मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं, मराठा समाजातल्या संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे असं भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, यांनी म्हटलंय. साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"शिवाजी महाराज यांनी कधीही जात-पात मानली नाही, मी स्वतःला कधीही मराठा म्हणून समजून घेतलं नाही. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाला, असे माझे वैयक्तिक मत आहे," असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, "जात-पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातीचं आरक्षण काढून घेऊ नका. आर्थिक स्तरावर केंद्र शासनाने व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे त्याचाही विचार व्हायला काय हरकत आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटना व कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारले तर कोणीही बोलत नाही. मला या विविध संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम दिसून आला आहे.