संक्रांतीच्या पर्वात पतंग उडविणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी मानले जाते. संक्रांतीला पतंग उडविण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसले, तरी आरोग्याच्या कारणाने या दिवशी पतंग उडविणे चांगले मानले जाते.
भारतातील प्रमुख सणांमधील एक मानला गेलेला संक्रांतीचा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. तसे पाहायला गेल्यास अन्य सणांप्रमाणेच मकर संक्रांतीलासुद्धा काही परंपरांचे पालन केले जाते. परंतु या परंपरा आणि श्रद्धांमध्ये सर्वाधिक आकर्षित करून घेणारी गोष्ट म्हणजे पतंग उडविणे. मकर संक्रांतीच्या सणाला सर्वच वयोगटातील लोक जोशात आणि उत्साहात पतंग उडवितात. एवढेच नव्हे, तर अनेक ठिकाणी या दिवशी भव्य पतंग महोत्सवही आयोजित करण्यात येतो किंवा पतंग उडविण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. अशा स्पर्धांमधून संपूर्ण देशभरातून आलेले पतंगबाज स्पर्धक भाग घेतात. हे पतंगबाज वेगवेगळ्या डावपेचांचे प्रदर्शन घडवून स्वतःबरोबरच इतरांचेही मनोरंजन करतात. परंतु संक्रांतीच्या दिवशीच पतंग का उडविले जातात, हे ठाऊक आहे का? नसल्यास चला, त्याची माहिती करून घेऊया.
मकर संक्रांतीच्या पर्वात पतंग उडविणे आरोग्याच्या दृष्टीने विशेषलाभदायी मानले जाते. अर्थात, संक्रांतीला पतंग उडविण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसले, तरी आरोग्याच्या कारणाने या दिवशी पतंग उडविणे चांगले मानले जाते. सामान्यतः थंडीच्या दिवसांत लोक आपापल्या घरात पांघरूण घेऊन बसणेच अधिक पसंत करतात. परंतु उत्तरायण सुरू होण्याच्या दिवशी जर बराच काळ आपण उन्हात राहिलो, तर त्यामुळे शरीरातील अनेक आजार नाहीसे होतात. प्राप्त शास्त्रीय माहितीनुसार, उत्तरायणाच्या प्रारंभी सूर्याची उष्णता ही थंडीचा प्रकोप आणि थंडीमुळे होणारे आजार दूर करण्यासाठी सक्षम असते. या पार्श्वभूमीवर, लोक जेव्हा घराच्या छतावर जाऊन पतंग उडवतात, त्यावेळी सूर्याचे किरण एखाद्या औषधासारखे काम करीत राहतात. कदाचित त्यामुळेच संक्रांतीला पतंग उडविण्याचा दिवस मानले गेले असावे.
मकर संक्रांतीचे पर्व हे अत्यंत पुण्य पर्व मानले जाते. याच पर्वापासून शुभकार्यांची सुरुवात होते, असे मानले गेले आहे. कारण मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू करतो. त्यामुळे या दिवसाला शुभतेची सुरुवात मानले जाते आणि हे पर्व धूमधडाक्यात साजरे केले जाते. तसे पाहायला गेल्यास पतंग हाही शुभता, स्वातंत्र्य, आनंदाचेप्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वातंत्र्य दिनीही पतंग उडविले जातात. अगदी त्याचप्रमाणे घरात मांगल्याचे आगमन झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ संक्रांतीच्या वेळी पतंग उडविण्याची परंपरा आहे.
खरे तर पतंग आपल्यासोबत खूप आनंदाचे वातावरण घेऊन येतो. परंतु काही गोष्टींचे भान ठेवले नाही तर आनंदाचे रूपांतर कधी दुःखात होईल हे सांगता येत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी अनेक पातळ्यांवर घेतली जायला हवी. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे पतंग उडविण्यासाठी निवडलेले ठिकाण सुरक्षित आहे ना, याची खात्री करून घेतली पाहिजे. जर आपण छपरावर जाऊन पतंग उडविणार असू, तर सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विकला जात असलेला चिनी मांजा बिलकूल आणू नये. त्याचप्रमाणे मांजाची धार तीक्ष्ण करण्यासाठी त्याला कुटलेली काचही लावू नये. कारण अशा प्रकारचा मांजा जीवघेणा ठरू शकतो. पतंग उडविताना सनस्क्रीन आणि गॉगलचा वापर करावा. ऊन तीव्र असेल तर पतंग उडविणे टाळावे. पतंगाच्या दोरीमुळे हाताला दुखापत होऊ नये यासाठी पतंग उडविताना ग्लोव्हजपरिधान करणे चांगले. पतंग उडविताना जर तो फाटला तर तो थेट कचरापेटीत गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी.