राज्य सरकारने मराठा आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी लॉकडाऊन वाढवला असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारच्या निषेधार्थ आज (16 मे) बीडमधून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात होणार होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्याने 5 जून रोजी भव्य आंदोलनाचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.18 तारखेला प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा देणारे पत्र देण्यात येणार आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"त्या दिवशी मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही. या मोर्चाच्या नियोजनासाठी प्रत्येक गावात कोरोनाचे नियम पाळून घोंगडी बैठका घेण्यात येणार आहेत. या मोर्चात मराठासह धनगर, ब्राह्मण, लिंगायत, मुस्लीम समाजाचे लोकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून यात सर्वजण सहभागी होणार आहे," असंही विनायक मेटे म्हणाले.