Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

U-19 Women's World Cup: विश्वविजेतेपदाच्या दावेदार भारतीय मुलींच्या संघाबाबत जाणून घ्या

Webdunia
रविवार, 29 जानेवारी 2023 (14:18 IST)
दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिल्या वहिल्या U19 ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.सेमी फायनलच्या लढतीत तुल्यबळ न्यूझीलंडचा धुव्वा उडवत भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे.धडाकेबाज फलंदाज आणि भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या शफाली वर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. भारताच्या श्वेता सहरावतने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
 
स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत पार्शवी चोप्रा 9 विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे.
U19 मुलांचा वर्ल्डकप 1998 पासून आयोजित होतो आहे. भारतीय संघाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे.
 
U19 गटात उत्तम कामगिरी करणारे खेळाडू सध्या वरिष्ठ संघातून खेळताना दिसत आहेत.
 
यश धूलकडे दिल्लीचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. विकी ओत्सवाल नियमितपणे महाराष्ट्र संघाचा भाग आहे.
 
राजवर्धन हंगारगेकर चेन्नई सुपर किंग्स तर राज बावा पंजाब किंग्जकडून खेळले आहेत. मोहम्मद कैफ, युवराज सिंग, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, पृथ्वी शॉ, शुबमन गिल या सगळ्यांनी U19 पातळीवर दमदार खेळत निवडसमितीला दखल घ्यायला भाग पाडलं होतं. जाणून घेऊया या टीम इंडियाविषयी
 
कर्णधार शेफालीवर्मा
तडाखेबंद खेळासाठी प्रसिद्ध शेफाली वर्माला हरियाणा हरिकेन असं म्हटलं जातं. तिचा खेळ पाहिला की सातत्याने वीरेंद्र सेहवागची आठवण येते. सलामीला येत गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवण्यात शेफाली निष्णात आहे. 15व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलेली ती सगळ्यात कमी वयाची खेळाडू ठरली होती.
 
ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारी ती सगळ्यात लहान वयाची खेळाडू ठरली होती. 2021 मध्ये शेफालीने कसोटी पदार्पण केलं. पदार्पणातच तिने 96 धावांची आक्रमक खेळी केली.
 
स्फोटक खेळींची नोंद घेत ऑस्ट्रेलियातल्या महिला बिग बॅश स्पर्धेतील सिडनी सिक्सर्स संघाने तिला ताफ्यात समाविष्ट केलं. शेफालीने संघाचा विश्वास सार्थ ठरवत होबार्ट हरिकेनविरुद्ध दिमाखदार अर्धशतक झळकावलं. इंग्लंडमधल्या 100 स्पर्धेत शेफाली बर्मिंगहॅम फोनिक्स संघातर्फे खेळते.
 
शेफालीने 2 टेस्ट, 21 वनडे आणि 49 ट्वेन्टी20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही दिवसात आफ्रिकेतच होणार असलेल्या महिला ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शेफाली भारतीय संघाचा अविभाज्य भाग असणार आहे.
 
U19 स्पर्धेतही तिने तिच्या बॅटचा दणका प्रतिस्पर्धी संघांना दिला आहे. शनिवारी शेफालीचा वाढदिवस होता. केक कापताना मला गिफ्ट म्हणून ट्रॉफी हवी असं शेफालीने सांगितलं. वर्ल्डकपमध्ये शेफाली बॅटच्या बरोबरीने फिरकी गोलंदाजीही करत आहे.
 
श्वेता सेहरावत
बहिणीला खेळताना पाहून क्रिकेटची आवड लागलेल्या श्वेताने वर्ल्डकप आपल्या बॅटने गाजवला आहे. लहानपणी चार वर्ष मुलांबरोबर खेळल्यामुळे श्वेताच्या मनातली भीती निघून गेली. वर्ल्डकप स्पर्धेत 6 सामन्यात श्वेताने 3 अर्धशतकांसह 292 धावा केल्या आहेत. सरळ बॅटने खणखणीत फटके लगावणाऱ्या श्वेताला रोखणं प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरलं आहे.
 
U19 वर्ल्डकपच्या तयारीसाठी बंगळुरु इथल्या एनसीए इथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. पण बारावीच्या परीक्षेमुळे कॅम्पला येता येणार नसल्याचं श्वेताने एनसीए प्रमुख आणि माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण यांना कळवलं. बारावीच्या परीक्षेचं महत्त्व लक्ष्मण यांनी ओळखलं पण काही दिवस तरी कॅम्पला ये असं त्यांनी सुचवलं.
 
हा कॅम्प 15 मे ते 9 जून चालणार होता. श्वेताने 3 जूनला कॅम्पमध्ये प्रवेश केला. शेवटच्या सामन्यात तिने शतक झळकावलं. यामुळेच तिला एनसीएच्या संघात समाविष्ट करण्यात आलं. एनसीएच्या संघाकडून खेळताना 6 सामन्यात तिने 2 शतकं झळकावली.
 
पार्श्वी चोप्रा
फिरकीच्या बळावर पार्श्वीने वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम केलं आहे. पार्श्वीचे बाबा, काका आणि आजोबा सगळे क्रिकेट खेळायचे. त्यामुळे पार्श्वीला खेळाचे बाळकडून घरातूनच मिळाले आहेत. शाळेत असताना पार्श्वीला स्केटिंग आवडत असे.
 
U14 वयोगटात तिने स्केटिंग स्पर्धेत उत्तर प्रदेशासाठी रौप्यपदक पटकावलं होतं. वडिलांचं स्वप्न होतं की पार्श्वीने क्रिकेट खेळावं. वडिलांच्या इच्छेला मान देत पार्श्वीने स्केटिंगऐवजी क्रिकेटला प्राधान्य द्यायचं ठरवलं. लेगस्पिन गोलंदाजीवर तिने लक्ष केंद्रित केलं.
 
वयोगट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने तिची निवड उत्तर प्रदेश संघासाठी झाली. एका सामन्यादरम्यान पार्श्वीच्या ओठाला चेंडू लागून दुखापत झाली. बरं वाटत नसेल तर तू विश्रांती घेऊ शकतेस असं प्रशिक्षकांनी सांगितलं. पण पार्श्वी उपचारानंतर मैदानात खेळायला उतरली.
 
अर्चना देवी
उत्तर प्रदेशातील उन्नाव हे अर्चनाचं गाव. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार अर्चनाच्या घरच्यांनी वर्ल्डकपची फायनल पाहण्यासाठी इन्व्हर्टर घेतला आहे कारण गावात वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो.
 
वर्ल्डकपची फायनल सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला तर गडबड नको म्हणून घरच्यांनी ही व्यवस्था केली आहे.
अर्चनाची आई सावित्रीदेवी यांच्या पतीचं 2007 मध्ये आकस्मिक निधन झालं. त्यांच्या मुलाचा बुद्धिमानचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला. लहान वयात नवरा आणि मुलगा दोघेही गेल्याने सावित्री देवींसाठी घर चालवणं आणि स्वत:ला सावरणं कठीण होतं.
 
मुलगी अर्चना प्रशिक्षक पूनम गुप्ता आणि कपिल पांडे यांच्याकडे क्रिकेटचे बारकावे शिकू लागली होती. शेती आणि दूध विकून सावित्रीदेवींनी घर चालवायला घेतलं. अर्चनाला खेळण्यासाठी गंज मुरादाबाद इथल्या होस्टेलमध्ये पाठवल्यामुळे लोक त्यांच्यावर टीका करु लागले. आता हीच सगळी माणसं सावित्रीदेवींचं अभिनंदन करत आहेत.
 
सावित्रीदेवी आणि त्यांचा मोठा मुलगा रोहित एका खोलीच्या घरात राहतात. अर्चनाने स्वकमाईतून आईसाठी स्मार्टफोन घेतला आहे. या फोनवरच त्या वर्ल्डकपची फायनल पाहणार आहेत.
 
फलक नाझ
उत्तर प्रदेशातलं प्रयागराज हे फलकचं मूळ गाव. फलकचे बाबा शाळेत काम करतात. फलकच्या भावाला शिक्षण सोडून काम करावं लागलं. सातजणांच्या कुटुंबातील फलकला प्रशिक्षक अजय यादव यांच्या रुपात चांगला गुरु लाभला.
 
क्रिकेट अकादमीत दाखल होऊन शिकण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. फलकच्या कुटुंबीयांकडे एवढे पैसे नव्हते. प्रशिक्षक अजय यांनी फलकला विनाशुल्क मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला. अजय यांच्याकडून बारकावे शिकून घेतलेल्या फलकने दमदार कामगिरी करत विश्वास सार्थ ठरवला.
 
हर्ले गाला
गुजराती कुटुंबात जन्मलेली हर्ले मुंबईतल्या उत्पल संघवी शाळेची विद्यार्थिनी. हर्लेलाही स्केटिंगची आवड होती. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे स्केटिंग मागे पडलं आणि हर्ले क्रिकेट खेळू लागली.
 
टीम इंडियाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ले खेळू लागली. यानिमित्ताने जेमिमाच्या साथीने ती सराव करु लागली.
 
तीन वर्ष रॉड्रिग्ज सरांकडे मार्गदर्शन घेतल्यानंतर हर्ले एमआयजी क्लब इथे प्रशांत शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळू लागली. उत्तम प्रदर्शनाच्या बरोबरीने फिटनेस ही हर्लेची जमेची बाजू आहे. मुंबईसाठी खेळतानाच हर्लेने छाप उमटवली. मुंबईची मुलगी असणाऱ्या हर्लेकडून वर्ल्डकपच्या फायनलमध्येही दमदार खेळाची अपेक्षा आहे.
 
रिचा घोष
सिलीगुडीच्या रिचा घोषसाठी महेंद्रसिंग धोनी फटकेबाजीतला आदर्श आहे. वडील मानबेंद्र घोष यांच्या मार्गदर्शनातच रिचाने खेळायला सुरुवात केली.
 
झूलन गोस्वामी आणि वृद्धिमान साहा यांच्याकडून ती नियमितपणे अनेक गोष्टी शिकत असते.
बाघा जतिन क्लब इथे प्रवेश घेतला तेव्हा तिथे क्रिकेट खेळणारी ती एकमेव मुलगी होती. आक्रमक फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि विकेटकीपिंगही अशा तिन्ही आघाड्या रिचा समर्थपणे सांभाळते.
 
रिचाच्या समावेशामुळे संघ संतुलित होतो. अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज खेळवता येतो. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने तिच्या जडणघडणीत मोलावा वाटा उचलला आहे.
 
सोनिया मेंढिया
हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातील बहमनवास गावची. सोनियाची आई सरकारी कर्मचारी आहे. तिच्या दोन बहिणींचं लग्न झालं आहे.
 
भावाने नेहमीच सोनियाच्या क्रिकेटला पाठिंबा दिला आहे. क्रिकेट प्रशासक अनिरुद्ध चौधरी आणि प्रशिक्षक सुनील वत्स यांची साथ मिळाल्यामुळेच सोनियाने इथवर वाटचाल केली आहे.
 
मधल्या फळीत फलंदाजी आणि फिरकीपटू ही तिची ओळख.
 
मन्नत कश्यप
पतियाळात मुलींच्या प्रशिक्षणासाठी सोयीसुविधा नसतानाच्या काळात मन्नतने मुलांच्या बरोबरीने खेळायला सुरुवात केली.
 
वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत मन्नतने जेमा बोथाला नॉन स्ट्रायकिंग एन्डला क्रीझमध्ये नसल्यामुळे आऊट केलं. पण कर्णधार शफाली वर्माने तिला जेमाला परत बोलावलं.

तितास साधू
वेग हे तितास साधूचं प्रमुख अस्त्र आहे. वडिलांच्याच अकादमीत तिने खेळायला सुरुवात केली. शिब शंकर पॉल यांनी तितासचं गुणकौशल्य हेरलं.
 
तीन सराव सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने तिची थेट बंगाल संघात निवड करण्यात आली.
 
शबनम एमडी
वडील मोहम्मद शकील यांच्याकडून प्रेरणा घेत शबनमने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
 
विशाखापट्टणच्या उंचपुऱ्या शबनमने वेग आणि अचूकता दोन्हीकडे लक्ष देताना गोलंदाजीची अस्त्रं शिकून घेतली.
 
झूलन गोस्वामीला आदर्श मानणाऱ्या शबनमसाठी दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या अगदीच पोषक आहेत.
 
सौम्या तिवारी
भोपाळच्या सौम्यासाठी विराट सगळ्यात आवडता खेळाडू आहे. दडपणाच्या परिस्थितीला सामोरं जात सर्वोत्तम कामगिरी कशी करायची हे विराटकडून शिकण्यासारखं आहे असं सौम्या सांगते.
 
सुरेश चेनानी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला सुरुवात केली. सौम्याचे बाबा मनीष तिवारी सरकारी कर्मचारी आहेत, ते स्वत:ही खेळतात. सौम्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्याने योगदान दिलं आहे.
 
गोंगाडी त्रिशा
गोंगाडी त्रिशाचे बाबा हॉकी खेळायचे पण त्यांनी आपल्या मुलीला क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं. फिटनेस ट्रेनर म्हणून ते काम करायचे.
 
भद्राचलम शहरात मुलींच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने त्यांनी हैदराबादला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
 
श्रीनिवासन सरांच्या मार्गदर्शनात त्रिशाने सेंट जॉन्स अकादमीत सरावाला सुरुवात केली. तेव्हापासून त्रिशाने कामगिरीत सातत्य राखलं आहे.
 
सोनम यादव
भारतीय संघातली सगळ्यात लहान वयाची खेळाडू. 15वर्षीय सोनमच्या आईला तिने क्रिकेट खेळावं असं वाटायचं नाही. फिरोझाबादजवळचं राजा का ताल हे सोनमचं गाव.
 
सोनमचा भाऊ अमन क्रिकेट खेळायचा. कुटुंबाची गरज ओळखून अमनने काम करायला सुरुवात केली. सोनम चांगलं खेळायची हे ओळखून घरच्यांनी तिला प्रोत्साहन दिलं.
 
फायनलपर्यंतची वाटचाल वि. दक्षिण आफ्रिका- 7 विकेट्सनी विजयी वि. युएई- 122 धावांनी विजयी वि. स्कॉटलंड- 83 धावांनी विजयी वि. ऑस्ट्रेलिया- पराभूत वि. श्रीलंका- 7 विकेट्सनी विजयी वि. न्यूझीलंड- 8 विकेट्सनी विजयी
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पाच महिला खेळाडूंचा कराचीत सुटका, सांघिक हॉटेलला आग

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल संघात मोहम्मद शमीचा समावेश,बंगालचा संघ जाहीर

रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, बुमराह कर्णधार तर राहुल ओपनिंग करेल

पुढील लेख
Show comments