राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती काही केल्या थांबत नाहीये. अनेक विद्यमान आमदार पक्ष सोडून महायुतीत सहभाग नोंदवत आहेत. आता बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. याची घोषणाही सोपल यांनी केली आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेकडे विरोधी पक्षातील नेत्यांची इनकमिंग वाढले आहे. लोकसभेच्या तोंडावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन भाजपाने काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला, त्यानंतर आलेल्या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपा शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढली, राष्ट्रवादीला तर पश्चिम महाराष्ट्रातच हादरे बसू लागले आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे मोठे नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. सोमवारी बार्शीत स्वतःच्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार सोपल यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सोपल यांनी दिली.