Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात प्लेगच्या साथीत जेव्हा जीवाचं रान केलं

Webdunia
बुधवार, 3 जानेवारी 2024 (10:54 IST)
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
 
मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते.
 
जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.
 
जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.
 
मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.
 
पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.
 
यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार
सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.
 
हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.
 
महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या मोहम्मदवाडी, सासणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.
 
हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. विशेषतः मुली आणि महिला घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
 
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं.
 
ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.
 
पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
 
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.
 
रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण
सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.
 
मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
 
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
 
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.
 
सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष
आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हुतात्म पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.
 
पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.
 
एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
 
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.
 
साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.
 
माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.
 
पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
 
१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)
 
(बीबीसी मराठीने 2020 मध्ये डॉ. हरी नरके यांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीवर आधारित. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे.)
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला घ्यावी लागणार माघार?

LIVE: महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणाले-किरीट सोमय्या

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महायुतीचा विजय सहन नाही झाल्याने संजय राऊतांनी मानसिक संतुलन गमावले-किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments