Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हेल्मेटचा अतिरेक चुकीचाच

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:54 IST)
देशात लवकरच दुचाकी वाहनांवरून डबलसीट जाणाऱ्या लहान मुलांना देखील हेल्मेट सक्तीचे करण्यात येणार असल्याची बातमी आहे, गेल्या काही वर्षांपासून सर्व ज्येष्ठांना तर हेल्मेटसक्ती आहेच, आ
ता लहान मुलानांही सक्तीचे होणार म्हटल्यावर जनसामान्य अस्वस्थ झालेले आहेत.
 
या विषयावर काही भाष्य करायचे तर त्यापूर्वी सरकारची हेल्मेटसक्ती मागची नेमकी भूमिका काय सांगितली जाते ते समजून घेणे गरजेचे आहे. स्वयंमचालीत दुचाकी वाहनाचा अपघात झाला, तर दुचाकीवर बसलेली व्यक्ती डोक्याच्या भारावर खाली पडते, अश्यावेळी डोक्याला जबर मार लागण्याची शक्यता असते, डोके हे शरीराचे अत्यंत नाजूक अंग मानले जाते, अश्या अपघातात डोक्याला मार लागला तर ते जीवावर बेतण्याची शक्यता असते, त्यामुळे दुचाकी चालवताना चालक किंवा सोबत बसलेली व्यक्ती या दोघांनीही हेल्मेट वापरावे असा प्रशासनाचा आग्रह असतो. उत्तम दर्जाचे हेल्मेट वापरल्यास अपघात होऊन माणूस डोक्याच्या भारावर पडलाही तरी हेल्मेट डोक्यात असल्यामुळे, डोक्याला फारसा मार लागत नाही, परिणामी माणूस वाचतो, असे म्हटले जसते. ही बाब लक्षात घेऊन हेल्मेटची सक्ती केली जाते आहे.
 
हा मुद्दा लक्षात घेता अपघात झाल्यास डोके वाचविण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे म्हणून हेल्मेट सक्ती केली जाते, असा दावा केला जात आहे. असे असले तरी अपघात टाळले तर माणूस पडण्याचा आणि डोक्याला इजा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, हा मुद्दा कुणीच लक्षात घेत नाही. मुळात अपघात होण्याची कारणे लक्षात घ्यायला हवी, अपघाताला कारणीभूत आहे ते वाहन चालकांचे बेशिस्त वर्तन, रस्त्याने बघितल्यास वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणारे वाहनचालक दिसून येतात. रस्त्यावर अपघात होऊ नये, म्हणून वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहेत, हे नियम पाळणारे फार थोडे वाहनचालक आम्हाला दिसून येतात, बाकी बहुतेक सर्व नियम धाब्यावर बसवणारेच असतात. रस्त्याने डाव्या बाजूने वाहने चालवावी असा नियम असतानाही उजव्या बाजूने रॉंग साईड गाडी आणणारे अनेक विद्वान आम्ही बघतो. नियमानुसार जायचे तर मोठा चक्कर घ्यावा लागतो, म्हणून सर्रास रॉंग साईड गाडी काढली जाते. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सिग्नल्स लावण्यात आले आहेत, त्या सिग्नलने दिलेले इशारे आम्ही कधीच पाळत नाही, लाल लाईट असतानाही आम्ही बिनधास्त सिग्नल तोडून निघून जातो, वाहतुकीचे इतरही नियम आम्ही वारंवार धाब्यावर बसवतो.
 
आमच्या देशातील रस्त्यांची दुर्दशा हीदेखील अपघातांना कारणीभूत ठरते, अनेक ठिकाणी रस्ते खणून ठेवलेले आहेत. अनेक रस्त्यांवरील गिट्टी आणि डांबर उखडून गेलेले आहे, या गड्ड्यांमध्ये अनेकदा वाहने उसळून अपघात होतात. मात्र वर्षानुवर्षे हे खराब झालेले रस्ते कधीच दुरुस्त केले जात नाही. या रस्त्यांवर अनेक अपघात होतात, त्यावेळी आंदोलन केले जाते मात्र तात्पुरती मलमपट्टी करून जनभावना शांत केली जाते, कायमस्वरूपी इलाज कधीच केला जात नाही. आज अनेक रस्त्यांवर टोल वसूली केली जाते, टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदाराकडे त्या रस्त्याची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे ही जबाबदारी टाकलेली असते, मात्र हे टोल वसूल करणारे कंत्राटदार दुरुस्ती कधीच करीत नाहीत. त्याचे परिणाम मात्र रस्त्याने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना भोगावे लागतात.
 
रस्त्यावर होणारी अतिक्रमणे हेदेखील अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. आपल्याकडे रस्त्याच्या बाजूने बांधलेले फुटपाथ हे पायी चालणाऱ्या व्यक्तींसाठी राखीव असतात, मात्र या फुटपाथवर बेकायदेशीर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात केलेली दिसतात. महानगरांमध्ये छोटे विक्रेते कायम फुटपाथवर ठाण मांडून बसलेले असतात, याशिवाय देखील अनेक ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झालेले दिसून येते, या अतिक्रमणांमुळे वाहनचालक आणि पादचारी या दोघानांही चालायला किंवा वाहने चालवायला पुरेशी जागाच राहत नाही, ही बेशिस्त गर्दी बरेचदा अपघातांना निमंत्रण देत असते. याशिवाय रस्त्यावर उभी असलेली बेकायदेशीर वाहने आणि रस्त्याने स्वैर धावणारी गुरेढोरे हेदेखील अपघाताचे कारण ठरू शकतात.  
 
ही सर्व कारणे सामान्य माणसापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनाच ठावूक आहेत, मात्र या दृष्टीने कधीही प्रयत्न केला जात नाही. ना कधी रस्त्यांची दुरुस्ती होत, ना कधी अतिक्रमणे हटवली जात, ना कधी सर्वसामान्य वाहनचालकांना नियमानुसार वाहने चालवावी असा आग्रह धरला जात, त्यामुळे सगळंच काही बेशिस्त काम सुरु असते, त्यामुळे अपघात वाढतात.
 
वाहतुकीचे सुरळीत संचलन व्हावे, यासाठी सरकारने वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. या पोलिसांनी चौकात उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करावे आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असते, मात्र नागपूर शहरात बघितल्यास बहुतेक सर्व पोलीस चौकातील एखाद्या झाडाखाली बसून निवांत गप्पा मारत असतात. तिथे काही नियम तोडणारे दिसले तर त्यांचे चालान बनवणे किंवा मग चालान न बनवता चिरीमिरी घेऊन सेटल करणे हे काम हे पोलीस करत असतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागतच नाही. त्यातून बेशिस्त वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढत जाते.
 
खरेतर हेल्मेट हे सुरक्षाकवच आहे, हे वापरायचे किंवा नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे, मात्र याची सक्ती केली जाते,  खराब रस्ते, अतिक्रमण किंवा बेशिस्त वाहनचालक यामुळे अपघात झाले तर इतरांना त्याचा धोका आहे. त्यामुळे खरी कारवाई अश्या बेशिस्त वाहनचालकांवर व्हायला हवी. मात्र आमचे वाहतूक पोलीस फक्त हेल्मेट न घालणारे वाहनचालक पकडतात, आणि त्यांना दंड ठोठावतात. हेल्मेट वापरले नाही म्हणून अपघात झाला असे होत नाही. आणि हेल्मेट डोक्यात नसले तर फक्त वाहनचालकाला इजा होते, त्याचा रस्त्यावरील इतर कुणालाही उपद्रव होत नाही. तरीही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई न करता फक्त हेल्मेट न घालणार्यावरच कारवाई का केली जाते? हे अनाकलनीय गुढ आहे.
 
हेल्मेट सक्तीबद्दल आक्षेप घेतला की न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली जाते. मात्र रस्ते दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवणे, याबाबतही न्यायालयाचे आदेश आहेत, हे आम्ही विसरतो. जर रस्ते नीट दुरुस्त झाले, आणि रस्त्यावर अतिक्रमण नसले तर अर्धे अपघात कमी होतील, मात्र त्यासाठी आमचे प्रशासन काहीही करत नाही.
 
हेल्मेट हे वजनदार आहे ते डोक्यावर चढवल्यावर अनेकांच्या मानेच्या हाडांवर परिणाम होऊ शकतो, काहींना स्पॉण्डिलायटिस सारखे आजारही असतात, त्यांना हेल्मेट वापरले तर भर रस्त्यात चक्कर येण्याचीही भीती असते, मात्र याचा आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही फक्त हेल्मेटची सक्ती करतो, परिणामी अनेकांना स्कुटर चालवण्यापासून वंचित राहावे लागते.
 
या सर्व बाबी लक्षात घेता अपघात टाळायचे असतील, तर चांगले रस्ते रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवून मोकळे केलेले रस्ते, आणि शिस्त पाळणारे वाहनचालक ही खरी गरज आहे. मात्र यातील कोणत्याही बाबीवर विचार न करता हेल्मेटची होत असलेली सक्ती म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असाच प्रकार म्हणावा लागतो. दुर्दैवाने आपल्या देशात असाच प्रकार वारंवार होतो आहे.
 
हे सर्व मुद्दे लक्षात घेता हेल्मेट सक्ती तर निरर्थक आहेच, मात्र त्याचबरोबर आता लहान मुलांनाही हेल्मेटची सक्ती हा निव्वळ बालिशपणा आहे, हे स्पष्ट होते आहे, प्रशासनाने आणि समाजाने आतातरी याचा विचार करावा, हे अपेक्षित आहे.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
अविनाश पाठक

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेस नेते भाई जगतापच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा हल्लाबोल

भाई जगतापविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार, असा अपमान सहन करणार नाही म्हणाले किरीट सोमय्या

रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये एसीबीचा छापा, दोन पोलिसांना अटक

यवतमाळमधील 104 सेतू केंद्र चालकांना नोटीस, ग्राहकांकडून जास्त पैसे घेतल्याचा आरोप

पुढील लेख
Show comments