लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.
या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काशीमिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पोलिस कोठडीत असून चौकशी सुरु आहे असं ठाणे शहरचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं.