Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळक जयंती विशेष

Webdunia
मंगळवार, 23 जुलै 2024 (10:58 IST)
कॉंग्रेसचे १९०७ मध्ये सूरत येथे झालेले अधिवेशन जहाल आणि मवाळ गटांतील वादामुळे खूप गाजले होते. जहालवाद्यांचे नेते होते भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. इंग्रज सत्तेकडून मर्यादित स्वातंत्र्य मागणाऱ्या मवाळांना विरोध करून टिळकांनी स्वराज्याची हाक दिली. एवढेच नव्हे तर ते मिळविण्यासाठी असहकाराचे आणि बहिष्काराचे शस्त्र उगारण्याचे आवाहनही त्यांनी केले. टिळकांच्या विचारांची सुस्पष्टता, धारदारपणा आणि आपले म्हणणे पटवून सांगण्याचा नेमकेपणा यातून दिसून येतो. टिळकांच्या जयंतीनिमित्त या अधिवेशनात त्यांनी केलेले हे भाषण...
 
राजकारणासंदर्भात सध्या दोन नवीन शब्द व्यवहारात आले आहेत. जहाल आणि मवाळ. या दोन्ही शब्दांना काळाचा संदर्भ आहे. त्यामुळे काळ बदलेल तसे हे शब्दही बदलतील. आजचे जहालमतवादी पढील काळातील मवाळ बनतील. आताचे मवाळवादी हे पूर्वीचे जहालवादी होते तसेच. कॉंग्रेसची स्थापना झाली तेव्हा दादाभाई नोरौजींनी मांडलेली मते ही त्याकाळी जहाल समजण्यात आली होती. 
 
दादाभाई मात्र आज मवाळ विचारांचे मानले जातात.थोडक्यात आम्ही आजचे जहालवादी आहोत आणि पुढच्या काळात आमची मुले स्वतःला जहालवादी म्हणवून घेतली, त्यावेळी मात्र आम्ही मवाळवादी झालेलो असू. त्यामुळे प्रत्येक पक्ष सुरवातीला जहाल असतो, नंतर तो मवाळ बनत जातो. आगामी काळात, एक हजार वर्षांनंतर काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सद्यस्थितीचा अभ्यास करून तिला तोंड देण्यासाठी वर्तमानकालीन संदर्भाने कार्यक्रम आखला पाहिजे. 
 
त्यामुळे कुठल्याही संदर्भात विचार करताना काळाच्या खोलात जाऊन विचार करणे अशक्य आहे. एक गोष्ट मान्य केले पाहिजे, की सध्याचे सरकार आपल्या हिताचे नाही. एका प्रख्यात विचारवंताने म्हटले आहे, की परकिय सत्ता कधीच यशस्वी ठरत नाही. शिवाय ती टिकतही नाही. या मताच्या बाबतीत जुन्या आणि नव्या पिढीमध्ये मतभेद असायचे काही कारण नाही. परकीय राजसत्तेने आपला देश उध्वस्त केला आहे.
 
सुरवातीला आपण सर्वच जण भारावून गेलो होतो. या सत्तेला पूर्णपणे नतमस्तक झालो होतो. नवी राजसत्ता आपल्या भल्यासाठीच आली आहे, असा आपला समज झाला. तैमूरलंग आणि चेंगीजखान यांच्यासारख्या आक्रमकांपासून आपला बचाव करण्यासाठी ही इंग्रज राजसत्ता आल्याचे आपल्याला वाटले. बाहेरच्याच नव्हे तर अंतर्गत युद्धखोरीवर उपाय म्हणूनही ही सत्ता आपल्या देशात प्रस्थापित झाली, असा आपला समज करून देण्यात आला.
 
या सत्तेला हाकलण्यासठी आपल्याकडे शस्त्रे नाहीत, खरे तर त्याची गरजही नाही. आपल्याकडे एक प्रभावी राजकीय शस्त्र आहे, बहिष्काराचे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढे इंग्रज आपल्या देशात सरकार चालवतात, ते आपल्याच सहकार्यातून. आपणच त्यांच्या विविध कामात त्यांचे साह्य करीत आहोत. सध्या हे सर्व सरकार आपल्या सहकार्याने चालवले जात आहे.
 
सहकार्य करण्याच्या आपल्या शक्तीची आपल्याला जाणीव होऊ नये याची पुरेपुर काळजी हे सरकार घेत आहे. ही जाणीव झाल्यास हे सरकार आपणच चालवू अशी मागणी होईल, असे त्यांना वाटते. थोडक्यात या सत्तेचे पूर्ण नियंत्रण आपल्याकडे यायला हवे. आपण रहात असलेल्या घराची चावी आपल्या हातात हवी, परक्याच्या हातात नको. स्वराज्य हे आमचे उद्दीष्ट आहे, आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेवर आम्हाला आमचे नियंत्रण हवे आहे. केवळ कारकून व्हावे आणि कारकून म्हणूनच रहावे, हे आम्हाला मान्य नाही. सद्यस्थितीत आम्ही कारकून आहोत, आणि आमच्या नकळत आमचा वापर परकिय राजसत्तेकडून आपल्यावर दडपशाही करण्यासाठी होत आहे.
 
हे सरकार आपल्यावर त्यांच्या ताकदीद्वारे राज्य करीत नसून आपल्याला अंधारात ठेवून, वस्तुस्थितीची माहिती न देता राज्य करीत आहेत. प्राध्यपक सीले यांनी हा मुद्दा मांडलाच आहे. या देशातील प्रत्येक इंग्रजाला माहित आहे, आपण संख्येने कमी आहोत. त्यामुळेच आपण त्यांच्यापेक्षा कमकुवत आहोत, असा आपला समज करून देत आपल्याला मुर्ख बनविणे ही प्रत्येक इंग्रजाची राज्यकारभाराची पद्धत आहे. हेच राजकारण आहे. अशाच पद्दतीने अनेक वर्षांपासून आपल्यावर राज्य केले जात आहे.
 
त्यामुळेच तुमचे भवितव्य संपूर्णपणे तुमच्याच हातात आहे, याची जाणीव तुम्हाला व्हावी, हेच हा नविन पक्ष तुमच्यावर बिंबवू इच्छित आहे. तुमच्या मनात आपल्याला स्वातंत्र्य मिळावे, अशी इच्छा निर्माण झाली, तर तुम्ही स्वतंत्र होऊ शकता, पण तशी इच्छा झालीच नाही, तर तुम्ही पारतंत्र्याच्या खोल गर्तेत कोसळाल. तुमच्यापैकी अनेकांना आपल्या लढ्यासाठी शस्त्रांची निकड वाटत नसेल. पण तुमच्याकडे विरोधाची ताकद नसेल, तर तुमच्याकडे नकार देण्याची, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याची क्षमता उरणार नाही. परकीय सत्तेला आपल्यावर राज्य करण्यास तुम्ही असहकार्य करण्यालाच बहिष्कार म्हणतात. हेच आमचे राजकीय शस्त्र आहे. 
 
त्यांना महसूल गोळा करण्यात आणि शांतता राखण्यास आम्ही सहकार्य करणार नाही. भारतीयांच्या रक्तावर आणि पैशांवर देशाच्या सीमांवर आणि भारताबाहेर त्यांच्यासाठी लढण्यास आम्ही सहकार्य करणार नाही. न्यायकारभार चालविण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. आमची स्वतःची न्यायालये असतील आणि वेळ येईल, तेव्हा आम्ही करही भरणार नाही. तुम्ही तुमच्या संयुक्त प्रयत्नांनी हे करू शकता? तुम्ही हे करू शकलात, तर तुम्ही उद्यापासून स्वतंत्र व्हाल. कुणीतरी सदगृहस्थाने ही संध्याकाळ म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य विरूद्ध मर्यादीत स्वातंत्र्य असणाऱ्यांची असल्याचे सांगितले, पण मला पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे, तेही तातडीने. पण जर ते मिळत नसेल तर त्यासाठी थांबण्याची माझी तयारी नाही, असे समजू नका.
 
त्यांनी दिलेले मर्यादित स्वातंत्र्यही मी घेईन आणि उरलेले मिळविण्यासाठी प्रयत्न करेन. तुम्ही आपली विचार करण्याची पद्धत आणि कृती अशी बनवली पाहिजे. केवळ भावनांच्या उद्रेकातून आम्ही ही ओरड करतो आहोत असे नाही. तर त्याला काही कारणे आहेत. ही कारणे समजावून घ्या आणि आपली भावना तर्काच्या आधारे मजबूत करा. आंधळेपणाने माझ्या विचारांचे अनुकरण करा, असे मी म्हणत नाही. पण या प्रश्नांचा विचार करा. तुम्ही माझा सल्ला स्वीकारलात, तर तुम्ही या दास्यातून मुक्त व्हाल. हा आमच्या नव्या पक्षाचा सल्ला आहे. 
 
कदाचित आमच्या तत्वांना सगळ्यांची मान्यता नसेल. पण जुनी मते फार लवकर मातीला मिळतात. कॉंग्रेसमध्ये फूट पडावी अशी आमची इच्छा नाही, त्यामुळे आमच्या मतांना काही प्रमाणात मान्यता मिळाली एवढ्यावरच आम्ही समाधानी आहोत. याचा अर्थ आम्ही ही परिस्थिती पूर्णपणे स्वीकारली आहे, असे नाही. आम्ही पुढील वर्षी यापुढील पाऊले उचलू. ज्यायोगे आमच्या विचारांना मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळेल. त्यांचा प्रसार होईल. हा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल की येणाऱ्या पिढ्या आम्हाला मवाळ समजतील. या रस्त्यावरूनच देशाची वाटचाल होत आहे आणि या संघर्षातून हाच धडा आपणास घ्यायचा आहे. हा धडा आहे, प्रगतीचा, शक्य तेवढी स्वतःची स्वतःलाच मदत करण्याचा. हे विचार तुमच्यात रूजले, तुम्हाला पटले. तर आणि तरच तुम्ही स्वतःची परकीय दास्यातून मुक्तता करू शकाल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments