Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पांढर्‍यावरचं काळं

अभिनय कुलकर्णी
ब्लॉग लिहिणार्‍याच्या भावनांची अभिव्यक्ती करणारे व्यासपीठ असले तरी त्यातून अनेकदा इतरांनाही पुष्कळ काही मिळतेसुद्धा. अशा ब्लॉगची मराठीत कमी नाही. इंटरनेटवर मुशाफिरी करताना असे ब्लॉग्ज टाळून चालत नाही. आता ' पांढर्‍यावरचं काळं' हाच ब्लॉग घ्या. वाचताना आपल्याला नविन काही सापडत जातं. बाहेर पडताना आपण समृद्ध होऊन बाहेर पडतोय याचा आनंद होतो.

अर्चना हा ब्लॉग लिहिते. तिच्याविषयी फारशी माहिती ब्लॉगवर नाही. ती स्वतः संस्कृत साहित्याची अभ्यासक आहे. शिवाय इतर भाषांविषयीसुद्धा तिला ममत्व आहे. म्हणूनच अनुवाद हा प्रकार तिच्या जास्त आवडीचा आहे. त्यामुळे ब्लॉगचं स्वरूपही तशाच प्रकारचं आहे.

संस्कृत आवडीचाही विषय असल्याने संस्कृत अनुवादीत साहित्याची ब्लॉगवर रेलचेल आहे. भासाच्या स्वप्नवासवदत्तम नाटकाच्या सहा अंकांचा अतिशय सुंदर अनुवाद वाचायला मिळतो. भासाचे हे नाटक संस्कृत साहित्यातील अजरामर साहित्यापैकी एक आहे. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकात झोप दाखवता येत नाही. पण भासाने झोपेत पडणारं स्वप्न नाट्यरूपात दाखवलं. या नाटकाच्या अनुवादासह त्याची पार्श्वभूमी व एकूण या नाटकाच्या सौंदर्यस्थळांचं विवेचन करणारे लेखही वाचनीय आहेत. या लेखांची व अनुवादाची वाचनीयता त्याखाली दिलेल्या प्रतिसादातूनही दिसून येते. कालिदासाच्या उत्तुंग नाट्यप्रतिभेविषयी आदर असणार्‍या अर्चनाला भास मात्र त्याहून जास्त आवडतो. त्याविषयीचे तिचे विश्लेषण भास या लेखात येते. हा लेखही आवर्जून वाचावा असा आहे.

संस्कृत साहित्याविषयी लिहिताना तिने कटपयादि सूत्रांवर लिहिलेला लेख माहितीपूर्ण आहे. दैनंदिन व्यवहारात अनेकदा मोठ्या आकड्यांच्या संख्या लक्षात ठेवायला लागतात. त्या लक्षात ठेवण्यासाठी कटपयादि सूत्र अतिशय उपयुक्त ठरते. अंकांना अक्षरांमध्ये लक्षात ठेवण्याविषयीचा लेख ज्ञानात भर घालणारा आहे.

अर्चनाच्या अनुवाद शृंखलेतील आणखी एक मोती म्हणजे गुरूवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या ' द क्रिसेंट मून' या काव्याचा मराठी भावानुवाद. चर्चगेटला फिरत असताना अचानक अर्चनाच्या हाताला हे पुस्तक लागलं. त्यात रवींद्रनाथांच्या ४१ कविता आहेत. एका बैठकीत त्या वाचून काढल्यानंतर तिला त्याचा अनुवाद करावासा वाटला. हा अनुवादही सरस उतरला आहे. अर्चनाचं अनुवाद विश्व केवळ संस्कृत व इंग्रजी भाषेपुरतं मर्यादीत नाही. हिंदीतील चांगली गाणी, शेर यांचाही तिने छान अनुवाद केला आहे. वानगीदाखल घ्यायचे तर आनंद चित्रपटातल ी 'कहीं दूर जब दिन ढल जाये' या गाण्याचा तिने केलेला अनुवाद बघूया.
नभी दूर दिन मावळू लागे
सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे
मम मनाच्या गाभार्‍यात
कोण गे उजळे हे स्वप्नदिवे, हे स्वप्नदिवे …
क्षणी एका अवचित श्वास जडावे
पळी त्याच नयनांत जलद दाटले
येइ जवळ कोणी प्रेमभराने
स्पर्श करी पण नजर ही चुकवे, नजरही चुकवे …
कधी गीत मीलनाचे राही अधुरे
तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे
अडके गुंती, वैरी मन माझे,
मज छळी साहुनी ते [ …]

जॉर्ज कूपरच्या द लिव्हज अँड वाईंड या कवितेचा अनुवादही मजा आणतो. जॉन अक्करकरन याच्या द मॉन्सून स्टोरी या कवितेचे प्रसाद शिरगावकरने केलेला अप्रितम अनुवाद आणि त्याच कवितेवर अर्चनाने लिहिलेली लघुकथाही येथे वाचायला मिळते. तिच्या या अनुवादात मला वैयक्तिकरित्या मार्क ट्वेनच्या द डेथ डिस्क या कथेचा अनुवाद (खरे तर रूपांतरण म्हणणे योग्य ठरेल.) आवडला आहे. या कथेचे पूर्णपणे भारतीयकरण करताना ती परकिय संकल्पनेवरून उचलली आहे, हे कुठेही तिने दाखवून दिलेले नाही. एका मुलीच्या वडिलांना झालेली देहदंडाची शिक्षा आणि त्यात अपघाताने तिने बजावलेली भूमिका असा सगळा मानसिक गुंता मांडणारी कथा शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. हे श्रेय जेवढे मार्क ट्वेनचे तेवढेच तिचा सरस अनुवाद करणार्‍या अर्चनाचेही. नुकताच तिने शेरलॉक होम्सच्या कथेचा अनुवाद दिला आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतर तिने केलेला हा अनुवाद हा तिच्यातील अनुवादक किती आधीपासून जागा झाला होता, याची प्रचिती देणारा आहे.

केवळ अनुवादच नाही, तर अर्चनाची स्वतंत्र निर्मितीही येथे कथा, कवितांतून आणि संस्कृत समस्यापूर्तीतून दिसते. भूकंपावर आधारीत कथा तिने लिहिलेली कथा खऱोखरच वेगळी आहे. त्याला पार्श्वभूमी अगदी जुन्या म्हणजे संस्कृत साहित्याच्या काळाची दिली आहे. सुनामी आल्यानंतर तिच्या डोक्यात या कथेचे बीज पडले. तिने ते फुलविले. त्यासाठी भूकंपाविषयी संस्कृतात जे लिहिले आहे, ते वाचून तिने ही कथा लिहिली. स्वतंत्र निर्मिती म्हणून कथा वाचावी अशी आहे.

तिने दिलेल्या संस्कृत समस्यापूर्तीही ज्ञानवर्धक आहेत. एकूणच या ब्लॉगला भेट दिल्यानंतर आपण रित्या हस्ते परतत नाही. काहीतरी घेऊनच जातो. ज्ञानसागरातील बिंदू आपोआप आपल्याकडून टिपला जातो. ज्ञान या संकल्पनेविषयीचा एक श्लोक आणि त्याचा अर्चनाने केलेला हा भावनुवाद पहा.

अपूर्वः कोऽपि कोषोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात् ॥
'' प्रत्येक देवतेची काही ना काही खासियत असते. कोणा इंद्राकडे संहारक अस्त्र असतं, कोणा कृष्णाकडे जगन्मोहिनी बासरी असते, कोणा लक्ष्मीकडे दामाजीपंत असतात, तशी ही आपणा सर्वांना वंदनीय अशी वाग्देवता, हिच्याकडे एक जादूचा खजिना आहे. या खजिन्यातलं द्रव्य इतरांमध्ये वाटलं, की कमी न होता उलट वाढतं. आणि कुणालाही न देता जर तसंच साठवून ठेवलं, तर आपलं आपण कमी होतं. असं एक अजब द्रव्य या खजिन्यात भरलेलं आहे, आणि ते म्हणजे ज्ञान!''

अर्चनाच्या ब्लॉगवर आल्यानंतर या संस्कृत सुभाषिताचा अनुभव येत ो.

ब्लॉगचे नाव- पांढर्‍यावरचं काळं

ब्लागर - अर्चना
ब्लॉगचा पत्ता- http://pandharyavarachekale.wordpress.com /

लज्जतदार ब्लॉग
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हत्या की अपघात? नागपुरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाईपमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले

या दिवशी महाराष्ट्रात होत आहे मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला कोणतं खातं मिळणार हे मुख्यमंत्री फडणवीस ठरवणार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

Show comments