Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'न्यूनगंडा'चे 'नवनिर्माण'

- अभिनय कुलकर्णी

Webdunia
मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते.

मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही.

  बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही?      
वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे.

या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही.

' मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे.

मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.

बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही?

आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही.

मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो.

ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी ' मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेवेळी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन सुरू केले होते. पुढे ते आंदोलन आपोआप थंडावलेही गेले. कारण दाक्षिणात्यांना विरोध करून मराठी माणसाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळले. आता. राज युपी व बिहारी लोकांना विरोध करून त्याच ' न्यूनगंडा'चे 'नवनिर्माण' करताहेत. पण या मुंबई बदलली आहे. मराठी माणसाचीची मानसिकता बरीच बदलली आहे हे राज यांनी आता लक्षात घ्यायला हवे.

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

Show comments