रसिध्द करायला हवे. अनुवादकांची साखळी निर्माण करून यासाठी लागणारा खर्च व विक्री यंत्रणा उभी करायला हवी.

  मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी.      
निरनिराळ्या प्रांतातील मराठी भाषिक संस्थांनी या उपक्रमास हातभार लावायला हवा. आम्ही आता एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, इ-मेल इ. सुविधा प्राप्त झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व जग एकमेकापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. या साधनांचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार प्रसारार्थ करायला हवा. दूरचित्रवाणीवर आता काही मराठी वाहिनी उपलब्ध झाल्याने मराठी कार्यक्रम बघण्याची सोय झाली आहे. परंतु मराठी वाहिनी किंवा रेडिओचे मराठी कार्यक्रम ज्या प्रमाणात संपूर्ण देशभर जायला पाहिजेत त्या प्रमाणात जात नाहीत ही दूरवरची खंत आहे. वाहिनी वितरक व केबलवाल्यांच्या मर्जीवर बर्‍याच जणांना अवलंबून राहवे लागते. यातून काही मार्ग काढायला हवा. ध्वनीफीतींद्वारे मराठी संगीत घरोघरी ऐकण्यास खूपच मदत झाली. पुढील पिढ्यापर्यंत मराठी मातृभाषेचे प्रेम टिकून राहावे व वृध्दिंगत व्हावे यासाठी आजच्या पिढीने दूरदृष्टीने ही वाटचाल मार्गी लावणे फार आवश्यक आहे.

मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जागतिक परिषद, साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ इ. सारख्या मराठीसाठी झटणार्‍या देशपरदेशातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केल्यास समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 'मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उपदेशाचे पालन करून मायमराठीचे ऋण फेडल्यासारखे होईल. जय मराठी!

( महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या 'मालविका' या स्मरणिकेतून साभार)
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments