Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातृभाषा महती

- प्र. ग. सहस्त्रबुद्धे

Webdunia
मराठी असे आमुची मायबोली, म्हणाया जरी राज्यभाषा असे
घरी आणि दारी कुणी ना विचारी अनाथपरी दीन दु:खी दिसे
गुळाचा कळे स्वाद ना गाढवांना, उकिर्डेच ते नित्य धुंडाळती
तसे हा! मराठीस सारुनि दूरी किती मूढ हे विंग्रजी भुंकती।।1। ।

मुलांना, मुलींना शिशुंना जया आंग्लभाषेत शिक्षा दिली
अतिक्लिष्ट भाषा महाशत्रुभाषा जयांनी स्वपाल्यावरी थोपली
तयांनी गणा आत्मजांचीच जिव्हा स्वहस्ते असे कापिली छाटली
तयांनी घराला, यशाला, सुखाला स्वहस्तेच की आग हो लावली।।2।।

' घरामाजी बाहेर बोलेन भाषा मराठीच' या आग्रहाते धरा
शुभेच्छा, क्षमेच्छा, तशी स्वागतेच्छा मराठीमधे सर्व काही करा
मराठीमधये सांगता येत नाही असे या जगामाजि काही नसे
मराठी फिकी इंग्रजीच्या पुढे या महान्यूगंडास सोडा कसे।।3। ।

मराठी असो गुर्जरी कानडी वा तुळू तेलगू तामिळीही असो
असो ओरिया बंगला आणि हिन्दी असामी तशी कोंकणी का असो
असू द्यात वाणी गुरुंच्या मुखींची, असू द्यात मल्याळ सिंधी असो
गणू या स्वदेशी स्वभाषाच आम्ही परंतु कुठे विंग्रजी ती नसो।।4 । ।

अहो इंग्रजी एक कृत्या म्हणावी तिने सर्व देशास या भक्षिले
तिने एकता भंगिली भारताची तिने भांडणाते असे रोविले
तिने प्रान्त भाषांत बांधून भिंती आम्हाला न एकत्र येऊ दिले
अहो राक्षसीला त्वरें घालवा त्या, तरी रक्षु स्वातंत्र्य संपादिले ।।5 ।।

अमांगल्यपूर्णा, अभद्रा दरिद्रा, महाबोबडी तोकडी जी असे
अतिक्रूरकर्मी जगी क्रौर्यधर्मी खळा-राक्षसांचीच भाषा असे
जरी प्राण कंठास आले तरीही कधी यावनी भाष बोलू नका
ऋषींचे मुनींचे विचारीजनांचे असे सांगणे तुच्छ मानू नका।।6।।

जगामाजि भाषा अनेका अनेका परिश्रेष्ठ ती मातृभाषा असे
तिचा मान सन्मान वा स्थान घेण्या जगी या कुणी अन्य भाषा नसे
तशातून शास्त्रे-कला-ज्ञानपूर्णा महाशक्तीशाली मराठी असे
शिकाया जगाची कुणी अन्य भाषा गणा मातृभाषाच किल्ली असे।।7। ।

निमंत्रावया लग्न मुंजीस आली, अशी छापिली सुंदरा पत्रिका
कळेना अमांगल्यपूर्णा अभद्रा करंट्या अशा आंग्लभाषेत का?
नवे वर्ष दीपावली पुत्रजन्मी शुभेच्छा कुणाला कुणी धाडती
अशाही प्रसंगी पहा मोठमोठे, स्वभाषा न हा! विंग्रजी योजिती।।8।।

मराठी असे हो जरी मायबोली, न ये ज्ञानदेवी तयां वाचता
न ये नामदेवी तुकाराम गाथा, न ये श्लोक आर्यादि उच्चारता
जरी पत्र आले मराठीत साधे तयालागि ते येईना वाचता
शिरी बैसली विंग्रजीनाम कृत्या तिला येईना हो मुळी फेकता।।9।।

पुरी, पेठ वा मार्ग, यांना कशाला हवे नाम त्या भ्रष्ट भाषेतले?
घराला, स्वनामांकिता पट्टिकेला,लिहीता स्वभाषेत का वांगले?
दुकानाप्रती नाम काहो विदेशी? धनप्राप्तीची पावती विंग्रजी
किती रंग ते, अंक वा स्वाक्षरीही अजूनी पहा विंग्रजी घासती ।।10। ।

कुणी सांगती ती असे विश्वभाषा, तिचे ग्रंथभांडार मोठे असे
अहो ज्ञानविज्ञान स्थापत्य वैद्यादि शास्त्रे तिच्यावीण येती कसे ?
तिच्यावीण न्यायालयां मूकता ये तिच्यावीण आदेश देता नये
असे सर्व मिथ्या तया विंग्रजीला म्हणावे 'करी तोंड काळे बये'।।11।।

अरण्यामध्ये खावया रामरायवारी जेधवा ताडका धावली
' न किंतू धरी, ठार मारी तिला तू' गुरुंनी अशी स्पष्ट आज्ञा दिली
तदा राघवाने शराधात केला, जशी दुष्ट ती राक्षसी मारिली
तशी देशव्यापी महाताडका ही, हिला पाहिजे आज संहारिली।।12।।।

शिशु बालकां ठार मारावयाला जिला पाठवी कंस वृंदावनी
किती लाघवी बोलणे चालणे हो विषाला परी चोपडी स्वस्तनी
यशोदासुताने बया पूतनेला, तिच्या दुष्ट हेतूसवे मारिले
तसे इंग्रजीरुप या पूतनेला यमाच्या घरी पाहिजे धाडले।।13। ।

कुणी सांगती तीस संपर्क भाषा, महापापसंपर्क ती जोडते
करी भेद निर्माण प्रांतात भाषांत, आम्हामधे फूट ती पाडते
स्वदेशीय भाषांस धिक्कारूनी जे, अहो विंग्रजीला महामानती
कसे स्वाभिमानास टाकून देती किती सन्मती जाहले दुर्मती ।।14।।

मराठी असे आमुची मायबोली, तिला रज्य का? विश्वभाषा करू
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे तिच्यामाजी आणोन आम्ही भरू
पुन्हा पेटवू स्वाभिमानस आम्ही पुन्हा एकदा शौर्य धैर्या धरू
मराठीस तारू, स्वदेशास तारु सुखी विश्व होईल ऐसे करु ।।15।।

मराठी असे सर्वथा श्रेष्ठ भाषा जिने गाजविल्या दहाही दिशा
तिचे पुत्र आम्ही कसे साहताहो, कशी जाहलीसे तिची दुर्दशा
मनी आठवू भक्त श्रीनामदेवा, गुरुग्रंथसाहेब जो भूषवि
रघुनाथरावास त्या पेशव्याला, मराठीस सिंधूवरी पोचवी।।16। ।

अहो आठवा संत ते मानभावी जयांनी दिशा दक्षिणी जिंकली
तसे काबुली कृष्णभक्तांस त्यांनी असे धर्मभाषा मराठी दिली
मराठी असे अमृताचीच थाळी जिला ज्ञानदेवें स्वयं रांधिली
तिची पाहिजे हो ध्वजा उंच केली,
पुन्हा उच्च ‍स्थानी तिला स्थापिली ।।17।।
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

Show comments