जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंह धोनी आपल्या वाढत असलेल्या वयामुळे फलंदाजीची लय गमावत आहे. गेल्या दोन वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळत असताना धोनीमध्ये पूर्वीसारखी तंदुरुस्ती दिसली नाही. दरम्यान एका माजी खेळाडूने असा दावा केला आहे की आगामी काळात धोनी CSK कडून खेळताना दिसणार नाही.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यांनी या संदर्भात मोठा खुलासा करत म्हटलं की धोनी लवकरच चेन्नई सुपरकिंग्स संघ सोडणार आहे. आकाशने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं की 'सीएसके कायम धोनीला सोबत ठेवायला तयार असली तरी धोनीला विचारलं तर तो स्वत: सांगेल की मला संघात का ठेवत आहात. पुढील तीन वर्षे तो संघासोबत नसणार.' असाही दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे.
IPLच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सला धोनीने सर्वोच्च गाठण्यात मदत केली आहे. सीएसके आणि धोनी वेगळे नाहीत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्स संघाने तीन वेळा विजयाची ट्रॉफी पटकावली आहे. अशात तीन वर्षांपर्यंत धोनी चेन्नईकडून खेळेल असं वाटत नाही असा दावा आकाश चोप्रा यांनी केला आहे. कारण मागील दोन वर्षांपासून धोनीची लय कायम नाही.