Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोहम्मद सिराज : वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा धैर्यवान मुलगा

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (10:09 IST)
आशिया चषक 2023 च्या फायनलमध्ये सिराजनं 21 धावांत सहा विकेट्स काढत श्रीलंकेच्या फलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. सिराजची आजवरची वाटचाल कशी होती, जाणून घ्या.
 
मोहम्मद सिराज हे टीम इंडियाचं असं अस्त्र आहे, ज्याची धार किती आहे याचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांना सहज बांधता येत नाही.
 
स्विंगला पोषक हवामान मिळालं की हे अस्त्र तळपतं आणि समोर उभ्या फलंदाजांची भंबेरी उडते.
 
एकेकाळी कसोटी विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या सिराजनं वन डे क्रिकेटमध्येही आपण कमाल करू शकतो, हे दाखवून दिलं आहे.
 
या वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारी 2023) सिराजनं वन डे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही गाठलं होतं आणि आता भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातही तो भारतीय आक्रमणाची धुरा सांभाळेल.
 
वडिलांच्या निधनानंचं दुःख पचवून त्यानं 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात बजावलेली कामगिरी असो वा आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध केलेली स्फोटक गोलंदाजी.
 
अगदी थोड्या दिवसांतच सिराजनं भारतीय क्रिकेटवर छाप पाडली आहे.
 
खडतर सुरुवात
सिराज हैदराबादचा असून, त्याचे वडील रिक्षा चालवायचे. कमावणारे ते आणि खाणारी तोंडं बरीच असं समीकरण होतं. क्रिकेटसारख्या महागड्या खेळाची आवड जोपासणं सिराज आणि त्याच्या घरच्यांना अवघड होतं.
 
तरीही सिराजने फास्ट बॉलिंगची आवड सोडली नाही. तो गल्लीमोहल्ल्यात आणि टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळत असे.
 
एकदा त्याचे मामा त्याला एका स्पर्धेसाठी घेऊन गेले. 25 ओव्हरची मॅच होती. सिराजने त्या मॅचमध्ये 20 रन्सच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या. मामांनी सिराजच्या कामगिरीवर खूश होऊन त्याला 500 रुपये बक्षीस म्हणून दिलं. सिराजसाठी मॅचमध्ये खेळण्यासाठीचं ते पहिलं मानधन होतं.
 
वडील रिक्षा चालवण्याचं कष्टाचं काम करतात याची सिराजला जाण होती. स्वत:च्या पोटाला चिमटा घेत वडिलांनी सिराज आणि त्याच्या भावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. याचीच परिणती म्हणजे सिराज भारतासाठी खेळतो आहे तर त्याचा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे.
 
टेनिस बॉल स्पर्धा, वयोगट स्पर्धा, हैदराबाद U22, मुश्ताक अली स्पर्धा, विजय हजारे करंडक, रणजी स्पर्धा असा एकेक टप्पा सिराजने मेहनतीने ओलांडला आहे. प्रत्येक ठिकाणी स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे.
 
रणजी स्पर्धेत दमदार प्रदर्शन आणि आयपीएलची दारं उघडली
रणजी करंडक स्पर्धेच्या 2016-17 हंगामात सिराजने हैदराबादसाठी खेळताना तब्बल 41 विकेट्स घेतल्या. सिराजच्या कामगिरीच्या बळावर हैदराबादने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.
 
परिणामी सनरायझर्स हैदराबादने 2017 च्या आयपीएलसाठी मोहम्मद सिराजला तब्बल 2.6 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.
 
कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातल्या सिराजसाठी ही रक्कम प्रचंड होती. पैशाबरोबरीने व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी त्याला मिळाली.
 
डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळता आलं. 2017-18 विजय हजारे स्पर्धेत सिराजने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या.
 
एक वर्ष चांगल्या संघाचा त्याला भाग होता आलं. मात्र सनरायझर्सने एका वर्षातच सिराजला रिलीज केलं.
 
मात्र तो नाऊमेद झाला नाही कारण 2018 हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याला समाविष्ट केलं. 2.6 कोटी रुपयांची बोली लावत बेंगळुरू संघाने सिराजला संधी दिली.
 
सिराजमियाँच्या घरी झाली होती बिर्याणी पार्टी
आरसीबीची टीम आयपीएल मॅच खेळण्यासाठी हैदराबादला आली होती. त्यावेळी सिराजने आरसीबीच्या टीमला बिर्याणीच्या मेजवानीसाठी निमंत्रण दिलं.
 
सिराजच्या विनंतीला मान देत आरसीबीची टीम सिराजच्या घरी पोहोचली होती. बिर्याणी पार्टीवेळी विराट कोहली खाली बसून जेवला होता.
 
सिराजच्या घरच्या रुचकर बिर्याणीवर टीम इंडियाचे खेळाडू ताव मारताना दिसत होते. सोशल मीडियावर या मेजवानीचे काही व्हीडिओ व्हायरल झाले होते.
 
आयपीएलच्या एका मॅचमध्ये दोन मेडन टाकणारा पहिला बॉलर
आयपीएल 2020 मध्ये मोहम्मद सिराजने अनोखी किमया केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत सिराजने दोन मेडन टाकण्याचा पराक्रम केला. सिराजने या मॅचमध्ये अवघ्या 8 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या.
 
आयपीएल स्पर्धेत एका मॅचमध्ये दोन मेडन स्पर्धेच्या 12 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही बॉलरने टाकल्या नव्हत्या. सिराज असं करणारा पहिलावहिला बॉलर ठरला.
 
याआधी सिराजची आयपीएलमधली कामगिरी फारशी स्पृहणीय नव्हती. त्याचा इकॉनॉमी रेट 9.29 असल्याने अंतिम अकरात त्याचं नाव पक्कं नसायचं.
 
पण बॉलिंगला पोषक खेळपट्टीवर सिराजची स्विंग बॉलिंग भल्याभल्यांची भंबेरी उडवू शकते हे त्या मॅचमध्ये दिसून आलं.
 
इंडिया ए साठी दमदार प्रदर्शन
2018 मध्ये बेंगळुरूत इंडिया ए संघासाठी खेळताना सिराजने ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळताना पहिल्या इनिंग्जमध्ये 8 विकेट्स घेण्याची करामत केली होती.
 
ऑस्ट्रेलिया ए संघात त्यावेळी उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हीस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, मिचेल मार्श, मार्नस लबूशेन, अलेक्स कॅरे अशा राष्ट्रीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता.
 
सिराजने दुसऱ्या इनिंग्जमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवर्षी बेंगळुरूत दक्षिण आफ्रिका ए संघाविरुद्ध खेळताना सिराजने मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती.
 
टीम इंडियासाठी ट्वेन्टी-20 आणि वनडे पदार्पण
2017 साली सिराजला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली. राजकोट इथे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतून त्यानं आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं.
 
त्या सामन्यात सिराजच्या बॉलिंगवर 53 रन्स कुटण्यात आल्या मात्र त्याने केन विल्यमसनसारख्या मोठ्या खेळाडूला बाद केलं होतं.
 
2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड इथे सिराजने वनडे पदार्पण केलं होतं. मात्र ही मॅच सिराजसाठी संस्मरणीय ठरली नाही. कारण ऑस्ट्रेलियासाठी बॅट्समननी सिराजच्या गोलंदाजीवर 76 रन्स कुटल्या.
 
डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ऐतिहासिक मैदानावर सिराजनं कसोटीत पदार्पण केलं. त्या सामन्यात त्यानं दोन्ही डावांत मिळून पाच विकेट्स काढल्या.
 
पण पुढच्या ब्रिस्बेन कसोटीत पहिल्याच डावात 73 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स काढल्या आणि आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
 
सिराजने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबूशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना बाद करत कारकीर्दीतील पहिल्या पंचकाची नोंद केली.
 
वडिलांचं स्वप्न
2020 साली कोव्हिडच्या जागतिक साथीनं जगाला ग्रासलं होतं.
 
त्यावर्षी दुबईमध्ये आयपीएलचं आयोजन झालं होतं आणि ती स्पर्धा आटोपून विविध संघांमधले भारतीय खेळाडू एकत्र झाले आणि ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले.
 
बायोबबलच्या नियमांमुळे त्यांना दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाला जावं लागलं, मायदेशी येताच आलं नाही. 12 नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली. क्वारंटाइनच्या कठोर नियमांमुळे सगळे खेळाडू 14 दिवस आपापल्या हॉटेल रुममध्ये बंदिस्त झाले.
 
पण आठच दिवसात मोहम्मद सिराजला त्याच्या वडिलांचं फुप्फुसांच्या आजारामुळे अवघ्या 53 व्या वर्षी निधन झाल्याचं कळलं.
 
सिराज वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता. पण भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा कठोर विलगीकरणात राहावं लागलं असतं आणि त्याची भारतासाठी खेळण्याची शक्यता अगदीच धूसर झाली असती.
 
वडिलांच्या जाण्याचा आघात मोठा असतो. सिराजच्या कारकीर्दीत त्याच्या वडिलांचा पाठिंबा मोलाचा होता. सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता. एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते.
 
बीसीसीआयने सिराजसमोर मायदेशी परतण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना शेवटचं बघावं असं मुलाला वाटणं साहजिक होतं. त्याचा विचार करून बीसीसीआयने सिराजला तू भारतात जाऊ शकतोस असं सांगितलं. परंतु सिराजला आईने, घरच्यांनी धीर दिला.
 
‘तू भारतासाठी खेळावंस हे वडिलांचं स्वप्न तू साकार करू शकतोस. तू भारतासाठी खेळलास तर तीच त्यांना आदरांजली ठरेल’ असं घरच्यांनी समजावलं. मन घट्ट करून सिराजने ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय घेतला.
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य सहकारी, सपोर्ट स्टाफ यांनीही सिराजला धीर दिला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सिराजच्या धैर्याचं कौतुक केलं.
 
इतक्या जवळचा माणूस गमावूनही सिराजने देशाप्रतीच्या कामाला प्राधान्य दिलं. युवा वयात सिराजने मोठं धैर्य दाखवलं आहे असं गांगुली यांनी म्हटलं.
 
सिराजच्या खिलाडू वृत्तीनं जिंकली ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची मनं
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या ए संघाविरुद्ध सराव सामना होता. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि सिराज ही शेवटची जोडगोळी मैदानात होती. बुमराह मुक्तपणे फटकेबाजी करत होता.
 
बुमराहचा एक फटका बॉलर कॅमेरुन ग्रीनच्या डोक्यावर आदळला. फॉलोथ्रूमध्ये असणारा ग्रीन खाली कोसळला.
 
रन्स मिळण्याची शक्यता सोडून सिराज तात्काळ ग्रीनच्या मदतीसाठी धावला. त्याची विचारपूस केली. त्याला सावरलं. सिराजच्या या खेळभावनेचं ऑस्ट्रेलियात प्रचंड कौतुक झालं.
 
प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूप्रती सिराजचं वर्तन खेळभावनेचा वस्तुपाठ आहे अशा शब्दात ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी त्याचं कौतुक केलं.
 
लॉर्ड्सवर पराक्रम
2021 साली क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर पहिल्यांदाच खेळण्याचं दडपण बाजूला सारत दोन वर्षांपूर्वी मोहम्मद सिराजने गोलंदाजी केली.
 
त्या सामन्यात 8 विकेट्स घेत सिराजनं भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. कर्णधार विराट कोहलीने जेव्हा जेव्हा चेंडू सोपवला तेव्हा वेग आणि अचूकता यांचा सुरेख मिलाफ साधत सिराजने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात चिवटपणे खेळणाऱ्या जोस बटलरचा प्रतिकार संपुष्टात आणत सिराजने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 














Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

ICC ची महिला क्रिकेटसाठी मोठी घोषणा

अखेर ठरलं !IPL 2025 मेगा लिलाव या दिवशी होईल

ICC ने 5 वर्षांसाठी फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर केला

कसोटी इतिहासातील सर्वात अवांछित विक्रम बनल्याबद्दल, रोहित शर्माचे वक्तव्य

IND vs NZ: न्यूझीलंडने तिसरी कसोटी 25 धावांनी जिंकली

पुढील लेख
Show comments