नाशिक: एखादी गोष्ट जेव्हा खूप कष्ट करून मिळवली जाते आणि त्यानंतर मागे वळून पाहताना सोपं नसतं काही हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. आपल्या आजूबाजूच्या संवादात हे वाक्य आपण कित्येकदा ऐकतो, पण जेव्हा हा अनुभव सेलिब्रिटी कलाकार ऑनस्क्रीन मांडतात तेव्हा त्याचा एक सिनेमा बनतो. आयुष्यात खरच काहीच सोपं नसतं या उक्तीचा प्रत्यय मनोरंजनक्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपणाऱया कलाकारांना प्रकर्षाने येतो.
नाशिकच्या मनोरंजनक्षेत्राने आपले नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे. येथील कलाकारांनी एक सामाजिक विषय घेऊन मनोरंजनातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगेश चव्हाण यांच्या निर्मितीतून साकारलेली, डॉ. अभिजीत सावंत लिखीत आणि सोनू अहिरे दिग्दर्शित इन साईड द शाडो या लघुचित्रपटाची थेट राष्ट्रीय पातळीवरील इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे.
लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना, पालकांची सतर्कता, पोलीस प्रशासनाची भूमिका आणि अशा अप्रिय घटना रोखण्यासाठी घ्यावयाची आवश्यक ती काळजी आदी महत्वाच्या मुद्द्याकांकडे हा लघुचित्रपट लक्ष वेधतो.
यामध्ये रोचीता चव्हाण प्रमुख भूमिकेत असून, दिलीप वालकर, सुधीर सावंत, मकरंद शिंदे, भिकाजी पवार, वैभव पवार, यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. राकेश तिवारी यांनी त्यांच्या चित्रीकरणातून या लघुचित्रपटात जीव ओतला आहे. निकेश श्रीवास्तव यांच्या कला कौशल्याने प्रत्येक पात्र अक्षरश: गंभीर आणि तितकेच बोलके झाले आहे.
मनोरंजन त्यातून समाजाचे उद्बोधन, समाजापर्यंत जाणारा उत्तम संदेश पण कुठेही तोल ढळू न देता कमी वेळात प्रेक्षकांच्या मनापर्यंत भिडणे ही किमया काही मोजक्याच प्रयोगांना साधता येते हे आव्हान इन साईड द शाडो ने अचूक पेलले आहे असे दिसून येते ; म्हणूनच तर या लघुचित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर महोत्सवात आपले स्थान निश्चित केले आहे, ही बाब नाशिकच्या मनोरंजनक्षेत्रासाठी अभिमानाची आहे असे म्हणावे लागेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor