Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाचा थरारक विजय; इंग्लंडच्या बॅझबॉलवर टीका

Webdunia
बुधवार, 21 जून 2023 (07:22 IST)
कर्णधार पॅट कमिन्सच्या झुंजार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीत 2 विकेट्सनी थरारक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या चिवट खेळाचं कौतुक होत असताना इंग्लंडने अंगीकारलेल्या बॅझबॉल धोरणावर टीकाही होत आहे. इंग्लंडने कसोटीच्या पहिल्या दिवशी डाव घोषित केला होता. हातात विकेट असताना, धावा वाढण्याची शक्यता असतानाही इंग्लंडने हा निर्णय घेतल्यामुळे टीका होत आहे.
 
पाचव्या आणि अंतिम दिवशी ऑस्ट्रेलियाला 174 धावांची आवश्यकता होती तर इंग्लंडला 7 विकेट्स पटकावणं गरजेचं होतं. पावसामुळे पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही. पहिल्या डावातील शतकवीर उस्मान ख्वाजाने दुसऱ्या डावातही चिवटपणे खेळ करत किल्ला लढवला. नाईटवॉचमन स्कॉट बोलँड झटपट माघारी परतला. ट्रॅव्हिस हेडला मोईन अलीने बाद केलं.
 
ऑली रॉबिन्सनने कॅमेरुन ग्रीनला तंबूचा रस्ता दाखवला. ग्रीनने 28 धावांची उपयुक्त खेळी केली. ख्वाजा इंग्लंडच्या वाटेतला अडथळा होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने स्वत: चेंडू हातात घेत ख्वाजाला माघारी धाडलं. ख्वाजाने 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
ख्वाजा बाद होताच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मैदानात उतरला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला 72 धावांची आवश्यकता होती. थोड्या वेळात विकेटकीपर फलंदाज अलेक्स कॅरेही बाद झाला. जो रुटने स्वत:च्या गोलंदाजीवर अफलातून झेल टिपला. यानंतर कमिन्सने लॉयनला हाताशी घेत नवव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी रचली.
 
चौकार आणि एकेरी-दुहेरी धावा यांचा सुरेख मिलाफ साधत कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाला 37 धावांची आवश्यकता असताना बेन स्टोक्सकडून जीवदान मिळालं. याचा फायदा उठवत लॉयनने 16 धावा केल्या. कमिन्सने नाबाद 44 धावांची खेळी करत थरारक विजय मिळवून दिला. मोईन अली दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकला नाही.
 
ख्वाजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव घोषित करण्याच्या निर्णयावर टीका होऊ लागली.
 
क्रिकेटविश्वातली बहुचर्चित अशी अॅशेस म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातली पारंपरिक मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने बॅझबॉल ही संकल्पना वारंवार चर्चेत आहेत.
 
क्रिकेटमध्ये ड्यूक्स, एसजी, कुकाबुरा असे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरले जातात.
 
आता हा कुठला नवा चेंडू असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे. पण हा चेंडू नाहीये तर हा खेळण्याचा नवा पवित्रा आहे.
 
इंग्लंड क्रिकेट संघाने अंगीकारलेला हा पवित्रा म्हणजे बॅझबॉल.
 
बॅझबॉल हे नाव कसं पडलं?
न्यूझीलंडचे माजी विकेटकीपर फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचे टेस्ट संघाचे प्रशिक्षक आहेत. धडाकेबाज आणि अनोख्या फलंदाजीच्या शैलीसाठी मॅक्युलम ओळखले जायचे. मॅक्युलम यांचं टोपणनाव ‘बॅझ’ असं आहे.
 
मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाच्या मार्गक्रमणासाठी आखलेली योजना म्हणजे बॅझबॉल. 2008 मध्ये आयपीएल सुरू झालं.
 
आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मॅक्युलम यांनी साकारलेली तडाखेबंद दीडशतकी खेळी आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. मॅक्युलम यांच्या खेळीनेच आयपीएल स्पर्धेचा ब्रँड चाहत्यांच्या मनात ठसला.
 
2015 वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मॅक्युलम यांनी आक्रमक पवित्रा घेत मोठा फटका खेळला. मॅक्युलम त्या चेंडूवर बाद झाले. न्यूझीलंडला जेतेपदापासून दूरच राहावं लागलं होतं.
 
कसोटी प्रकारात त्रिशतक नावावर असणाऱ्या मॅक्युलम यांनी सदैव वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा मार्ग निवडला.
 
मॅक्युलम यांनी 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 71 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत मॅक्युलमने कोलकाता, चेन्नई, कोची, गुजरात आणि बंगळुरू संघाचा भाग होता.
 
बॅझबॉल हे नाव दिलं कुणी?
गंमत म्हणजे मॅक्युलम यांनी स्वत: हे नाव दिलेलं नाही. बॅझबॉल म्हणून वेगळं काही करतोय असंही त्यांना वाटत नाही.
 
क्रिकइन्फो या प्रसिद्ध क्रिकेटविषयक वेबसाईटचे प्रतिनिधी अँड्यू मिलर यांनी पहिल्यांदा 'बॅझबॉल' असा उल्लेख केला होता. त्यानंतर हेच नाव प्रसिद्ध झालं.
 
मॅक्युलम यांनी इंग्लंड क्रिकेट संघाला दिलेली नवी शिकवण याअर्थी बॅझबॉल तंत्र प्रचलित झालं.
 
कसोटी क्रिकेट कशासाठी ओळखलं जातं?
कसोटी हा क्रिकेटचा पारंपरिक प्रकार. पांढऱ्या कपड्यांनिशी संयमाने खेळायचा हा प्रकार.
 
फटके लगावण्यापेक्षा चेंडू सोडून देण्याला कसोटी प्रकारात महत्त्व असतं. नवा चेंडू विकेट न गमावता खेळून काढणं कौशल्याचं मानलं जातं. दिवसदिवस खेळपट्टीवर ठाण मांडून प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणं याच प्रकारात होतं.
 
वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात न होणारी गोष्ट म्हणजे सामना अनिर्णित होतो. पाच दिवस खेळल्यानंतरही कोणीच जिंकत नाही असं होऊ शकतं. कसोटी क्रिकेट म्हणजे 4 स्लिप्स, 30 गज वर्तुळात बहुतांश क्षेत्ररक्षक असं समीकरण असतं. काहीसा संथ आणि सुशेगात तब्येतीत जगावं असं प्रारुप म्हणजे कसोटी क्रिकेट.
 
बॅझबॉलअंतर्गत काय होऊ लागलं?
मॅक्युलम यांच्या नव्या शिकवणीनुसार इंग्लंड संघाने कसोटी प्रकारात अचंबित करणाऱ्या गोष्टी सुरू केल्या. कसोटी प्रकारात चौथ्या डावापर्यंत खेळपट्टी उखळू लागते. फिरकीला साथ देऊ लागते. त्यामुळे धावा करणं कठीण होतं. इंग्लंड संघाने या सिद्धांताला छेद देत चौथ्या डावात 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा मापदंड रचला.
 
खेळपट्टी, क्षेत्ररक्षणाची सजावट, गोलंदाजांचा दर्जा हे काहीही असलं तरी इंग्लंडने प्रति षटकामागे 5 धावा चोपायच्याच अशी फलंदाजी करायला सुरुवात केली. 2022च्या उत्तरार्धात इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर त्यांनी 506 धावांचा डोंगर उभारला. त्यादिवशी 75 षटकांचाच खेळ होऊ शकला. तरीही इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत एवढी प्रचंड धावसंख्या उभारली. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती.
 
कसोटी प्रकारात प्रतिस्पर्धी संघ सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट करतो. इंग्लंडने याचा फायदा उचलत सुसाट फटकेबाजी केली. प्रत्येक षटकात एक चौकार मारायचाच या न्यायाने फलंदाजी केली जाते. चौकार-षटकार मिळत नसतील तर धावून तेवढ्या धावा करायच्या असा दंडक दिसतो. बचावात्मक राहावं की आक्रमक पद्धतीने रोखावं या द्विधा मनस्थितीत समोरचा संघ अडकतो. त्यांचा गोंधळ दूर होईपर्यंत इंग्लंडने दमदार वाटचाल केलेली असते.
 
सध्या सुरू असलेल्या अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 398 धावांवर डाव घोषित करत चाहत्यांना धक्का दिला. सर्वसाधारणपणे तिसऱ्या डावात डाव घोषित केला जातो. पण इंग्लंडने वेगाने खेळत जवळपास चारशेचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाच्या थकलेल्या फलंदाजांना फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रतिस्पर्धी संघाला धक्का देत वाटचाल करण्याची मॅक्युलम यांची योजना आहे.
 
बॅझबॉल अंतर्गत इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुटने वेगळ्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने डावाची बांधणी करणारा जो रुट आता रिव्हर्स स्कूप, रिव्हर्स स्विच असे फटके नियमितपणे खेळू लागला आहे. मोठे फटके मारताना बाद होण्याचा धोका असतानाही तो असे फटके खेळत आहे. संयमी फलंदाजीसाठी प्रसिद्ध झॅक क्राऊले वेगवान खेळू लागला आहे. बॅझबॉल तत्वानुसार खेळायचं ठरवल्यास फलंदाजांवर विशिष्ट गतीने म्हणजे स्ट्राईकरेटने खेळण्याचं दडपण येऊ शकतं.
 
आम्ही क्रिकेटरसिकांचं मनोरंजन करणार आहोत. रटाळ ड्रॉ करण्यात आम्हाला रस नाही असं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने स्पष्ट केलं आहे. चौथ्या डावात आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना विकेट्स पडत राहिल्या तर पराभवाची शक्यता असते. पण इंग्लंडचा संघ हा धोका पत्करताना दिसतो.
 
सध्या सुरू असलेल्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने लावलेलं क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय ठरलाय. डावखुऱ्या ख्वाजाला बाद करण्यासाठी स्टोक्सने अंब्रेला म्हणजे उघडलेल्या छत्रीच्या आकाराची क्षेत्ररक्षणाची सजावट केली. अगदी समोर असलेल्या क्षेत्ररक्षकांना भेदण्याच्या प्रयत्नात ख्वाजा त्रिफळाचीत झाला. फलंदाजाचे कच्चे दुवे हेरुन त्यानुसार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हा मॅक्युलम यांच्या योजनेचा महत्त्वाचा हिस्सा आहे.
 
बॅझबॉल अंतर्गत कामगिरी कशी?
 
मॅक्युलम-स्टोक्स या जोडगोळीच्या कारभारात इंग्लंडची कामगिरी पाहूया. घरच्या मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला.
 
भारतीय संघाला कोरोनामुळे राहिलेल्या पाचव्या कसोटीत हरवलं. यानंतर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि 2-1 फरकाने मालिका जिंकली.
 
यानंतर इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला. आशियाई उपखंडात उष्ण आणि दमट परिस्थितीत खेळताना इंग्लंडने 3-0 असा दणदणीत मालिकाविजय साजरा केला.
 
न्यूझीलंडमध्ये झालेल्या छोटेखानी मालिकेत बरोबरी झाली. यानंतर मायदेशी परतलेल्या इंग्लंडने आयर्लंडला नमवलं.
 
गाळात रुतलेला संघ पुन्हा प्रगतीपथावर
2015 वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. या दारुण अशा पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अमूलाग्र स्वरुपाचे बदल केले. टेस्ट आणि वनडे-ट्वेन्टी20 साठी स्वतंत्र संघ तयार करण्यात आले. बचावात्मक खेळत राहण्याऐवजी बिनधास्त खेळण्यावर भर देण्यात आला.
 
बॅझबॉलवर टीकाही
"इंग्लंडने अंगीकारलेलं बॅझबॉल धोरण चांगलं आहे पण ते सगळीकडेच चालेल असं नाही. विदेशात खेळपट्या आणि वातावरण वेगळं असतं. सदैव आक्रमक पवित्रा घेऊन खेळणं धोक्याचंही ठरू शकतं", असं भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने म्हटलं आहे.
 
बॅझबॉल धोरण किती काळ तग धरु शकेल असा सवाल ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथने म्हटलं आहे. बॅझबॉल प्रमाणे खेळण्याची इच्छा होते पण आम्ही आमच्या पद्धतीनेच खेळू असं ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

भारतीय संघाच्या माजी खेळाडूच्या नावावर अटक वॉरंट जारी

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

पुढील लेख
Show comments