Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संक्राचीचा उत्सव हा स्नेहबंधनाचा

वेबदुनिया
संक्रांत हा परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. हा स्नेहभाव तिळातिळाने वाढत जावा आणि त्यातील गोडी गुळाप्रमाणे टिकून राहावी हाच तर या सणामागील मुख्य उद्देश. अलीकडे कमालीच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री वागण्याकडील कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तर संक्रांतीचे महत्त्व विशेषत्वाने समोर येते. त्यामुळे आपापसातील बंधुभाव, प्रेम वाढवणारा हा सण प्रत्येकाने आनंदाने, उत्साहाने साजरा करायला हवा.नववर्षाचे उत्साहात आणि आनंदात स्वागत करताना काही नवे संकल्प ऊराशी बाळगले जातात. त्यात इतरांविषयी स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा विचार अनेकांच्या मनात असतो. तो प्रत्यक्ष आणण्यासाठी संक्रांतीसारखा सुमुहूर्त तो कोणता? नव्या वर्षाच्या सुरुवातीस हा सण येण्यामागेही असाच उद्देश असू असतो. जीवनाच्या वाटचालीत कुटुंबीयांप्रमाणेच स्नेही, मित्र-मैत्रिणी, नातलग, परिचित, हितचिंतक यांची साथ मोलाची ठरते. पुढे नवनव्या ओळखीतून हे विश्‍व विस्तारत राहते; परंतु आपल्याकडून कधी तरी, कोणी तरी कळत नकळत दुखावले जाण्याचीही शक्यता असते. काही वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल अकारण गैरसमजही निर्माण होतात. यातील कोणत्याही एका कारणाने परस्परसंबंधात, नात्यात कटूता येते. ती संपवण्याची उत्तम संधी संक्रांतीच्या रूपाने लाभते. हा परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण. हा स्नेहभाव तिळातिळाने वाढत जावा आणि त्यातील गोडी गुळाप्रमाणे टिकून राहावी हाच तर या सणामागील मुख्य उद्देश. अलीकडे कमालीच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री वागण्याकडील कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत तर संक्रांतीचे महत्त्व विशेषत्वाने समोर येते. त्यामुळे आपापसातील बंधुभाव, प्रेम वाढवणारा हा सण प्रत्येकाने आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा.

 
WD
या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. मुख्यत्वे स्वरात गोडवा असेल तरच गाणे गोड होते. या न्यायाने स्वभावात गोडवा असेल तर वाणी मधूर आणि लाघवी होते हे लक्षात घ्यायला हवे. भावनेत गोडवा असेल तर शब्दांचे फटकारेही गोड वाटतात. गोडवा स्वयंभू आहे. ते कुठलेही संस्कार न झालेले दैवी वरदान आहे. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वातच कमालीचा गोडवा असतो. त्याचे अस्तित्वही वातावरणात उत्साह निर्माण करणारे ठरते. गोडवा मधासारखा आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याचे माधुर्य चाखत राहिले तरी फरक पडत नाही. अर्थात, काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार गोडी कमी-जास्त होते. पण त्यातील गोडवा आहे तसाच राहतो. संक्रांतीला तीळगुळाचे विशेष महत्त्व असण्यामागे आणखीही कारणे आहेत. या दिवसात शिशिर-पौषातील कडक थंडीमुळे शरीर रुक्ष झालेले असते. शरीरातील रक्तप्रवाहदेखील गारठय़ाने प्रभावित झालेला असतो. रक्ताभिसरण मंद झालेले असते. अशा वेळी स्निग्ध आणि उष्ण असे तीळ आणि मधूर तसेच उष्ण असा गूळ यांच्या मिश्रणाने तयार केलेला लाडू अमृताप्रमाणे काम करतो. आपल्या संस्कृतीत निसर्गाची आणि सणाची किती कुशलतेने सांगड घातली आहे, हे पाहून नवल वाटल्याशिवाय राहात नाही. ऋतूमानानुसार वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते. त्यावर गुणकारी ठरणारी औषधी वनस्पती, फळे वगैरे निसर्ग त्या ऋतूत निर्माण करतो. सणावारांच्या माध्यमातून हे सृष्टीतील नैसर्गिक रोगप्रतिकारक खाद्य आपसूकच माणसाच्या पोटात जाते. त्यादृष्टीने विचार करायचा तर थंडीच्या दिवसात शुष्क झालेल्या शरीरासाठी स्निग्ध तीळ आणि मधुर गुळाशिवाय दुसरे आणखी कोणते योग्य औषध असू शकते, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. निसर्ग आणि माणसाचे अतूट नातेही या सणाच्या निमित्ताने पहायला मिळते.

 
WD

या कालावधीत शेतात हिरवीगार पिके डोलत असतात. त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याचाही उद्देश या सणामागे आहे. वेळी अमावस्येच्या निमित्ताने शेतातील धान्याची पूजा केली जाते. या दिवशी कुटुंबीय, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रपरिवार यांच्यासह शेतात भोजन करण्याची प्रथा आहे. या दिवसात गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, बोरे ही पिके ऐन भरात असतात. साहजिक त्यांचा या सणासाठी आवर्जून वापर केला जातो. त्यातून एक प्रकारे या पिकांची पूजा होते आणि काळय़ा आईचे ऋणही व्यक्त केले जाते. संक्रांतीच्या दिवशी महिला पाच घट (सुगड), दोन वेळण्या, पाच बोळकी आणून त्यास हळदी कुंकू लावतात. त्यामध्ये सुपारी, तीळ, गहू, कापूस, ऊस, बोरे, भुईमुगाच्या शेंगा, हळकुंड, पैसे घालून वायन म्हणून दान देतात. त्याचबरोबर हळदी कुंकवाच्या समारंभाच्या निमित्ताने मैत्रिणी, परिचित महिला यांना तिळाचे लाडू, तेल, कापूस, मीठ, जिरे, फणी आणि आरसा इत्यादी गोष्टी भेट म्हणून देतात. उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रयाग येथे नदी स्नानाच्या मोठय़ा उत्सवाचे आयोजन केले जाते. संक्रांत हा स्नेहबंधनाचा उत्सव आहे. त्याचबरोबर हा सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचाही सण आहे. त्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.

 
WD

आणखी एक बाब म्हणजे एरवी निषिद्ध असलेला काळा रंग संक्रांतीच्या वेळी मात्र शुभ मानला जातो. माणसाचे जीवन हे अंध:कार आणि प्रकाशाने युक्त असते. जीवनात क्षणोक्षणी प्रकाशाच्या दिशेने आपली वाटचाल असली तरी वाटेत येणारा अंध:कार हा स्वीकारावा लागतो. 'तमसो मा ज्योतिर्गमय' ही अंधारातून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची प्रार्थना मकर संक्रांतीच्या दिवशी म्हटली जाते. संसारात वेळी-अवेळी येणार्‍या संकटांच्या काळय़ाकुट्ट अंधाराची सवय असण्यासाठी, त्यावर विजय मिळवण्यासाठी या काळय़ा रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी मान मिळाला आहे. संकटापासून, शत्रूपासून पळ काढण्यासाठी नाही तर त्यावर मात करण्यासाठी काळय़ा रंगाला स्वीकारण्याची ही प्रतिकात्मक योजना आहे. या दिवशी आवर्जून काळय़ा वस्त्रांची खरेदी केली जाते. एरवी काळे वस्त्र कोणत्याही प्रसंगी दान करणे निषिद्ध समजतात; परंतु संक्रांतीला मुद्दाम काळे वस्त्र दान केले जाते. जीवनातील काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा, संक्रमण करण्याचा संदेश हा काळा रंग आपल्याला देत असतो.

 
WD
उत्सवांमुळे एका सुसत्र विचारांचा प्रवाह समाजात संक्रमित होत असला तरी आजची परिस्थिती बघता प्रत्येक सणाला मौज, मस्ती, सेलिब्रेशनचे वळण मिळालेले दिसून येते. पूर्वी आपल्या कुवतीनुसार, परंपरेनुसार सगळे आचार-विचार सांभाळून व्यक्तिगत स्वरूपात सण साजरे होत. पण आजकाल प्रत्येक सणाला सार्वजनिक स्वरुप देऊन त्यात भपका, पोषाखीपणा आणला जात आहे. प्रत्येक सणा-वारानिमित्त बाजारपेठेची गुंतवणूक प्रचंड वाढली आहे. संक्रांतीची शुभेच्छाकार्डही हल्ली प्रचलीत झाली आहेत. सार्वजनिक हळदी कुंकू करून त्या निमित्ताने अल्पोपहार, उंची वस्त्रप्रावरणे आणि दागिन्यांचे प्रदर्शन ही नित्याची बाब आहे. पण त्यामुळे संक्रांतीचा मूळ हेतू बाजूला तर राहात नाही ना किंवा काही चुकीच्या परंपरांचा पायंडा तर पडत नाही ना हे लक्षात घ्यायला हवे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments