Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगमोहन दालमिया: क्रिकेटमध्ये पैसा आहे, हे जगाला शिकवणारे 'जग्गूदा'

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (13:02 IST)
चोपून विंचरलेले केस, बारीक काड्यांचा चष्मा, भेदक डोळे आणि अंगावर सफारी. एखाद्या उद्योगपतीला साजेसं असं वर्णन वाटतंय ना. रुढार्थाने याचं उत्तर हो असं आहे. पण जगमोहन दालमिया केवळ उद्योगपती नव्हते. त्यांनी क्रिकेटला उद्योगाचं कोंदण मिळवून दिलं.
 
क्रिकेट केवळ करमणुकीपुरता खेळ न ठेवता क्रिकेटवर आधारित अर्थकारण उभं करण्याचं श्रेय दालमिया यांना जातं.
 
क्रिकेट प्रशासनातील राजकीय लढाया असतो किंवा प्रक्षेपण हक्कांसाठी वाटाघाटी असोत- क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप उमटवली.
 
क्रिकेटच्या मैदानात आणि कामकाजावरची ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मक्तेदारी मोडून काढत भारताला क्रिकेटच्या पटलावरचं प्रमुख सत्ताकेंद्र म्हणून नावारुपाला आणण्याचं काम दालमियांनी केलं.
 
30 मे 1940 रोजी मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या दालमिया यांना 19व्या वर्षी कुटुंबाच्या बांधकाम व्यवसायात प्रवेश करावा लागला.
 
एमएल दालमिया अँड सन्स असं या कंपनीचं नाव होतं. त्यावर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि दालमिया यांना लहानपणीच कर्तेपण स्वीकारलं.
 
स्कॉटिश चर्च कॉलेजात त्यांचं शिक्षण झालं. सामर्थ्यवान क्रिकेट प्रशासक अशी ओळख प्रस्थापित करणारे दालमिया तरुणपणी क्रिकेट खेळायचे.
 
जोराबागान आणि राजस्थान क्लबसाठी ते खेळायचे. पण आपण क्रिकेटमध्ये मोठी मजल मारू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले.
 
बी.एन. दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली दालमिया यांनी कॅब अर्थात 'क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल'मध्ये प्रवेश केला.
 
दालमिया यांनी तात्कालीन पदाधिकाऱ्यांसमोर आपल्या आर्थिक आकलनाने छाप उमटवली. 1979 मध्ये दालमियांचा बीसीसीआय अर्थात बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया मध्ये प्रवेश केला. त्यावेळी क्रिकेटविश्वात भारत लिंबूटिंबू होता.
 
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला त्यावेळी दालमिया बीसीसीआयचे खजिनदार होते. पण खजिना रिकामा होता. वेस्टइंडिजसारख्या मातब्बर संघाला चीतपट करत भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर कब्जा केला.
 
भारतीय संघ, भारतीय खेळाडूही आंतरराष्ट्रीय पातळीवर दिमाखदार कामगिरी करू शकतात याचा प्रत्यय या स्पर्धेने दिला.
 
क्रिकेटपटूंच्या नावाचा ब्रँड तयार करायचा असेल, क्रिकेट अधिकाअधिक लोकांपर्यंत न्यायचं असेल, क्रिकेट पाहणं वाढीस लावायचं असेल तर बोर्डाकडे पैसा असणं गरजेचं होतं.
 
दालमिया आणि आय.एस. बिंद्रा यांनी स्पर्धांच्या आयोजनावरची ऑस्ट्रेलिया, इंग्लंडची मक्तेदारी मोडून काढायचं ठरवलं. या दोघांनी कष्टपूर्वक 1987चा विश्वचषक आशियाई उपखंडात आणला. या विश्वचषकाचं प्रायोजकत्व रिलायन्सकडे होतं.
 
1993 मध्ये भारत-इंग्लंड मालिकेचे हक्क ट्रान्सवर्ल्ड इंटरनॅशनला देण्यात आले. बीसीसीआयला यातून 18 लाख रुपये मिळणार होते. डीडी म्हणजे दूरदर्शनला ट्रान्सवर्ल्ड इंटरनॅशनलकडून हक्क विकत घ्यावे लागले. बीसीसीआयने 600000 डॉलर्सची कमाई केली.
 
बिंद्रा आणि दालमिया बीसीसीआयच्या संयुक्त अध्यक्ष होते. दालमिया आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष होते.
 
1993 मध्ये कॅब आणि बीसीसीआयने हिरो चषक स्पर्धेचे हक्क खाजगी वाहिनीली मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी हक्क विकले. यातून कॅब आणि माहिती प्रसारण मंत्रालय यांच्यात वाद झाला. या वादाची परिणती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय.
 
नव्वदीच्या दशकात क्रीडा प्रसारणावर दूरदर्शनचं वर्चस्व होतं. सध्या प्रक्षेपण हक्कांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं चालतात. प्रक्षेपण हक्कांसाठी विविध वाहिन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. प्रक्षेपण हक्क हा बीसीसीआयचा कमाईचा मुख्य स्त्रोत आहे. पण तो काळ वेगळा होता.
 
बीसीसीआयला एका सामन्याच्या प्रसारणासाठी दूरदर्शनला 5 लाख रुपये द्यावे लागत. प्रक्षेपण हक्कांसाठी दालमिया-बिंद्रा यांना संघर्ष करावा लागला. एअरवेव्हजवर सरकारचं वर्चस्व राहणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि सगळी सूत्रं फिरली.
 
1996 विश्वचषक हा दालमिया यांच्या कारकीर्दीतला मानाचा शिरपेच. या विश्वचषकाचे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका असे तीन देश संयुक्त यजमान होते. समन्वयासाठी पाकिस्तान-इंडिया-श्रीलंका यांचं मिळून पिलकॉम कमिशन स्थापण्यात आलं.
 
दालमिया याचे समन्वयक होते. दालमिया यांनी विश्वचषकाच्या प्रसारण हक्कांसाठी प्रक्रिया राबवली. अमेरिकास्थित मार्क मस्करेन्हस यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या वर्ल्डटेल कंपनीने 10 दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्चून विश्वचषकाचे टीव्ही प्रक्षेपण हक्क विकत घेतले.
 
क्रिकेट प्रसारणातून एवढा पैसा कमावता येतो हा धडा दालमिया यांनी जगाला दिला. याच विश्वचषकाचे प्रमुख प्रायोजक होण्यासाठी आयटीसी लिमिटेडने 12 दशलक्ष डॉलर्स देण्याचं कबूल केलं. यातूनच स्पर्धेचं नामकरण विल्स वर्ल्डकप असं झालं. विल्स हा सिगारेट-तंबाखू निर्मिती करणारा आयटीसीचा ब्रँड होता. या विश्वचषकामुळे केवळ बीसीसीआयला नव्हे तर पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डालाही घसघशीत पैस मिळवून दिला. कमाई कशातून करायची आणि कशी करायची याचा वस्तुपाठ दालमिया यांनी घालून दिला.
 
टेलिव्हजन प्रसारण हक्क म्हणजे एखाद्या स्पर्धेचे सामने विशिष्ट देशांमध्ये प्रक्षेपित करण्याची जबाबदारी संबंधित वाहिनीला मिळते. संपूर्ण सामना, सामन्याआधीचा आणि सामन्यानंतरचा कार्यक्रम यांची निर्मिती संबंधिक कंपनी करते. जाहिरातींच्या माध्यमातून कंपनी पैसा कमावते.
 
त्याचवर्षी दालमियांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियाच्या माल्कम ग्रे यांना हरवलं पण दोन तृतीयांश मताधिक्य नसल्याच्या तांत्रिक नियमामुळे त्यांना अध्यक्ष होता आलं नाही. पण दालमिया हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. वर्षभरात पुन्हा निवडणुका झाल्या आणि दालमिया आयसीसीचे चेअरमन झाले. आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे दालमिया आशिया उपखंडातले पहिलेच प्रशासक होते.
 
बीसीसीआयला व्यावसायिक विचार आणि यश मिळवून देणाऱ्या दालमियांनी आयसीसीला गाळातून बाहेर काढलं. दालमिया आयसीसीचं प्रमुखपद स्वीकारलं तेव्हा आयसीसीच्या तिजोरीत 16000 युरो एवढाच पैसा शिल्लक राहिला होता. तीन वर्षानंतर दालमियांचं कार्यकाळ आटोपला तेव्हा आयसीसीकडे 15 दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम होती.
 
वर्णभेदासंदर्भातील धोरणांप्रकरणी दक्षिण आफ्रिका संघावर 30 वर्ष बंदी होती. दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनात दालमिया यांची भूमिका मोलाची होती. क्रिकेटविश्वात कसोटी खेळण्याचा मान अगदी मोजक्या संघांना देण्यात आला आहे.
 
2000 साली बांगलादेश कसोटी खेळणारा संघ झाला. बांगलादेशला कसोटी खेळणारा संघ म्हणून प्रस्थापित करण्यात दालमिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 
दालमिया आयसीसीच्या प्रमुखपदी असताना गोलंदाजांच्या अॅक्शनवरून बराच वाद निर्माण झाला होता.
 
मुथय्या मुरलीधरन आणि शोएब अख्तर यांच्या अॅक्शन्स वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. तांत्रिक समितीने हिरवा कंदील मिळाल्यानंतर या दोघांचा गोलंदाजीचा मार्ग मोकळा झाला.
 
दालमिया आयसीसीच्या चेअरमनपदी असताना 1999मध्ये विश्वचषक झाला. या स्पर्धेच्या टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क 16 दशलक्ष डॉलर्सला विकण्यात आले.
 
दालमिया यांच्या कार्यकाळात वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी टेलिव्हिजन प्रक्षेपण हक्क विकण्यात आले. रुपर्ट मरडॉक संचालित ग्लोबल क्रिकेट कॉर्पोरेशनने 550 दशलक्ष डॉलर्स रुपये खर्चत हक्क विकत घेतले. यातून आयसीसीला घसघशीत फायदा झाला.
 
आयसीसीच्या जबाबदारीतून बाजूला झाल्यानंतर दालमिया पुन्हा कॅबकडे परतले. 2001 मध्ये दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. तीन वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलं.
 
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 15-15 अशी बरोबरी झाली. अध्यक्ष या नात्याने दालमिया यांनी निर्णायक मत रणबीर सिंह महेंद्र यांच्या बाजूने दिलं.
 
भारतीय क्रिकेटमधल्या सगळ्यात चुरशीच्या आणि नाट्यमय घडामोडींपैकी ही एक घटना होती. पण अवघ्या वर्षभरात पवार यांनी या पराभवाचा वचपा काढला. पवारांनी महेंद्र यांच्यावर 21-10 असा दणदणीत विजय मिळवला.
 
सत्ता जाताच दालमिया यांचं नशीबही पालटलं. पवारांच्या नेतृत्वातील बीसीसीसायने दालमिया यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. 1996 विश्वषकावेळी पिलकॉमचे कन्व्हेअर म्हणून काम करत असताना पैशांचा अफरातफर केल्याचा दालमिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
 
दालमिया यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यातून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला 40 कोटी रुपये दिल्याचा आरोप होता.
 
बीसीसीआय आणि नंतर आयसीसीला पैसा कसा कमवायचा हे शिकवणाऱ्या दालमिया यांची बीसीसीआयमधून हकालपट्टी करण्यात आली. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचं अध्यक्षपदही गमावलं. पण हार मानणं दालमियांच्या स्वभावातच नव्हतं.
 
त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दालमियांविरोधातील आरोप बीसीसीआय न्यायालयासमोर सिद्ध करू शकलं नाही. यामुळे दालमिया यांची आरोपातून सुटका झाली. कोलकाता उच्च न्यायालयानेही कॅबमधून हकालपट्टीसंदर्भात निकाल दिला. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अतिशय अटीतटीच्या लढतीत दालमिया यांनी प्रसून मुखर्जी यांचा पराभव केला.
 
2010 मध्ये बीसीसीआयने दालमिया यांचं निलंबन रद्द केलं. यानंतर दालमिया यांनी बीसीसीआयविरुद्धचा दिवाणी खटला मागे घेतला. अशी फिट्टमफाट झाली.
 
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालसाठी काम केल्यानंतर 2013 मध्ये त्यांची 'अंतरिम प्रशासक' म्हणून नियुक्ती केली. स्पॉटफिक्सिंगप्रकरणी चौकशी सुरू असल्याने तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पद सोडावं लागलं. दालमिया यांनी प्रशासक म्हणून दोन महिने काम केलं. भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी काही उपाय राबवले.
 
2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं राहण्यापासून रोखलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद हाती असलेले शरद पवार पुन्हा एकदा रिंगणात होते. पुन्हा एकदा दालमिया विरुद्ध पवार असा सामना होता. पवारांकडे भाजपचा पाठिंबा होता. दालमियांनी श्रीनिवासन यांचा पाठिंबा मिळवला. पवारांनी अनुराग ठाकूर यांना अध्यक्षपदासाठी उतरवलं. पण दालमिया यांनी सगळं कौशल्य पणाला लावत बाजी मारली.
 
एकेकाळी बीसीसीआयवर दालमिया यांचा वरचष्मा होता. त्यानंतर घडामोडी अशा घडल्या की दालमिया यांची हकालपट्टी करण्यात आली. झुंजार वृत्तीसाठी प्रसिद्ध दालमियांनी निवडणूक कौशल्य सिद्ध करत पुन्हा बीसीसीआयच्या प्रमुखपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. एकप्रकारे वर्तुळ पूर्ण झालं. बीसीसीआयच्या निवडणुकीत संलग्न बोर्डांची मतं मिळवायची असतात. ही मतं मिळवण्याचं कौशल्य दालमिया यांच्याकडे होतं.
 
प्रक्षेपण हक्कांमधून जो पैसा बोर्डाला मिळतो तो संलग्न असोसिएशनला पायाभूत सुविधांकरता देण्याचं प्रारुप दालमियांनी अंगीकारलं. खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी वार्षिक करार व्यवस्था लागू केली. भारतासाठी खेळलेल्या खेळाडूंना उतारवयात आर्थिक अडचणींना सामोरं जायला लागू नये म्हणून दालमिया यांनी माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना राबवली.
 
क्रीडा प्रशासकाला किती खेळ कळायला हवा असं एकदा दालमिया यांना विचारण्यात आलं. त्यांचं उत्तर मार्मिक असं होतं. "खेळाचं प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक इतका मी खेळलो आहे. मैदानावरच्या गोष्टींसाठी अन्य माणसं आहेत ज्यांना विषयाची जाण आहे. ते मला सल्ला देऊ शकतात", असं ते म्हणाले होते.
 
20 सप्टेंबर 2015 रोजी दालमियांचं निधन झालं. भारतीय क्रिकेटविश्वातले सगळे धुरीण दालमिया यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
 
दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक दालमिया क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आहेत. वडिलांकडून मिळालेला क्रिकेट प्रशासकाचा वारसा ते पुढे चालवत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments