Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुशीर खान: वयाच्या आठव्या वर्षीच युवराज सिंगची विकेट काढणारा क्रिकेटर

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (12:45 IST)
Musheer Khan instagram
2013 सालची गोष्ट. मुंबईच्या प्रसिद्‌ध कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत आठ वर्षांच्या एका छोट्या मुलानं पदार्पण केलं. तो तासभर खेळला आणि त्यानं फलंदाजी करताना 42 चेंडूंचा सामना केला.
 
मुशीर खान त्या दिवशी कांगा लीगमध्ये खेळणारा सर्वात युवा क्रिकेटर ठरला.
 
दहा वर्षांनी तोच मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करतो आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर म्हणून टीमच्या विजयाला त्यानं हातभार लावला आहे.
 
मुशीरनं या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच्या सहा सामन्यांत 67.60 च्या सरासरीनं 338 धावा केल्या आहेत आणि सहा विकेट्सही काढल्या आहेत.
 
तो आपल्या टीमच्या गोलंदाजांचा उत्साह वाढवताना आणि कर्णधार उदय सहारनसोबत फिल्डिंगचे डावपेच आखताना दिसतो, तसाच प्रतिस्पर्ध्यांशी माईंड गेम्सही खेळतो.
 
मुशीर शांतपणे धावा काढत राहू शकतो तसाच स्वीप आणि स्कूप शॉट्स मारत धावांची बरसात करू शकतो. शॉर्ट बॉलचा सामना करण्याइतकंच बॅकफूटवर खेळणंही मुशीरला बऱ्यापैकी जमतं.
 
आपला भाऊ सरफराझ खानच्या पावलावर पाऊल टाकत तो मुंबई रणजी संघाकडून खेळला आहे आणि आता भारतीय संघाचं दार ठोठावतो आहे.
 
2014 साली दुबईत झालेल्या अंडर-19 विश्वचषकात अवघ्या नऊ वर्षांच्या मुशीरनं स्टँड्‌समध्ये बसून आपला भाऊ सरफराझला खेळताना पाहिलं होतं. आता तो स्वतः या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहे.
 
मुंबई क्रिकेटच्या मुशीत घडलेल्या मुशीरची इथवरची वाटचाल मात्र सोपी नव्हती.
 
वडिलांचं स्वप्न
मुशीर खानला पहिल्यांदा पाहिलं, ते 2009 साली, त्याचा भाऊ सरफराझच्या निमित्तानं. सरफराझनं तेव्हा मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये हॅरीस शील्ड स्पर्धेत 439 रन्सची खेळी करून सचिन तेंडुलकरचा 45 वर्ष जुना विक्रम मोडला होता.
 
सरफराझची मुलाखत घ्यायला आम्ही मैदानावर गेलो, तेव्हा जेमतेम अडीच-तीन वर्षांचा लहानगा मुशीरही तिथे होता.
 
नेट्सबाहेर मैदानातच बोलिंगचा सराव करणारा, चेंडू शोधत तुरूतुरू धावणारा मुशीर पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसूच फुटलं.
 
“मला पण प्रश्न विचारा, माझे पण फोटो काढा. मी पण क्रिकेट खेळणार आहे,” बोलिंग टाकता टाकता तो आमच्याकडे पाहून म्हणाला. त्या वयातही त्याचा आत्मविश्वास लक्ष वेधून गेला.
 
मुशीर आणि सरफराझ यांचा मधला भाऊ मोईन खानही क्रिकेटचा सराव करायचा. तिघांचे वडील वडील नौशाद खानच त्यांचे प्रशिक्षक. हे अख्खं कुटुंबच क्रिकेटमय आहे.
 
नौशाद मूळचे उत्तर प्रदेशातल्य आझमगडचे आहेत. क्रिकेटर बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण ते पूर्ण झालं नाही, तेव्ह ते प्रशिक्षणाकडे वळले.
 
आपल्या गावातल्या अनेक मुलांना मुंबईत आणून नौशाद यांनी क्रिकेटचे धडे दिले आहेत. त्यांची पत्नी आणि मुशीरची आई तबस्सुम या मुलांच्या खाण्यापिण्याकडे पाहात असे.
 
आपल्या मुलांसोबतच नौशाद यांनी इक्बाल अब्दुल्ला, कामरान खान अशा खेळाडूंनाही मार्गदर्शन केलं होतं.
 
कुर्ल्याच्या टॅक्सीमॅन कॉलनीत हे कुटुंब राहतं. तिथे एका बाजूला मिठी नदीचं पात्र, त्या पलीकडे बीकेसी परिसरातल्या चकचकीत इमारती आणि दुसऱ्या बाजूला एलबीएस हा मुंबईतला एक प्रमुख वाहता वर्दळीचा रस्ता आहे..
 
ट्रॅफिकच्या आवाजानं कायम गजबजलेला आणि नदीच्या पुराची भीती बाळगणारा हा परिसर. इथे कोणी शांतपणे क्रिकेटचा सराव करत असेल असं बाहेरून आलेल्या माणसांना पटणारही नाही.
 
पण नौशाद यांची मुलं इथेच खेळायची. आपल्या इमारतीच्या आवारात त्यांनी टर्फ विकेटही तयार केली आहे.
 
मुंबईच्या मैदानावर खेळत नसतील, तेव्हा मुशीर आणि सरफराझ याच विकेटवर सराव करत राहायचे. शॉर्ट बॉल खेळण्याची सवय व्हावी म्हणून ओल्या टेनिस बॉलचा सामना करायचे.
 
कोव्हिड लॉकडाऊनच्या दिवसांत शहर सोडून ते आपल्या गावी गेले होते, तेव्हा सोळाशे किलोमीटरच्या प्रवसातही वेळ आणि संधी मिळेल तेव्हा सराव सुरू असायचा. आजही मुशीरच्या सरावाकडे नौशाद यांचं बारकाईनं लक्ष असतं.
 
मुशीर खरंतर आधी गोलंदाजी करत असे. पण सरफराझसोबत आलेल्या अनुभवानं नौशाद यांनी ठरवलं की खेळाच्या केवळ एकाच बाजूवर भर देऊन चालणार नाही. त्यामुळे मुशीरनं फलंदाजीतही कौशल्य मिळवावं, याकडे त्यांनी लक्ष दिलं.
 
जेव्हा मुशीरचे पाय पाळण्यात दिसले..
अंडर-19 विश्वचषक किंवा मुंबई रणजी क्रिकेटपर्यंत पोहोचण्याआधी मुशीरनं दहा बारा वर्ष मुंबईतल्या मैदानांवर घालवली आहेत.
 
वर म्हटलंय, तसं कांगा लीगमध्ये त्याचं पदार्पण ऐतिहासिक ठरलं होतं. पण
 
कांगा लीगच्या त्या सामन्यात खेळण्याच्या काही आठवडे आधीही मुशीर चर्चेत आला होता. एका मैत्रीपूर्ण सामन्यात त्यानं युवराज सिंगची विकेट काढली होती. कदाचित समोर लहान मुलगा आहे, म्हटल्यावर युवराज थोडा ढिलाईनं खेळला असेलही पण मुशीरनं टाकलेला बॉलही लक्ष वेधून गेला.
 
एकीकडे भाऊ सरफराझनं रणजी आणि आयपीएल पदार्पण केलं, त्यादरम्यान मुशीर वेगवेगळ्या वयोगटांच्या सामन्यांत खेळत प्रवास करत राहिला.
 
2019 मध्ये मुंबई अंडर-16 संघाचं नेतृत्व करत असताना टीममेटसोबत वादामुळे मुशीर वादात सापडला होता.
 
2021-22 या मोसमातल्या कुचबिहार ट्रॉफीमध्ये मुशीरनं मुंबईला फायनलमध्ये पोहोचवलं. त्या स्पर्धेत मुशीरनं 632 रन्स केल्या आणि 32 विकेट्स काढल्या होत्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला. त्यामुळे मुंबई रणजी संघाचं दार मुशीरसाठी उघडलं.
 
भारताच्या अंडडर-19 टीममध्येही त्यानं भरीव कामगिरी बजावली आहे.
 
भारतीय क्रिकेटमध्ये तसं भावाभावांच्या अनेक जोड्‌या रणजी ट्रॉफीत एकत्र खेळल्या आहेत आणि काही वेळा दोन्ही भावांनी नाव कमावलं आहे. माधव आणि अरविंद आपटे, मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ, इरफान आणि युसूफ पठाण किंवा हार्दिक आणि कृणाल पंड्या भारतासाठी खेळले.
 
आता सरफराझ आणि मुशीरला ते स्वप्न खुणावतंय.


Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

पुढील लेख
Show comments