स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने वन स्टेशन वन प्रोडक्ट ही योजना सुरू केली. हुबळी येथे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने 72 रेल्वेस्थानकांवर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बेळगाव रेल्वेस्थानकाचाही समावेश असून शहापुरी साडी, कुंदा व कर्दंट या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. देशाच्या विविध भागात जाणारे प्रवासी रेल्वेस्थानकावरून ये-जा करीत असतात. स्थानिक उत्पादनांचा व्यापार व्हावा व त्याची माहिती इतर भागातील प्रवाशांनाही मिळावी या दृष्टीने प्रत्येक रेल्वेस्थानकावर स्थानिक उत्पादने विक्रीसाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. खाद्यपदार्थ, कपडे, भांडी, हस्तकौशल्य अशी विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत.
नैर्त्रुत्य रेल्वेने आपल्या विभागातील 71 रेल्वेस्थानकांवर स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विपेत्याला 15 दिवसांसाठी 1 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. बेळगावमध्ये प्रसिद्ध असणाऱया शहापुरी साडय़ा, कुंदा व कर्दंटची विक्री रेल्वेस्थानकावर करता येणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळेल, असा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी 8073562567 या क्रमांकाशी संपर्क साधावा, कळविले आहे.
संबंधित रेल्वेस्थानकावर मंजूर केलेली उत्पादनेच विक्री करता येणार आहेत
रेल्वेस्थानकाचे नाव मंजूर उत्पादने
बेळगाव --शहापुरी साडी, कुंदा, कर्दंट
लोंढा--- मध, फणसाचे पदार्थ, मातीची भांडी, लाकडी साहित्य
घटप्रभा लोणची, द्राक्षे, चिकू
कुडची द्राक्षे, काजूगर
रायबाग खादी, गूळ, लोणची व मसाला उत्पादने
अळणावर उसाचे पदार्थ व मध
उगार खुर्द लाकडी फर्निचर, मसाला उत्पादन
गोकाक रोड कर्दंट, खादी, हस्तकला
चिकोडी रोड मातीची भांडी, डिटर्जंट, साबण
कॅसलरॉक मध, मसाला
चिंचली खादी व गूळ
कुलेम फणसाची उत्पादने, काजू व मध
खानापूर मातीची भांडी, काजूगर, तेल