"Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". (कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!).
जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञता भावनेचे चढ उतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल. आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?
१. निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे-
म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, याबद्दल कृतज्ञता बाळगणे. धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल.
२. नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे -
आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही.
३. साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे -
म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? चहा थोडा गार झाला तर चिडतो आपर पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी सहज मिळाल्या आहेत तर याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला?
४. आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे -
आपल्याला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?
विचार केला तर ही यादी लांबच लांब होऊ लागेल. यातून एक जाणवतं की ज्या ज्या गोष्टींमुळे जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा.
हा कृतज्ञता निर्देशांक दररोज जागृत ठेवण्यासाठी एक उपाय आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणावा. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय लावायची. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा.
इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होऊ शकतो पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख (ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करावा.
या सगळ्या खटाटोपानंतर एक मोठा फायदा म्हणजे मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी आपलं थँक यू आपोआपच पोहोचतं ...
म्हणूनच ज्याने हे जीवन दिले, जगण्यासाठी श्वास दिला, पोटासाठी अन्न दिले त्या परमेश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासातील किमान चोवीस मिनिटे दिली पाहिजेत. भगवंताचे नामस्मरण हीच त्याच्या प्रती व्यक्त होणारी कृतज्ञता!