Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित

HARI OM
, सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:05 IST)
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.
 
छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्यांच्या पराक्रमांवर चित्रपटांतून देखील अनेकदा प्रकाश टाकला गेला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'हरीओम' हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे पहिले टिझर पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे.
 
चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा नक्कीच ऍक्शनपट असणार. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरुण उभे असून त्यांच्या खांद्यावर जय जगदंब आणि जय दुर्गे असे लिहिले आहे. सोबतच समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक किल्ला देखील दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोस्टरवरील गोष्टींवरून हा सिनेमा जरी ऍक्शन ड्रामा वाटत असला तरी हा कौटुंबिक सिनेमा देखील असणार आहे.
 
चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांनी सांगितले की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरु करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू." तत्पूर्वी या चित्रपटाचे निर्माते असलेल्या हरिओम घाडगे यांनी तान्हाजी मालुसरेंच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले असून या शुभकामाचे भूमीपूजन झाले आहे.
 
श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाबाबतची  अधिकची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माणुसकीची ज्योत- नाटक "लोक-शास्त्र सावित्री"