यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रुटने एका कॅलेंडर वर्षात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने 2021 मध्ये आतापर्यंत 1541 धावा केल्या आहेत आणि या प्रकरणात त्याने 2002 मध्ये केलेल्या 1481 धावांचा मायकेल वॉनचा विक्रम मागे टाकला आहे. याआधी रूटने 2016 मध्ये 1477 आणि 2015 मध्ये 1385 धावा केल्या होत्या.
एका वर्षात 1500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा रूट हा जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत भारतातील दोन दिग्गजांचाही समावेश आहे, ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर. एका वर्षात सर्वाधिक 1562 धावा करणारा सचिन हा पहिला भारतीय आहे. सचिनने हा विक्रम 2010 मध्ये केला होता. त्यांच्या खालोखाल गावस्कर यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी 1979 मध्ये 1555 धावा केल्या होत्या.
एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफच्या नावावर आहे, ज्याने 2006 मध्ये 11 सामन्यांत 1788 धावा केल्या होत्या. रूटचे लक्ष्य आता मोहम्मद युसूफच्या विश्वविक्रमावर आहे. एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा व्हिव्हियन रिचर्ड्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 1976 कॅलेंडर वर्षात 1710 धावा केल्या होत्या.