Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमएक्स प्लेअरच्या 'समांतर २'मध्ये सईचा डबल रोल ?

एमएक्स प्लेअरच्या 'समांतर २'मध्ये सईचा डबल रोल ?
, शुक्रवार, 25 जून 2021 (16:48 IST)
स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या एमएक्स ओरिजनलच्या 'समांतर' या वेबशोने प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन २ ची आतुरतेने वाट पाहू लागले. ही प्रतीक्षा आता संपली असून 'समांतर २' १ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सई ताम्हणकर सारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवेश होणार असून ती कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसतेय.
 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आपण सईची झलक पाहिलेलीच आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आज सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी आणला आहे.
 
समांतर १ मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सिझन २ मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे. यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.
 
 हा वेबशो मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना १ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना बनणार इंदिरा गांधी