विराट कोहलीने शेवटचं कसोटी शतक झळकावलं होतं तेव्हा जगाला कोरोना म्हणजे काय हे ठाऊक नव्हतं. कोरोना काय हेच माहिती नसल्याने मास्क, लशी, सोशल डिस्टन्स या संकल्पनाही गावी नव्हत्या. जग हळूहळू कोरोनातून बाहेर पडत असतानाच विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला. विराट कोहलीने 27वं कसोटी शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी झळकावलं होतं. 1205 दिवस, 23 कसोटी सामन्यांनंतर विराटने चाहत्यांना कसोटी शतकाची मेजवानी दिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने चौथ्या दिवशी कसोटीतल्या 28व्या तर कारकीर्दीतील 75व्या शतकाला गवसणी घातली. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत विराटने बहुचर्चित शतक पूर्ण केलं.
शतकानंतर आभाळाकडे पाहत विराटने आभार मानले. गळ्यातून लॉकेट बाहेर काढत त्याचं चुंबन घेतलं आणि नंतर चाहत्यांना अभिवादन केलं. कठीण अशा खेळपट्टीवर, दर्जेदार गोलंदाजीसमोर विराटने संयमाने खेळ करत शतक साकारलं.
विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्धचं हे आठवं शतक आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत विराटने अॅडलेड (3), चेन्नई (1), मेलबर्न (1), सिडनी(1), पर्थ (1) इथे शतकी खेळी साकारल्या होत्या.
घरच्या मैदानावरचं कोहलीचं हे 14वं शतक आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरुन ग्रीनच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 480 धावांचा डोंगर उभारला. उस्मानने 21 चौकारांसह 180 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. ग्रीनने 18 चौकारांसह 114 धावांची खेळी करत कारकीर्दीतील पहिलं शतक पूर्ण केलं. नॅथन लॉयन (34), टॉड मर्फी (41) या तळाच्या फलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. भारतातर्फे रवीचंद्रन अश्विनने 6 विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्मा-शुबमन गिल जोडीने 74 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा कुन्हेमनच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा 42 धावांची खेळी करुन बाद झाला. गिलने 12 चौकार आणि एका षटकारासह 128 धावांची दिमाखदार खेळी केली. गिल बाद झाल्यानंतर कोहलीने सूत्रं हाती घेतली. प्रचंड उकाड्यातही एकेरी दुहेरी धावांचा रतीब घालत कोहलीने धावफलक हलता ठेवला. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळायला येऊ शकला नाही. के.एस.भरतने 44 धावा करत कोहलीला चांगली साथ दिली. रवींद्र जडेजा 28 धावा करुन तंबूत परतला.
Published By- Priya Dixit