Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ranji Trophy 2023: कधीकाळी लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीवर नाव कसं कोरलं

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (18:12 IST)
देशांतर्गत क्रिकेटमधली प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत रविवारी सौराष्ट्र संघाने यजमान पश्चिम बंगालला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. जयदेव उनाडकतच्या नेतृत्वातातील सौराष्ट्र संघाने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत अव्वल स्थान पटकावलं.
 
दोन महिने चालणाऱ्या रणजी स्पर्धेच्या हंगामातील विजयी शिलेदारांचा प्रवासाचा घेतलेला आढावा.
 
यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. आपल्या प्रयत्नांची, धडपडण्याची दखलही घेतली जात नसताना ही माणसं कोणत्या प्रेरणेने अथक मेहनत करत असतील असा प्रश्न पडतो.
 
रविवारी कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर यजमान बंगालला नमवत सौराष्ट्र संघाने रणजी करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. तब्बल दोन महिने देशभरात सातत्याने चांगलं खेळून सौराष्ट्रने जेतेपदाला गवसणी घातली. या जेतेपदाचं अनोखेपण हेच की या यशाचा कोणी एक नायक नाही. ब्रँड न झालेल्या असंख्य चेहऱ्यांची ही यशोगाथा आहे.
 
पॉवरहाऊसेसना दणका
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबई, दिल्ली, कर्नाटक हे संघ पॉवरहाऊस मानले जातात. कारण या शहरांमध्ये क्रिकेटची संस्कृती विकसित झाली आहे. मैदानं, जिमखाने, क्लब्स यांची एक संरचना आहे. वयोगट पातळीवर असंख्य स्पर्धा होतात.
 
शाळा-कॉलेजातही स्पर्धांचं जाळं आहे. प्रशिक्षक-फिजिओ यांचीही एक मोठी फळी कार्यरत आहे. संघटनेकडेही मोठं बळ आहे. मुळात या संघांना क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. एकेकाळी मुंबई ही भारतीय क्रिकेटची नर्सरी मानली जात असे. आजही एक मुंबईकरच भारतीय संघाचा कर्णधार आहे.
 
मुंबईची सद्दी थोडी कमी झाल्यानंतर दिल्लीने जोर रेटत आपलं स्थान निर्माण केलं. गेल्या 20-22 वर्षात दिल्लीने भारतीय संघाला क्रिकेटपटूंची फौजच उपलब्ध करुन दिली आहे. दक्षिणेत कर्नाटक आणि तामिळनाडू यांना डोमेस्टिक जायंट्स म्हटलं जातं. फलंदाजी, गोलंदाजीत त्यांच्या खेळाडूंचा दबदबा असतो, जेतेपदांवरही त्यांची हुकूमत असते.
 
सौराष्ट्र या बलाढ्य संघांसमोर तुलनेने लिंबूटिंबूच म्हणायला हवं. पण गेल्या काही वर्षात सौराष्ट्रने सातत्याने चांगली कामगिरी करत अढळस्थान गाठलं आहे. क्रिकेट नियमितपणे पाहणाऱ्या अनेकांनाही गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र असे एकाच राज्याचे तीन संघ खेळतात याची कल्पना नसते. देशांतर्गत पातळीवर खेळणाऱ्या 38 संघांमध्ये सौराष्ट्रने कामगिरीच्या बळावर ठसठशीत वेगळेपण सिद्ध केलं आहे.
 
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेची भूमिका मोलाची आहे. खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळवून देणं, खेळासाठी मैदानं उपलब्ध करुन देणं, शिबिरं आयोजित करणं, सपोर्ट स्टाफची नियुक्ती, तांत्रिक-प्रशासकीय गोष्टीत सुलभता राखणं याबरोबरीने पराभव झाल्यास संवाद साधून मनोबल उंचावणं या सगळ्यात सौराष्ट्र संघटनेने वाखाणण्याजोगं काम केलं आहे.
 
रविवारी जेतेपद पटकावल्यानंतर सौराष्ट्रचा संघ, सपोर्ट स्टाफ, घरचे, संघटनेचे पदाधिकारी असं एक कुटुंबच वाटत होतं. कुटुंबात जसं माणसं एकमेकांना पुढे घेऊन जातात ती भावना सौराष्ट्र संघात दिसते.
 
सौराष्ट्र नावाचं कुटुंब
कोरोना काळात सौराष्ट्र संघाचा भाग असलेल्या अवि बरोटचं दुर्देवी निधन झालं. गेल्या वर्षी सौराष्ट्र संघाने विजय हजारे स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. सौराष्ट्र संघ लाडक्या दोस्ताला विसरला नाही.
 
फायनल मॅचला त्यांनी अविच्या पत्नीला आणि मुलीला स्टेडियममध्ये बोलावलं. सौराष्ट्र संघाने विजय या दोघींच्या बरोबरीने साजरा केला. एक छोटी कृती पण त्यातून त्यांनी त्या दोघींना तुम्ही एकट्या नाहीत हे सांगितलं. सौराष्ट्र संघाने अशी एकेक माणसं जपली आहेत म्हणूनच संघासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची त्यांची तयारी आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी भारतात आहे. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकत भारतीय संघाचा भाग होता. नागपूर टेस्टमध्ये राखीव खेळाडू असणाऱ्या जयदेवने संघातल्या खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक पुरवण्याचं काम केलं. नागपूर टेस्ट संपेपर्यंत सौराष्ट्र रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार असल्याचं स्पष्ट झालं.
 
दिल्ली कसोटीतही संघ कायम राहणार होता हे कळल्यावर जयदेवने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघातून रिलिज करण्याची विनंती केली. रोहित-राहुल जोडगोळीने होकार दिला आणि बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघ नागपूरहून दिल्लीला गेला पण जयदेव नागपूरहून कोलकात्याला रवाना झाला.
 
जयदेवने सौराष्ट्रचं यशस्वी नेतृत्व केलंच पण सामन्यात 8 विकेट्स पटकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. 2010 मध्ये पोरगेल्या जयदेवने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जयदेवला पुन्हा भारतासाठी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. या बारा वर्षात जयदेव सौराष्ट्र संघाचा आधारवड झाला.
 
प्रमुख गोलंदाज, कर्णधार, युवा खेळाडूंसाठी मेन्टॉर याबरोबरीने आयपीएल स्पर्धेत जयदेवने ठसा उमटवला. सहकाऱ्यांसाठी जयदेव वडीलबंधूच्या भूमिकेत असल्याचं जाणवतं.
 
सौराष्ट्रने भारतीय संघाला दिलेले शिलेदार
चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा हे सौराष्ट्रचे आहेत हे आपण विसरूनच जातो. भारतीय संघाच्या ड्युटीवर असल्याने हे दोघेही सौराष्ट्रसाठी फार खेळू शकत नाहीत पण जेव्हाही ते भारतीय संघासाठी खेळत नसतात तेव्हा ते सौराष्ट्रसाठी खेळतात. भारतीय संघासाठी खेळताना स्टारडममध्ये खेळणारे हे दोघं सौराष्ट्रसाठी रिकाम्या स्टेडियमयमध्ये खेळत
 
बॉर्डर गावस्कर मालिकेतल्या नागपूर आणि दिल्ली या सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाने सामनावीर पुरस्कार पटकावला. दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर राहिलेल्या जडेजाने सौराष्ट्रसाठी खेळतच पुनरागमन केलं. त्या सामन्यात दमदार प्रदर्शन हे जडेजासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी रंगीत तालीम होती.
 
पुजारा आणि जडेजा सौराष्ट्रच्या भिडूंशी नियमित संपर्कात असतात. भारतासाठी खेळतानाच अनुभव ते त्यांच्याबरोबर शेअर करतात.
 
दुर्लक्षित नायकांची फौज
या तिघांच्या बरोबरीने सौराष्ट्रची काही मंडळी बॅट आणि बॉलच्या माध्यमातून बोलतात. या खेळाडूंकडे आयपीएलचं कंत्राट नाही, जाहिरातींचे करार नाहीत. बीसीसीआयच्या करार सूचीचा ते भाग नाहीत. इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स नाहीत, पेपरात.
 
चॅनेलवर त्यांच्या मुलाखती होत नाहीत पण ही मंडळी उत्तम खेळतात. अर्पित वसवदा हे नाव आवर्जून लक्षात ठेवावं असं. अर्पितने यंदाच्या हंगामात धावांची टांकसाळच उघडली. संघ अडचणीत असताना धावा केल्या. याबरोबरीने जयदेव भारतीय संघाच्या कर्तव्यावर असताना संघाचं नेतृत्वही केलं. अर्पित सौराष्ट्रचा जुना कार्यकर्ता आहे.
 
शेल्डॉन जॅक्सन या सौराष्ट्रच्या कार्यकर्त्याचं नाव ऐकलं की विदेशी वाटतं. शेल्डॉन सौराष्ट्रचा भरवशाचा कार्यकर्ता. विकेटकीपर आणि खंदा बॅट्समन ही त्याची भूमिका. यंदाही त्याने या भूमिकेला न्याय दिला. धोनी-कार्तिक-पार्थिव आपल्या लक्षात असतात. पण याच काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग आणि रन्स या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळणाऱ्यांच्या यादीत शेल्डॉनचं नाव अग्रणी आहे.
 
हार्विक देसाई आणि चिराण जाणी यांनी यंदा जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला. धर्मेंद्रसिंह जडेजाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना वात आणला. प्रेरक मंकड हा सौराष्ट्रचा आणखी एक जुना भिडू. ऑलराऊंडर प्रेरकने संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा कमान सांभाळली.
 
यंदाच्या हंगामात अनुभवी जयदेवला साथ मिळाली युवा चेतन सकारियाची. आयपीएलमुळे चेतनची कहाणी जगासमोर आलीच आहे. चेतनने लाल चेंडूवरही आपली करामत सिद्ध केली. पार्थ भूतने पंजाबविरुद्ध साकारलेली शतकी खेळी विसरता येणार नाही. युवराजसिंह दोडियानेही यंदा सातत्याने विकेट्स घेतल्या. ही सगळी मंडळी एकीचं बळ दर्शवतात.
 
कालही जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यासाठी जयदेवला बोलावण्यात आलं. भारतीय संघाचा भाग झाल्याने जयदेव काही सामने खेळू शकला नव्हता. त्या सामन्यांमध्ये अर्पितने उत्तम पद्धतीने संघाचं नेतृत्व केलं. स्वत:ही चांगलं खेळला. हे लक्षात ठेऊन जयदेवने अर्पितलाही मंचावर बोलावलं. गोष्टी छोट्या असतात पण त्यातून माणसामाणसातले ऋणानुबंध दिसतात.
 
सौराष्ट्र क्रिकेटचा इतिहास
लार्जर दॅन लाईफ होण्यापेक्षा हम चलेंगे साथी म्हणत वाटचाल करण्यावर सौराष्ट्रचा भर असतो. नीरज ओढेरा हे सौराष्ट्रचे कोच आहेत. कोच होण्यापूर्वी ते सौराष्ट्रसाठीच खेळायचे. त्यामुळे खेळाडूंची भाषा, संस्कृती ते जाणतात.
 
सौराष्ट्रच्या केवळ रणजी स्पर्धेतल्या यशात नव्हे तर एकूणच यशस्वी वाटचालीत ओढेरा यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या बरोबरीने सपोर्ट स्टाफची मोठी फळी कार्यरत आहे. यांच्यापैकी अनेकांची नावं आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत पण त्यांचं काम बोलतं.
 
पूर्वीच्या रचनेत नवानगर संस्थानचा संघ होता. त्या संघाने 1936-37 मध्ये रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर वेस्टर्न इंडिया म्हणजेच पूर्वीच्या सौराष्ट्र संघाने 1943-44 मध्ये रणजी जेतेपदाची कमाई केली होती. त्यानंतर सौराष्ट्र असा संघ निर्माण झाला.
 
अनेक वर्ष दुसऱ्या-तिसऱ्या स्तरात काढल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सौराष्ट्र क्रिकेटमधलं महत्त्वाचं संस्थान झालं आहे. रणजी स्पर्धेची दोन जेतेपदं त्यांच्या नावावर आहेत. नियमितपणे ते या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये आगेकूच करत आहेत. इराणी स्पर्धेतं जेतेपदही त्यांनी पटकावलं आहे. विजय हजारे करंडकही दोनदा जिंकला आहे. यशात सातत्य राखणं सगळ्यात अवघड असतं, सौराष्ट्रने ते करुन दाखवलं आहे.
 
गुवाहाटी, राजकोट, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता अशी मजल दरमजल करत आणि बलाढ्य संघांना चीतपट करत, पराभवातून शिकत सौराष्ट्रने जेतेपद आपलंसं केलं आहे. त्यामुळेच चित्रातल्या या कार्यकर्त्यांचा प्रवास जाणून घेणं, त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या मॅचेस बघणं हे आपलं चाहतं म्हणून कर्तव्य आहे, त्यात कसूर होता कामा नये.
 
चांगला बदल घडायला वेळ लागतो असं म्हणतात. इरादे कितीही मजबूत असले, तय्यारी जोरकस असली तरी गोष्टी पटापट घडत नाहीत. प्रस्थापितांची सद्दी मोडायला बऱ्यापैकी वेळ जातो. प्रस्थापितही कधीतरी नवे असतात, त्यामुळे प्रस्थापित होण्यासाठी किती कष्ट उपसावे लागले आहेत याची त्यांना जाणीव असते.
 
त्यामुळे ते सहजी आपली मक्तेदारी सोडत नाहीत. पण योग्य अभ्यासासह कसून मेहनत केली तर फळ मिळतं या उक्तीचं प्रत्यक्ष रुप म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट संघ. क्रिकेटमधल्या या नव्या पॉवरहाऊसची ऊर्जा आपल्यातही भरून घेऊया!
 
सौराष्ट्रचा रणजी जेतेपदापर्यंतचा प्रवास
 
वि. आसाम- अनिर्णित
 
वि. महाराष्ट्र- अनिर्णित
 
वि. मुंबई- 48 धावांनी विजयी
 
वि. दिल्ली- एक डाव आणि 214 धावांनी विजयी
 
वि. हैदराबाद- एक डाव आणि 57 धावांनी विजयी
 
वि. आंध्र प्रदेश- 150 धावांनी विजयी
 
वि. तामिळनाडू- 59 धावांनी पराभूत
 
वि. पंजाब- 71 धावांनी विजयी
 
वि. कर्नाटक- 4 विकेट्सनी विजयी
 
वि. बंगाल- 9 विकेट्नी विजयी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात नाबाद शतक झळकावले

Champions Trophy:भारतीय संघाचे सामने दुबईत होणार,लवकरच अधिकृत घोषणा

पुढील लेख
Show comments