Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी

धर्मवीर संभाजीराजे यांच्याबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी
, शुक्रवार, 14 मे 2021 (08:31 IST)
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ झाला होता. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
 
राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीं महाराजांचा सांभाळ त्यांची आज्जी राजमाता जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. 
 
संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. 
 
मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
 
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. 
 
मुद्रा व दानपत्र
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.
 
संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे.
 
संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.
 
१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला तेव्हा मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेण्यात आले जेथे संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. 
 
औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना धर्मवीर हे पदवी बहाल केली गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कामासाठी नाराजी धरायची नसते, मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची प्रथा नाही : जयंत पाटील