Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदय सहारन : भारताच्या क्रिकेट विश्वात एका नव्या ताऱ्याचा उदय

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (10:46 IST)
राजस्थान मधील श्रीगंगानगरमध्ये राहणाऱ्या संजीव सहारन यांना क्रिकेटपटू व्हायचं होतं.
स्थानिक पातळीवर ते खेळत होते मात्र जबाबदाऱ्यांमुळे त्यांना खेळण्याऐवजी अभ्यासात जास्त लक्ष घालावं लागत होतं. सुरक्षित करिअर हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
 
त्यांनी क्रिकेट सोडलं. आयुर्वेदाचा अभ्यास केला, डॉक्टर झाले. तरी मनात कुठेतरी क्रिकेटर होऊ न शकल्याची सल होतीच.
 
हेच स्वप्न त्यांनी आपला मुलगा उदयच्या रुपाने पूर्ण करायचं ठरवलं आणि या प्रयत्नात कुठेही कमी पडले नाहीत.
 
त्यांची जिद्द आणि उदयचे कष्ट याचं फळ त्यांना मंगळवारी मिळालं.
 
उदयने कॅप्टनपदाला साजेशी खेळी करत भारताला आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये स्थान पक्क करून दिलं
 
श्रीगंगानगरमध्ये उदयच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर संपूर्ण भारतात ज्युनिअर टीमचं कौतुक सुरूय.
 
सेमीफायनलची अग्निपरीक्षा
या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होता. भारतीय टीमसमोर विजयासाठी 245 रन्सचं आव्हान होतं. उदय बँटिंग करायला आला तेव्हा 8 रन्सवर 2 विकेट गेल्या होत्या.
 
त्याच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी होती. मात्र जबरदस्त बॉलिंगमुळे दुसरीकडे विकेट पडण्याचा सिलसिला सुरच होता. 12 व्या ओव्हरमध्ये भारताची अवस्था 32 रन्सवर 4 विकेट अशी झाली होती.
 
या टप्प्यावर विजय मिळवणं अतिशय कठीण वाटत होतं. मात्र उदयने हार मानली नाही. त्याने सचिन धस बरोबर स्कोरबोर्ड हलता ठेवला.
 
सचिन तेंडुलकर च्या नावामुळे सचिन नाव मिळालेल्या सचिन धसनेही आक्रमक बॅटिंग केली. चौकार षटकारांनी त्याने डाव सावरला.
 
दुसऱ्या बाजूला उदयनेही सूत्र हातात घेतली होती. सिंगल रन घेऊन स्कोरबोर्ड हलता ठेवत होते. सोपा बॉल आला तर चौकार वगैरे मारत होता. मात्र तरी तो धीराने खेळत होता.
 
तो सारखा सचिनजवळ जाऊन पिचवर टिकण्यासंदर्भात बोलत होता. दोघांनी मिळून 174 रन्सची पार्टनरशिप केली. सचिन 96 रन्स वर बाद झाला.
 
उदय शेवटपर्यंत पिचवर टिकून राहिला आणि एक रन हवा असताना तो रनआऊट झाला. तेव्हापर्यंत भारताला विजय मिळालाच होता. कारण भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं होतं.
 
अटीतटीच्या सामन्यात उदयने केलेल्या खेळीचं कौतुक होत आहे. श्रीगंगानगरमध्ये मॅच पाहत असलेल्या त्याच्या वडिलांना ते सामना जिंकतील याची खात्री होतीच.
 
पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, “उदयमध्ये लहानपणापासूनच नेतृत्वगुण होते. तो अतिशय जबाबदारीने खेळायचा. त्याला काहीही शिकवलं की तो इतर खेळाडूंनाही शिकवायचा.”
 
उदयनेही या विजयाचं श्रेय त्याच्या वडिलांना दिलं आहे.
 
वडिलांनी दिला होता गुरुमंत्र
4 एप्रिल 2004 मध्ये श्रीगंगागनगर येथे जन्माला आलेल्या उदय सहारनने 12 वर्षांचा असतानाच क्रिकेट गांभीर्याने खेळायला सुरुवात केली होती.
 
तेव्हापर्यंत त्याचे वडील बीसीसीआयचे लेव्हल-1 चे कोच झाले होते. त्यांनीच उदयला सुरुवातीला प्रशिक्षण दिलं.
 
आपल्या काळात स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळताना संजीव यांना त्यांच्या बॅटिंगमुळे टीमचे सुनील गावस्कर असं म्हणायचे. तोच पाया त्यांनी उदयमध्येही रचला.
 
संजीव यांनी उदयला शिकवलं की मॅचचा ताबा कसा शेवटपर्यंत आपल्या हातात ठेवायचा आणि विपरीत परिस्थितीत कधीही हार मानायची नाही हे त्यांनी उदयला शिकवलं.
 
उदयसुद्धा शिकला की प्रत्येक बॉलवर एक दोन रन्सने काम चालतंय तर छक्का मारण्याची गरज नाही आणि गरज पडली तर एखादा चौकार पुरेसा आहे.
 
14 वर्षांचा होत असताना त्याला आणखी योग्य प्रशिक्षणासाठी पंजाबला पाठवलं. पंजाबमधूनच उदयने अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 खेळत भारताच्या अंडर-19 च्या संघात जागा मिळवली.
 
पंजाबचा कॅप्टन मनदीप सिंहने एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना म्हटलं, “खेळाबद्दल त्याची समज अतिशय चांगली आहे. प्रशिक्षणाच्या वेळी तो त्याच्या सीनिअर्सबरोबर भाग घ्यायचाच मात्र सर्व पातळीवर सर्वोच्च कामगिरी करण्याची त्याची धडपड होती. म्हणूनच तो अंडर 19 साठी खेळतो आहे. त्याच्यात आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तो स्वत:वर कधीच खूश नसतो.”
 
माजी टेस्ट क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राही उदय सहारनच्या टेक्निक आणि लीडरशीपने प्रभावित झाले आहेत.
 
या स्पर्धेच्या पूर्वी जिओ सिनेमावर झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले,
 
“उदयच्या वडिलांनी त्याला करिअरमध्ये बरीच मदत केली आहे. पंजाब क्रिकेटनेही त्याच्यावर बरंच लक्ष दिलं आहे.
 
चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर तो अतिशय चांगली बॅटिंग करतो आता दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि भारत यांच्या झालेल्या एका सीरिजमध्ये तो फार छान खेळला आणि एक शतकही झळकावलं. तो धीराने खेळतो. तो एक कम्प्लीट बॅट्समन आहे.”
 
कर्णधारपदीही अव्वल
 
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकं केली आहेत. स्पर्धेत त्याने सर्वाधिक रन्स केले आहेत. तो पिचवर टिकून राहतो. वेगाने रन्स करतो.
 
एकूणच काय तर एकदिवसीय सामन्यात तो 4 नंबरच्या पोझिशनसाठी आदर्श फलंदाज आहे.
 
या भारतीय संघात मुशीर आणि सचिन धस सारख्या फलंदाजाची खेळी जास्त चांगली वाटली तरी भारतीय टीमच्या विजयाचं श्रेय उदय सहारनलाच जातं.
 
तो फक्त धावाच नाही तर आपल्या बरोबर असलेल्या बॅट्समनला आणखी खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो.
 
कॅप्टन असताना मैदानात त्याने क्वचितच एखादं चुकीचं पाऊल उचललं आहे. त्याचं फील्ड प्लेसमेंट आक्रमक आहे. तसंच बॉलिंगमध्ये बदल करण्यातही तो कुशल आहे. अंडर-19 स्पर्धेत, असं स्थिर नेतृत्व आणि नेतृत्वगुण अभावानेच पहायला मिळतात.
 
सचिनबरोबर भागीदारी
 
उदय आणि सचिनची भागीदारी हासुद्धा या स्पर्धेतला चर्चेचा विषय आहे.
 
सचिनबरोबर बॅटिंग करण्याबाबत त्याने आयसी टीव्हीला सांगितलं, “मला फार छान वाटतंय. कारण त्याचे विचार सकारात्मक असतात. त्यामुळे मला मदत होते.”
 
“सचिनला कायम बाऊंड्री मारायची असते त्यामुळे माझ्यावरचा दबाव कमी होतो. आम्ही लागोपाठ एक दोन रन्स करत स्कोअरबोर्ड हलता ठेवतो आणि मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा आम्ही हाच विचार करतो की शेवटपर्यंत खेळायचं आहे आणि मॅच जिंकायची आहे.”
 
सचिनच्या खेळीत उदयचाही तितकाचा वाटा आहे असं सचिनला वाटतं. कारण तो दुसऱ्यावर दबाव येऊ देत नाही.
 
भारतीय टीम अंडर-19 ट्रॉफी च्या विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. जर भारताने ही किमया साधली तर उदय सहारन ह मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ आणि यश धुल सारख्या प्रसिद्ध खेळाडूंच्या मांदियाळीत समाविष्ट होईल. त्यांच्या नेतृत्वात भारताने या स्पर्धेत यश मिळवलं आहे.
 
उदयला माहिती आहे की आता फक्त एक मॅच जिंकायची आहे आणि आपल्या करिअरच्या सर्वांत मोठ्या आव्हानासाठी तो सज्ज आहे.
 
Published BY- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

IPL Auction: IPL 2025 चा मेगा लिलाव संपला, पंत राहिला सर्वात महागडा खेळाडू, वैभव बनला करोडपती

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

पुढील लेख
Show comments