Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'तो' सामना जेव्हा लोकांचा संयम संपला; विनोद कांबळी 60 हजार प्रेक्षकांसमोर रडला

Webdunia
गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (18:57 IST)
रेहान फजल
हा किस्सा 1996 च्या विश्वचषकातला आहे, जेव्हा भारताने बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीतून उपांत्य फेरीत धडक मारली.
 
या विजयाचा आनंद इतका होता की, श्रीलंकेसोबत उपांत्य सामना खेळतानाही भारताचा संघ त्यातून सावरला नव्हता.
 
भारतीय संघाचे प्रशिक्षक अजित वाडेकर यांना याची जाणीव होती. कारण भारतीय संघाला ही सवय आहे, की मोठा सामना जिंकल्यानंतर ते गोष्टी सहजतेने घेऊ लागतात.
 
संजय मांजरेकर त्यांच्या इंपरफेक्ट या आत्मकथेत लिहितात की, एकदा सामना जिंकल्यानंतर आम्ही सगळेजण विमानात गप्पा मारत होतो.
 
त्या दिवशी संध्याकाळी वाडेकर आमच्यावर अचानक ओरडले की, तुम्ही स्वत:ला समजता काय? तुम्ही संपूर्ण साखळी सामने जिंकलेत का? विमानात नक्की काय सुरू आहे?
 
श्रीलंकेकडून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय
श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी वाडेकरही अशाच मूडमध्ये होते. संघाच्या बैठकीत फक्त तेच बोलत राहिले. त्यानंतर कॅप्टन अझरुद्दीन व्यक्त झाले.
 
ही बैठक सुमारे तासभर चालली असली तरी श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज रोमेश कालुविथरना आणि जयसूर्या यांना कसं रोखायचं यावर फक्त 50 मिनिटं चर्चा झाली.
 
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या साखळी सामन्यात या दोघांनी भारताविरुद्ध अतिशय चांगली कामगिरी केली. आणि भारताची 272 धावांची धावसंख्या सहज ओलांडली.
 
त्यांची फलंदाजी इतकी दमदार होती की मनोज प्रभाकरला जाणूनबूजून ऑफ-स्पिन गोलंदाजी करावी लागली आणि ही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात होती.
 
कोलकात्याला पोहोचल्यावर भारतीय संघाला सांगण्यात आलं की, इडन गार्डन्सची खेळपट्टी नुकतीच ऑस्ट्रेलियाहून आणलेल्या मातीने पुन्हा बांधण्यात आली आहे. पहिल्याच दृष्टीक्षेपात ती खेळपट्टी कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळपट्टीसारखी टणक आणि मजबूत दिसत होती.
 
सचिन तेंडुलकर त्याच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात लिहितो, 'नाणेफेक जिंकल्यास प्रथम क्षेत्ररक्षण करायचं हे आम्ही खेळपट्टी पाहिल्याबरोबरच ठरवलं होतं.'
 
"त्यामागे एक कारण म्हणजे श्रीलंकेने आतापर्यंत आम्ही दिलेल्या ध्येयाचा यशस्वी पाठलाग केलेला होता. त्यांचे सलामीचे फलंदाज सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथरना पहिल्याच चेंडूपासून 'पिंच हिटर'ची भूमिका पार पाडायचे. बहुतेक सामन्यांमध्ये श्रीलंकेला चांगली सुरुवात करून देण्यात दोघेही यशस्वी ठरले होते."
 
"साखळी सामन्यात त्यांनी आमचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी श्रीलंकेचे फलंदाज लवकर बाद करून त्यांच्यावर दबाव आणणं महत्त्वाचं होतं," असं सचिनने म्हटलं होतं.
 
भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितलं. पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्याने भारतीय संघाचा आनंद ओसंडून वाहत होता. पण अरविंद डी सिल्वा आणि महानामाची फलंदाजी चमकली.
 
संजय मांजरेकर लिहितात, "श्रीनाथच्या चेंडूवर मी कालुवितरणाला थर्ड मॅनवर झेलबाद केलं आणि वेंकटेश प्रसादने जयसूर्याला झेलबाद केलं. यानंतर आम्हाला काय करावं हे कळत नव्हतं. महाभारततल्या अभिमन्यूप्रमाणे ध्येयाच्या चक्रव्यूहात प्रवेश करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. पण चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं नव्हतं."
 
"थोडावेळ आमचं लक्ष सामन्यावरून हटलं आणि अरविंदा डी सिल्वाने त्याचा पुरेपूर फायदा उठवत 47 चेंडूत 66 धावा केल्या.
 
महानामानेही 58 धावांची खेळी करत श्रीलंकेची सुरुवातीची पिछेहाट सावरली. डावाच्या अखेरीस रणतुंगाच्या 35 धावा, तिलकरत्नेच्या 32 आणि चामिंडा वासच्या 22 धावांच्या जोरावर श्रीलंकेने धावसंख्या 251 वर नेली," असं संजय मांजरेकरांनी लिहिलं आहे.
 
खेळपट्टीचा अंदाज घेण्यात आपली चूक झाल्याचं गोलंदाजीला आल्यानंतर तेंडुलकरच्या लक्षात आलं. त्याने आत्मकथेत लिहिलंय, "चेंडू फलंदाजाच्या दिशेने थांबून जात होता. खेळपट्टी वरून टणक वाटत असली तरीही त्याखालील माती मोकळी होती. त्यामुळे संपूर्ण 50 षटकांपर्यंत खेळपट्टी तग धरणार नव्हती.
 
श्रीलंकेची धावसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रय़त्न करणं गरजेचं होतं. असं असतानाही 50 षटकांत 251 धावा बनवण्यात त्यांना यश आलं. आणि हेच शेवटच्या क्षणाला आम्हाला अवघड गेलं."
 
तेंडुलकर स्टंप आऊट
आता भारताला चांगली सुरुवात करून देण्यासाठी सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरवर होत्या. त्यानेही प्रेक्षकांना निराश केलं नाही. फिरकी खेळपट्टीवर तेंडुलकरने 65 धावा ठोकल्या. पण 98 धावांवर तो स्टंपआउट झाला.
 
तेंडुलकर लिहितो, "जयसूर्या डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत होता. त्याचा एक चेंडू माझ्या पॅडवर आदळला आणि बाजूला वळला. मला वाटलं झटपट धाव घेण्यासाठी वाव आहे. यासाठी मी क्रीजच्या बाहेर आलो. पण नंतर मी पाहिलं की चेंडू यष्टीरक्षक कालुविथरनाच्या अगदी जवळ येऊन थांबला होता. मला ना धाव काढायला वेळ मिळाला ना क्रीझवर परत यायला."
 
"त्याने एका झटक्यात विकेट्स विखुरल्या. थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता मी पॅव्हेलियनमध्ये गेलो. कारण मला माहीत होतं की मी बाद आहे. पॅव्हेलियनच्या दिशेने वाटचाल करत असताना माझ्यानंतरच्या फलंदाजांचा मार्ग सोपा नसल्याची जाणीव मला होती."
 
खेळपट्टीवर वेगाने चेंडू स्पिन होऊ लागले.
सचिन आणि मांजरेकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. तोपर्यंत किमान खेळपट्टी बिघडली आहे, असं प्रेक्षकांना वाटलं नव्हतं.
 
संजय मांजरेकर लिहितात, "जेव्हा कुमार धर्मसेनाने अझरुद्दीनला ऑफ-ब्रेक चेंडू टाकला, तेव्हा तो चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर आदळला. जो यष्टिरक्षक कालुविथरनाने त्याच्या उंचीच्या जोरावर पकडला होता. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आला. पण त्यानंतर धर्मसेनाच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य मी कधीही विसरू शकलो नाही."
 
कदाचित त्यांना त्याच क्षणी कळलं असेल की हा सामना त्यांच्या हातात आहे आणि अंतिम सामना खेळण्यासाठी श्रीलंका लाहोरला जाणार आहे.
 
श्रीलंकेकडे त्यावेळी धर्मसेना व्यतिरिक्त आणखी दोन फिरकी गोलंदाज होते. मुथय्या मुरलीधरन आणि जयसूर्या.
 
गरज पडल्यास अरविंदा डी सिल्वाही फिरकी चेंडू टाकू शकतो. तेंडुलकर बाद झाल्यानंतर आणखी दोन आघाडीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले, तेव्हा सगळं काही संपणार असल्याचं आम्हाला मनातून वाटत होतं.
 
प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
अझरुद्दीन एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. मांजरेकरला जयसूर्याने क्लीन बोल्ड केलं. अजय जडेजाच्या जागेवर जवागल श्रीनाथला पाठवण्यात आलं. जेणेकरून तो डावखुऱ्या विनोद कांबळीला मदत करू शकेल. पण तो 6 धावांवर धावबाद झाला.
 
जडेजाही 11 चेंडू खेळून एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. नयन मोंगिया आणि आशिष कपूर बाद होताच भारतीय डावाचा शेवट स्पष्टपणे दिसू लागला.
 
तोपर्यंत ईडन गार्डनच्या प्रेक्षकांचा संयम सुटला होता. भारत आता काही जिंकत नाही हे लक्षात येताच त्यांनी मैदानात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
 
जमावाला शांत करण्यासाठी पंच आणि सामनाधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावलं. अर्ध्या तासानंतर खेळ पुन्हा सुरू झाला पण मुथय्या मुरलीधरन त्याच्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यापूर्वीच प्रेक्षकांनी पुन्हा मैदानावर बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
 
परिस्थिती इतकी बिकट झाली की सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारे श्रीलंकेचे क्षेत्ररक्षक खेळपट्टीजवळ आले. प्रेक्षक त्यांच्या डोळ्यासमोर भारताचा पराभव पाहण्यास तयार नव्हते. त्यानंतर पंचांनी खेळ थांबवून श्रीलंकेला विजेता घोषित करण्याचा निर्णय घेतला.
 
दहा धावांवर नाबाद असलेला विनोद कांबळी जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत होता तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या वृत्तीमुळे देशाचे नाव बदनाम होत आहे याची जमावाला कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे कोलकात्याच्या क्रीडा परंपरेचं खोलवर नुकसान झालं.
 
प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकला
भारताचा महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी टेलिग्राफ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात लिहिलं की, 'भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला हवी होती. भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय हा मानसिक होता जो कोणत्याही रणनीतीचा भाग म्हणून घेतलेला नव्हता.'
 
नवज्योत सिद्धू हा भारतीय संघातील एकमेव व्यक्ती होता, ज्याला भारताने प्रथम फलंदाजी करावी असं वाटत होतं. पण त्याचं मत ऐकलं गेलं नाही.
 
नंतर ग्राउंड्समननेही सांगितले की त्याने भारतीय कर्णधाराला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. पण संघाने त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
 
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर संजय मांजरेकर, "सचिन तेंडुलकर, अजय जडेजा आणि इतर दोन खेळाडू एका खोलीत जमले. संजय मांजरेकर लिहितात, 'तेवढ्यात विनोद कांबळी खोलीत शिरला. संघाच्या पराभवावर जाहीरपणे रडल्याबद्दल अजय जडेजाने त्याच्यावर ताशेरे ओढले. कांबळीने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची असमर्थता त्याला आवडली नाही."
 
भारतासाठी सामना वाचवणारी खेळी खेळण्याची संधी गमावल्याने कांबळी निराश झाल्याची शक्यता होती.
 
श्रीलंकेच्या विजयाचा वारू इथेच थांबला नाही. त्यानंतर चार दिवसांनी लाहोरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक जिंकला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

पुढील लेख
Show comments