Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

INDvsPak : पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय; बाबर-रिझवानची वादळी सलामी

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (23:17 IST)
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने बिनबाद वादळी सलामीसह पाकिस्तानला 10 विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
 
पाकिस्तानचा कोणत्याही विश्वचषकात भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. ट्वेन्टी20 प्रकारात 10 विकेट्सनी विजय मिळवण्याची पाकिस्तानची पहिलीच वेळ आहे.
 
50 षटकांच्या विश्वचषकाच्या 7 लढतीत भारताने वर्चस्व राखलं आहे. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या पाचही लढतीत भारतानेच विजय मिळवला होता. मात्र हा सगळा इतिहास आणि आकडेवारी बाजूला सारत पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला.
 
कर्णधार बाबर आझमने 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. रिझवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 78 धावांची खेळी करत पाकिस्तानला विश्वचषकात भारताविरुद्ध पहिलावहिला विजय मिळवून दिला.
 
रिझवानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकारांची लयलूट केली. मैदानावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या दवामुळे चेंडूवर पकड मिळवणं अवघड होत असल्याचं दिसून येत आहे. या दोघांनी 10 षटकात धावांची सलामी दिली.
 
गेल्या काही वर्षात रिझवान-बाबर जोडीने ट्वेन्टी20 प्रकारात सातत्याने चांगल्या भागीदाऱ्या रचल्या आहेत.
 
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 151 धावांची मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने 57 धावांची खेळी केली.
 
शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि के.एल.राहुलला बाद करत भारतीय संघाला धक्का दिला. आफ्रिदीने टाकलेला चेंडू अतिशय वेगाने रोहित शर्माच्या पायावर जाऊन आदळला. रोहितची बॅट खाली यायला वेळ लागला आणि पाकिस्तानला पहिलं यश मिळालं. रोहितला भोपळाही फोडता आला नाही.
 
दुसऱ्या षटकात आफ्रिदीच्या आत आलेल्या चेंडूवर राहुल त्रिफळाचीत झाला. राहुलने 3 धावा केल्या.
 
सूर्यकुमार यादवने चांगली सुरुवात केली. इमाद वासिमच्या गोलंदाजीवर चौकारही खेचला. मात्र हसन अलीच्या फसव्या चेंडूवर सूर्यकुमार मोहम्मद रिझवानच्या हाती झेल देऊन बाद झाला. ट्वेन्टी20 प्रकारात रिझवानचा हा शंभरावा झेल आहे.
 
पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये भारतीय संघाने 36 धावांची मजल मारली मात्र 3 विकेट्सही गमावल्या. 10 षटकात 60पर्यंत मजल मारत कोहली-ऋषभ जोडीने डाव सावरला.
 
ऋषभने हसन अलीच्या दुसऱ्या षटकात दोन षटकार लगावत धावगती वाढवली. मात्र पुढच्याच षटकात मोठा फटका खेळण्याचा ऋषभचा प्रयत्न शदाबच्या हातात जाऊन विसावला. ऋषभने 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावांची वेगवान खेळी केली.
 
ऋषभ बाद झाल्यानंतर कोहलीने संयमाने खेळ करत ट्वेन्टी20 प्रकारातलं 29वं अर्धशतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजा 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. हसन अलीने त्याला बाद केलं.
 
अर्धशतकानंतर विराट कोहली शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 49 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 57 धावांची खेळी केली.
 
आफ्रिदीच्या शेवटच्या षटकात भारताने 17 धावा वसूल केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात हॅरिस रौफने हार्दिकला बाद केलं. त्याने 8 चेंडूत 11 धावा केल्या.
 
भारतीय संघाने 151 धावांची मजल मारली. पाकिस्तानतर्फे शाहीन शाह आफ्रिदीने 3 तर हसन अलीने 2 विकेट्स घेतल्या.
 
पाकिस्तानचा संघ- बाबर आझम (कर्णधार), मोह्म्मद रिझवान (विकेटकीपर), फखर झमान, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, असिफ अली, शदाब खान, इमाद वासिम, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी
 
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल.राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
 
इशान किशन, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर हे भारताचे राखीव खेळाडू आहेत.
 
टी-20 विश्वचषक स्पर्धेतला दोन्ही संघांचा पहिलाच सामना आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवत विश्वचषक अभियानाची दमदार सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ आतूर आहेत.
 
सध्या आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.
 
कर्णधार म्हणून विराट कोहलीला आयसीसी जेतपद पटकावता आलेलं नाही. विश्वचषकानंतर कोहली ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफसाठीही ही शेवटची स्पर्धा आहे. शास्त्री आणि मंडळींना विजयी निरोप देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असणार आहे.
 
यंदाच्या भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत असणार आहे. 2007 मध्ये ट्वेन्टी20 तर 2011 मध्ये 50 षटकांच्या वर्ल्डकपचं जेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार धोनीचा अनुभव भारतीय संघाला फायदेशीर ठरेल.
 
भारतीय खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने युएईतच खेळत आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तानचे सामने युएईत होत असल्याने त्यांना खेळपट्यांची कल्पना आहे. दवाचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो. दव पडल्यास गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवणं अवघड होतं आणि फलंदाजांना फटकेबाजी करण्यासाठी कुरण ठरू शकतं.
 
ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान पाचवेळा आमनेसामने आले आहेत. पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत वर्चस्व गाजवलं आहे. 
 
भारताने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात जेतेपदावर नाव कोरलं होतं. पाकिस्तानने 2009 मध्ये जेतेपदाची कमाई केली होती.
 
प्रमुख फलंदाज आणि कर्णधार या नात्याने बाबर आझमवर दुहेरी जबाबदारी आहे. गेल्या 5 वर्षात टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात बाबरने सातत्यने धावा केल्या आहेत. पाकिस्तानला स्पर्धेत चांगली वाटचाल करायची असेल तर बाबरचा फॉर्म कळीचा असणार आहे.
 
2007 मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात प्राथमिक फेरीच्या लढतीत भारत-पाकिस्तान लढत टाय झाली होती. त्यावेळच्या नियमानुसार बॉलआऊटद्वारे विजेता ठरवण्यात आला. भारतीय संघाने यात बाजी मारली. 
 
अंतिम लढतीत भारत-पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले. भारतीय संघाने 5 धावांनी विजय मिळवत पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 जेतेपदावर नाव कोरलं. या विश्वविजेतेपदाने भारतातला ट्वेन्टी20 लीगचा म्हणजेच आयपीएलचा मार्ग सुकर झाला. 
 
2012 विश्वचषकात कोलंबो इथे झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सनी मात केली होती. 2014 विश्वचषकात ढाका इथे झालेल्या लढतीत भारताने 7 विकेट्सनी विजय मिळवला.
 
2016 विश्वचषकात कोलकाता इथे झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सनी नमवलं होतं.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा बदल करणार,नाणेफेक बंद होणार!

CSK vs RR : आज आणि चेन्नईसाठी करो या मरोचा सामना, राजस्थानशी लढत

पुढील लेख
Show comments