Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृतीदिन निगर्वी,सहृदयी,राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्व…. !

webdunia
देशभक्ती, हजरजबाबीपणा, विनम्रता, वाकचातुर्य आणि आपल्या वाणीने करोडो देशवासीयांबरोबरच विरोधकांच्याही हृद्यसिंहासनावर राज्य करणारे अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे भारताच्या राजकारणातील पितामह अटलबिहारी वाजपेयी असे म्हटले तर ते निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. तीनवेळा देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांचेच पाय सतत जमिनीवरच  राहिले आणि यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसून येतो.अशा या महान व्यक्तीचा आज  (16) प्रथम स्मृतीदिन ! ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि आचरण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहेत. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय करून देणारा हा लेख.
 
                  अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तेव्हा मोठे होवून ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील असे कुणालाही वाटले नव्हते परंतु आपल्या कर्तबगारी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे पद भूषवून संपूर्ण विश्वात त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला. त्यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे शिक्षक होते. शिक्षणात अटलजींना त्यांचाच खरा वारसा लाभला. अटलजींनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये बीए ची पदवी मिळवली. नंतर कानपूर येथे त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एमए केले. शालेय जीवनापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. हिंदीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी अनेक दैनिकात संपादनाचे कामही केले. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९५१मध्ये शामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली तेव्हापासून वाजपेयी या पक्षाशी निगडित आहेत. मुखर्जींचे कट्टर अनुयायी म्हणून ते गणले जात.  
राजकारणाचे बाळकडू त्यांना खऱ्या अर्थाने येथूनच मिळाले आणि त्यांनी नंतर कधी मागे वळून बघितलेच नाही.१९५७ मध्ये प्रथम त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आणि ते जिंकले. त्यांनी आपल्या वाणीने आणि प्रभावी वक्तृत्वाने संसद गाजवून आपली निवड सार्थ ठरविली. यानंतर २००४ पर्यंत म्हणजे पांच दशकाहून अधिक काळ संसदेचे  म्हणजे १० वेळा लोकसभा तर दोनवेळा राज्यसभेचे सदस्यत्व भूषवून दीर्घकाळ संसदपटू होण्याचा बहुमानही मिळवला.त्यांच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर एकही आरोप झाले नाहीत यावरूनच त्यांच्या महानतेची साक्ष पटते. १९६८मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर त्यांच्यावर जनसंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली तेव्हा त्यांनी नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मदतीने  जनसंघाच्या बळकटीसाठी महत्वाचे योगदान दिले.१९७७मध्ये जनसंघ जनतापार्टीत विलीन झाला. १९७७च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले तेव्हा वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी आली आणि त्यांनी या पदास पुरेपूर न्याय दिला. 
या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंचविण्याचे काम त्यांनी केले. आपापसातील कलहामुळे देसाई सरकार पडले आणि जनता पक्षही फुटला. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा पहिला बहुमान वाजपेयीनांच मिळाला. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना धक्का बसला. भाजपाचेही फक्त दोन सदस्य निवडून आले होते. परंतु त्याने खचून न जाता वाजपेयी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी जोमाने पक्षबांधणी केली आणि १९८९च्या निवडणुकीत या पक्षाने ८८ तर यानंतर १९९१च्या निवडणुकीत १२० जागा जिंकण्याचा करिष्मा करून दाखविला. वाजपेयींच्या  संघटन कौशल्याची त्यामुळे वारेमाप  तारीफ झाली. १९९१मध्ये भाजपा प्रमुख विरोधी पक्ष बनला. या काळात त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीच्या साह्याने आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी संसद दणाणून सोडले होते. सत्तारूढ पक्षाच्या कारभाराचा ते खरपूस समाचार घेत त्यामुळे वाजपेयींच्या या शाब्दिक हल्ल्यांना तोंड देताना सत्तारूढ पक्षाची धांदल उडाल्याचे चित्र अनेकदा दिसून आले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच १९९३ ते १९९५पर्यंत त्यांना संसदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी संसद गाजवून उत्कृष्ठ संसदपटू हा किताबही पटकाविला. त्यामुळेच १९९६च्या निवडणुकांआधी भाजपतर्फे त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते.
 
१९९६च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा जिंकणारा मोठा पक्ष ठरला होता. वाजपेयींचा पंतप्रधान म्हणून शपथविधीही झाला. परंतु सभागृहात बहुमत सिद्ध करता न आल्याने १३दिवसांतच वाजपेयींना राजीनामा देणे भाग पडले होते. १९९८च्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि हे सरकार १३महिने टिकले. परंतु सत्तेवर आल्यानंतर अवघ्या महिनाभरातच पोखरण येथे अणुचाचणी घेवून आपल्या देशाच्या क्षमतेची खरी ओळख त्यांनी  संपूर्ण विश्वाला करून दिली होती. १९९९च्या मे ते जुलै दरम्यान कारगील युध्द झाले. यावेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी बळकाविलेला भारताचा भूभाग भारतीय सैन्याने परत मिळविला आणि वाजपेयींच्या नेतृत्वाची खूपच प्रशंसा झाली. त्यांची लोकप्रियताही वाढली. याचा फायदा त्यांना १९९९च्या लोकसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीनंतर वाजपेयी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. या काळात त्यांनी आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भरीव सुधारणा घावून आणल्या. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना हे त्यांचे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प. २०००मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतास भेट दिली त्यावेळी उभय देशातील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक बळकट झाले होते. २००४च्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसप्रणित सरकार सत्तेवर आले. यानंतर काही काळाने वाजपेयी यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि २००९ची निवडणुकही ते लढले नाहीत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. 
यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या  विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हातून राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये निसटली आहेत. वाजपेयी हयात असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.आज देशभरात भाजपाला  जे यश मिळाले त्यात वाजपेयी आणि पक्षला मोठे करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांचे असलेले योगदान विसरून चालणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकित भारतीय जनता पार्टीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले. आज देशातील बहुसंख्य राज्यात भाजपाप्रणित आघाडी सत्तेवर आहे. यामागे वाजपेयी यांचे योगदान मोलाचे आहे असे म्हटले तर ते अतिशोयक्ती ठरणार नाही. उत्कृष्ठ संसदपटूबरोबरच ते उत्कृष्ठ साहित्यिक आणि कवीही होते. संसदेत ते विरोधकांना आपल्या खास शैलीत कोपरखळ्या मारून सभागृह सतत हर्शोल्हासित ठेवत. सभागृहात सर्व त्यांचा आदर बाळगीत. त्यांचे सभागृहातील अस्तित्व तरुण खासदारांसाठी प्रेरणादायी ठरत असे. भारतरत्न, पद्मविभूषण आणि उत्कृष्ठ संसदपटू आदि पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले होते.16 ऑगस्ट 2018 ला त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसागर उसळला होता. ते किती महान आणि लोकप्रिय होते याची साक्षही त्यावरून पटली. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि आचार सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील यात शंका नाही. त्यांना विनम्र अभिवादन.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

बहिणीचा अंत्यविधी, रक्षा बंधन त्याच दिवशी दोघा भावनांचा मृत्यू