Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL T-20: पाकिस्तानचा बाबर आझम कुठल्या वादात आहे?

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (20:26 IST)
भारताविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा इथवरचा प्रवास संघर्षपूर्ण आहे. पण त्याच वेळी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप देखील झाला आहे.
त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा हा लेखाजोखा.
या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. पाकिस्तानचं कर्णधारपद बाबर आझमकडे होतं. मालिकेच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक व्हीडिओ शेअर केला.
तो व्हीडिओ म्हणजे स्वप्नपूर्ती काय असते ते दाखवणारा होता. तो व्हीडिओ एक वर्तुळ पूर्ण झालं हे सांगणार होता. स्वप्नं बघताना अथक मेहनत केली तर ईप्सित साध्य होतं याला बळकटी देणारा तो व्हीडिओ होता.
व्हीडिओत बाबर आझम दिसू लागतो आणि मग बोलायला सुरुवात करतो- "मला क्रिकेटचं वेड होतं. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहावा असं मला वाटायचं.
2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानमध्ये आला होता. संबंधितांना सांगून मी या सामन्यासाठी बॉल बॉय झालो. गुलबर्गहून रोज सामन्यासाठी मी येत असे. रमझानचा महिना होता.
आम्हाला लंचबॉक्स दिला जात असे. तो मी जपून ठेवत असे, जेणेकरून संध्याकाळी खाता येईल. बॉल बॉय म्हणून काम करताना मला खूप मजा यायची. खेळाडूंना नॉकिंग करत असे. जे चेंडू सीमारेषेबाहेर जायचे ते देत असे.
इंझमाम उल हक यांचा शेवटचा सामना होता असं कळलं. जावेद मियांदाद यांचा विक्रम मोडण्यासाठी त्यांना 2 धावा हव्या होत्या. दुर्देवाने इंझमाम स्टंपिंग झाले आणि तो विक्रम मोडू शकले नाहीत. ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर त्यांनी बॅट आपटून राग व्यक्त केला. ते मी अगदी जवळून पाहिलं होतं."
"माझा इथवरचा प्रवास सोपा नव्हता, कठीणच होता. मात्र देवाच्या दयेने योग्य वेळी चांगली माणसं भेटत गेली. इथे खेळायचं होतं, पाकिस्तानसाठी खेळायचं होतं. आता हे स्वप्न पूर्ण होतं आहे. प्रवासात अनेक चढउतार आले पण क्रिकेटवरचं लक्ष ढळलं नाही. 2007 मध्ये याच ठिकाणी झालेल्या सामन्यात मी बॉलबॉय होतो. त्या संघाविरुद्ध खेळणाऱ्या पाकिस्तान संघाचं आता मी नेतृत्व करणार आहे".
"बॉल बॉय म्हणून काम करत असतानाच एक प्रसंग मला आठवतो आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीने अब्दुल रेहमानच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला. चेंडू सीमारेषेपल्याड आल्याने मी पटकन झेल टिपला आणि परत मैदानात फेकला. त्यावेळी समालोचकांनी माझा झेल पाहून म्हटलं की हा मुलगा चांगली वाटचाल करू शकतो.
ते शब्द माझ्या आजही स्मरणात आहेत. त्याने मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. मला एबी डी'व्हिलियर्स खूप आवडायचा. त्या दौऱ्यात तो कसा फलंदाजी करतो, कसा वावरतो, कसं बोलतो हे बारकाईने टिपत होतो. स्वप्नाचा पाठलाग टप्प्याटप्प्याने करावा लागतो. जर तुम्ही ठरवलंत तर छोटी छोटी उदिष्टं पार करा- मोठं स्वप्न हळूहळू प्रत्यक्षात साकारतं."
व्हीडिओदरम्यान बाबरचा लहानपणीचा फोटो दिसतो. वडिलांच्या स्कूटरवर लाहोर स्टेडियमच्या बाहेर बसलेला बाबर असा तो फोटो. व्हीडिओ संपता संपता सूटाबूटातला, दाढी कोरलेला, केसांना जेल लावलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर लाहोरच्या मैदानातल्या एका स्टँड्समध्ये आत्मविश्वासाने उभा आहे.
तो व्हीडिओ म्हणजे गेल्या 5-6 वर्षांत पाकिस्तान क्रिकेटमधल्या एका सळसळत्या पर्वाची कहाणी आहे. पाकिस्तानला नेहमीच खंबीर अशा फलंदाजांची परंपरा लाभली आहे.
जावेद मियांदाद, झहीर अब्बास, इंझमाम उल हक, मोहम्मद युसुफ, सलीम मलिक, सईद अन्वर, युनुस खान, मिसबाह उल हक अशी ही मांदियाळी.
उत्तम तंत्रकौशल्य, मोठी खेळी करण्याची क्षमता, भागीदारी रचण्याची हातोटी, जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध आव्हानात्मक खेळपट्यांवर चांगलं खेळता येणं ही या मांदियाळीतल्या फलंदाजांची गुणवैशिष्ट्यं. या मांदियाळीतलं झळाळून निघणारं नाव म्हणजे बाबर आझम.
बाबरची सुरुवात
बाबरचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला. बाबर लाहोरमध्येच राहतो. त्याच्या वडिलांचं लाहोरमध्ये फिरदौस मार्केटमध्ये घड्याळ रिपेअरिंगचं दुकान आहे. 600 स्क्वेअर फुटांच्या घरात बाबर आणि घरचे राहायचे.
पाकिस्तानसाठी खेळलेले कामरान, उमर आणि अदनान अकमल हे बाबरचे भाऊ. भाऊ व्यावसायिक क्रिकेटपटू असल्याने बाबरला क्रिकेटचे बाळकडू नात्यातूनच मिळालेले.
बाबरचे वडील त्याला मॉडेल टाऊनमधल्या क्रिकेट अकादमीत घेऊन गेले. राणा सादिक हे बाबरचे पहिले प्रशिक्षक. क्रिकेटचे बारकावे सादिक यांच्याकडून समजून घेतल्यानंतर बाबरने वयोगट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली.
अल्पावधीत बाबरची पाकिस्तानच्या U-19 कॅम्पसाठी निवड झाली. त्यानंतर बाबरने मागे वळून पाहिलंच नाही.
बाबरचं एवढं कौतुक का होतं?
वनडे आणि टेस्टमध्ये मधल्या फळीत तर ट्वेन्टी-20 प्रकारात सलामीला खेळणारा बाबरचं तंत्र ही जमेची बाजू आहे. हाय बॅकलिफ्ट, डोकं संतुलित स्थितीत, बॅटपॅड एकत्र स्थतीत अशा पद्धतीने बाबर खेळतो.
खेळपट्टीवर जम बसेपर्यंत चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, एकेरी-दुहेरी धावांची रतीब घालणं हे बाबरचं वैशिष्ट्य.
खेळपट्टीचा नूर लक्षात आल्यानंतर चौकार-षटकार लगावायचे. मोठी खेळी करण्यात माहीर बाबर मॅरेथॉन भागीदाऱ्या रचण्यातही वाकबगार आहे. अतिशय फिट असल्याने रनिंग बिटवीन द विकेट्स उत्तम आहे. बाबरच्या भात्यात सर्वप्रकारचे फटके आहेत.
गोळीबंद कव्हर ड्राईव्ह ही बाबरची खासियत आहे.
तिन्ही प्रकारात खेळत असला तरी बाबर स्कूप, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्विच असे चित्ताकर्षक फटके अभावानेच खेळतो. पारंपरिक फटक्यांच्या साह्यानेच खेळी उभारतो.
वेगवान गोलंदाज आणि फिरकीचं जाळं अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करतो. चांगले फलंदाज सहजासहजी विकेट फेकत नाहीत. स्वत:च्या विकेटचं मोल ते जाणतात. ही उक्ती बाबरला लागू आहे. धावांची तिशी-चाळिशी ओलांडली की बाबर शंभरी गाठणार याचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांनाही येतो.
ठोस सांगता येईल असं उणेपण बाबरच्या फलंदाजीत नाही. स्वत:च्या खेळात जे कमी पडतंय ते सुधारण्यावर बाबरचा भर असतो. कदाचित या सगळ्यामुळेच पाकिस्तानसाठी पदार्पण केल्यापासून बाबर धावांच्या राशी ओततोय.
खूपच कमी कालावधीत तो पाकिस्तान संघासाठी फलंदाजीत आधारस्तंभ झाला. शांत डोक्याने योग्य निर्णय घ्यायच्या वृत्तीमुळे बाबरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
अनेक चांगले खेळाडू कर्णधारपदाच्या जबाबदारीने अवघडून जातात. पण बाबरच्या बाबतीत उलटं आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीने फलंदाज बाबरची कामगिरी आणखीनच बहरली आहे.
फॅब फोर समावेशाची मागणी
एकाच कालखंडातील साधारण एकाच वयाचे आणि एकाच काळात पदार्पण करणारे चार समकालीन शिलेदार आपापल्या संघासाठी धावांच्या राशी ओतत आहेत.
विराट कोहली (भारत), जो रूट (इंग्लंड), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि केन विल्यमसन (न्यूझीलंड) या चौकडीला फॅब्युलस फोर असं संबोधलं जातं. ही एक बोलण्यातली संकल्पना आहे. अधिकृतरित्या फॅब फोर असं काही नाहीये.
हे चौघंही आपापल्या संघांचे प्रमुख फलंदाज आहेत. जगभरात दर्जेदार गोलंदाजांसमोर चांगल्या खेळपट्यांवर धावा करतात. ही जबाबदारी चोख सांभाळत असल्याने या चौघांकडेही आपापल्या संघांचं कर्णधारपदही सोपवण्यात आलं.
चौघांच्याही नावावर धावांचे, शतकांचे, भागीदाऱ्यांचे विलक्षण विक्रम आहेत. जागतिक क्रमवारीतही फॅब फोर अग्रणीच असतात. गेल्या दशकभरात देण्यात आलेल्या क्रिकेट पुरस्कारांमध्येही या चौकडीची चलती असते.
या चौकडीप्रमाणे बाबर चांगली कामगिरी करत असल्याने त्याचाही फॅब फोरमध्ये समावेश करून फॅब फाईव्ह करावं अशी मागणी चाहते करत असतात.
आकडेवारी
बाबरच्या नावावर 35 टेस्टमध्ये 42.94च्या सरासरीने 2362 धावा आहेत. बाबरने आतापर्यंत 5 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत.
बाबरने 83 वनडे खेळल्या असून, 56.92च्या सरासरीने 3985 धावा केल्या आहेत. बाबरच्या वनडे कारकीर्दीत 14 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
ट्वेन्टी20 प्रकारात, बाबरने 62 सामन्यांमध्ये 130.64च्या स्ट्राईकरेटने 2272 धावा केल्या आहेत. बाबरने एक शतक आणि 21 अर्धशतक झळकावलं आहे.
लैंगिक शोषणाची तक्रार आणि वाद
बाबरची कारकीर्द ऐन भरात असताना 2020 मध्ये एका महिलेने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे बाबरचं आयुष्य ढवळून निघालं. नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिलेने पत्रकार परिषदेत बाबर आझमवर दहा वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केला.
बाबरने लग्नाचं खोटं आश्वासन दिल्याचंही त्या महिलेने सांगितलं. आम्ही शाळेपासून मित्र आहोत, जेव्हा आवश्यकता होती तेव्हा मी बाबरला पैसेही दिले असं त्या महिलेने सांगितलं.
त्या महिलेने केलेल्या दाव्यानुसार, बाबरने लग्नाचं आश्वासन दिल्याने मी घर सोडून पळाले. मात्र क्रिकेट कारकीर्द बहरू लागल्यानंतर बाबरने आश्वासन पाळलं नाही. पोलिसांकडे गेलीस तर मारल्याची धमकी दिली. शारीरिक छळही केला. बाबरपासून गरोदर असल्याचं कळल्यानंतर बाबरचं वागणं बदललं.
हे सगळे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने हे प्रकरण आधी पोलिसांकडे आणि नंतर न्यायालयात गेलं. यंदा जानेवारी महिन्यात बाबरविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानातील सेशन्स कोर्टाने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला दिले.
त्यावेळी एका सामन्याच्या पत्रकार परिषदेदरम्यान बाबरला यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी तो म्हणाला, "हे माझ्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात आहे. माझे वकील केस लढत आहेत. आपण सगळेचजण आयुष्यात अडथळ्यांचा सामना करतो. मी याला सरावलो आहे. याप्रकरणाने माझ्या मैदानावरील कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला. बाबरशी माझे काहीही संबंध नाहीत आणि मी केलेले आरोप खोटे आहेत असं सदरहू महिला सांगत असल्याचा व्हीडिओ समोर आला. हा व्हीडिओ दोन वर्षं जुना असल्याचं सांगण्यात आलं. या व्हीडिओच्या सत्यासत्यतेविषयी ठोस काहीच समजू शकलं नाही.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

संबंधित माहिती

T20 WC: अमेरिकन दूतावासाने लामिछानेला व्हिसा देण्यास नकार दिला,लामिछाने ट्विट केले

सुमित नागल विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये खेळणार

Pune HIt and Run Case : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रवानगी, वडिलांना पोलीस कोठडी

इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी आज पासून अर्ज सुरु

Bomb Threat: गृह आणि अर्थ मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी,नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाला मेल

T20 WC: अमेरिकन दूतावासाने लामिछानेला व्हिसा देण्यास नकार दिला,लामिछाने ट्विट केले

KKR vs SRH: सामन्यानंतर शाहरुख खान अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल

T20 WC: युवराजने विश्वचषकासाठी भारताचे प्लेइंग 11 निवडले, सॅमसनपेक्षा पंतला प्राधान्यता

KKR vs SRH: व्यंकटेश अय्यरने प्लेऑफमध्ये अशी कामगिरी करत इतिहास रचला

विराट कोहलीला अहमदाबादमध्ये जीवे मारण्याची धमकी, चौघांना अटक

पुढील लेख
Show comments