केंद्र सरकारने बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीशकुमार यांच्या नावाला मंजुरी दिली. अपॉईंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटकडून (एसीसी) तीन वर्षांसाठी रजनीशकुमार यांना या पदावर नियुक्त केले जाणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ते आपला पदभार स्वीकारतील.
रजनीशकुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. सन १९८० मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले. सन २०१५ मध्ये नॅशनल बँकींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बनण्यापूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्टेट बँकेची मर्चंट शाखा आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचे काम सांभाळत होते. सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा असून त्यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.