चित्रपटाची आवड सचिनच्या गुणसूत्रातच असावी. कारण त्याचे वडिल या क्षेत्रातच होते. त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरवातही फार लवकर म्हणजे बालकलाकार म्हणून झाली. बालकलाकार म्हणून त्याने पन्नासेक चित्रपटात काम केले आहे. अगदी रमेश सिप्पी यांच्या 'शोले' चित्रपटातही तो झळकला होता.
शोलेपासून ते राजश्री प्रॉडक्शनच्या 'नदिया के पार' पर्यंत अनेक हिंदी चित्रपटात त्याने भूमिका केल्या. सुरवातीस हिंदीत अभिनय केल्यानंतर आपला मोर्चा मराठीकडे वळविला. चित्रपट दिग्दर्शन, अभिनयात नवनवीन प्रयोग केले.
' नवरी मिळे नवरयाला, भूताचा भाऊ, अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, आत्मविश्वास, गंमत जंमत, कुंकू, दोन वर्षापूर्वीच येऊन गेलेला ' नवरा माझा नवसाचा' हे त्याचे चित्रपट. प्रामुख्याने विनोदी चित्रपटांवर त्याचा भर राहिला. कारण असे चित्रपट हाताळणी ही त्याची खासीयत आहे.
कमी कालावधीत सलग आठ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे यश त्याचे नावे आहे. त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट नवीन प्रयोगांसोबतच भन्नाट कथा कल्पना, संकल्पना व निखळ मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटाची गती राखून, संगीताचा उत्कृष्ट वापर, प्रसंगांची छान गुंफण ही त्याच्या दिग्दर्शकीय शैलीची वैशिष्ट्ये आहेत.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्याची केमिस्ट्री अधिक जुळली. सचिन कलेचा निस्सीम भक्त असला तरी त्याचे व्यावसायिक गणित घट्ट असते. उत्कृष्टतेचा ध्यास धरताना त्याने व्यावसायिक बाबींवरचे लक्ष सुटू दिले नाही. सचिन सध्या हिंदीत रमला आहे.
अनेक मालिकांची निर्मिती व त्यात अभिनय केल्यानंतर सांगीतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनहनही त्याने केले. 'नच बलिये' ही नृत्याची स्पर्धा पत्नी सुप्रियासह जिंकून त्याने अभी तो मै जवान हूँ हे दाखवून दिले आहे.
नवनवीन संकल्पना राबवून दूरचित्रवाणी मालिकांमध्ये वैविध्य आणण्याचा त्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. दुरदर्शनवरील 'तू तोता मै मैना' ही मालिका सध्या सुरू आहे.
सचिनने काही चित्रपट- भुताचा भाऊ आत्मविश्वास गंमत जंमत नवरा माझा नवसाचा अशी ही बनवा बनवी नवरी मिळे नवरयाला