Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ह्रदयाला भिडतं ते खरं गाणं

आरती अंकलीकर - टिकेकर

Webdunia
प्रश्न : गाणं तेही शास्त्रीय करण्यामागची नेमकी प्रेरणा कोणती?
उत्तर : आई-वडील तसे गाणारे. मी गाणं शिकावे हा सर्वप्रथम त्यांचा आग्रह. सुरुवातीला काहीसं जबरदस्तीने स्वीकारावं लागलेले हे व्रत नंतर आवडीचं झालं, लाडकं झालं. वडील जबरदस्तीनं बसवून रियाझ करवून यायचे. नंतर त्याचं गांभीर्य कळलं.

प्रश्न : किशोरीताईंना गुरु करण्यामागील साक्षात्कार तुमचा स्वतःचा की तुमच्या वडीलधाऱ्यांचा?
उत्तर : मला एनसीपीएची केसरबाई केरकर ही शिष्यवृत्ती मिळाली व प्रत्यक्ष पु. लं. नी च किशोरीताईंना गुरु करावं असा सल्ला दिला. मग रीतसर शिकणं सुरू झालं.

Madhuri
प्रश्न : किशोरीताईंची तुम्हाला जाणविलेली वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : किशोरीताईंचं गाणं पेलायला जड आहे. बुद्धिमत्तेच्या व गायकीच्या कसोटीवर अतिशय तरल असं हे गाणं केवळ सुप्रीम या विशेषणाने गौरवावे लागेल.

प्रश्न : तुम्ही किती वर्षे त्यांचं मार्गदर्शन घेतले आहे?
उत्तर : मी किशोरीताईंकडे दीड वर्षे गेले. नंतर मी पुन्हा वसंतराव कुळकर्णींकडे जायला लागले.

प्रश्न : तुमच्या मते श्रेष्ठ गाणं कोणतं? शास्त्रीयतेच्या कसोटीवर उतरणारं की अधिकाधिक श्रोत्यांना भावणारं, मेलोडियस......
उत्तर: ह्रदयाला भिडणारं गाणं हे सर्वश्रेष्ठ गाणं. जे ह्र्दयातून येतं ते ह्र्दयाला भिडतंच. किशोरीताईंचं गाणं हे चौकटीपलिकडचं गाणं आहे असं मला वाटतं.

प्रश्न : तुम्ही स्वतःच्या गाण्यासंदर्भात तृप्त आहात का?
उत्तर : माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी स्वतःला संगीताच्या संदर्भात के. जी. तील विद्यार्थिनी समजते. अजून खूप सारं करायचं. आयुष्याच्या पलिकडे संगीत आहे. रागाच्या पलिकडे संगीत आहे. संगीताला कसलीच बांधिलकी नसते.

प्रश्न : घराणेदार गायकीवर तुमचा कितपत विश्वास आहे?
उत्तर : मला फक्त गायकी आवडते. परंतु, घराणेदार गायकी गायनाला शिस्त लावत असते म्हणून तिचेही महत्त्व डावलता येत नाही. परंतु, गाणं शास्त्राच्याही पलिकडे जायला हवंय.

प्रश्न : तुम्हाला आजच्या घडीला या क्षेत्रातील कोणत्या गायक-गायिका भावतात?
उत्तर : उल्हास कशाळकर, अश्विनी भिडे, रशिद खान हे मला आवडतात.

प्रश्न : आदर्श गुरुंची तुमच्या मनातील प्रतिमा कशी आहे?
उत्तर : शिष्यांचं अधिक-उणं ओळखून त्याला मार्गदर्शन करणारा, जीवनावर प्रभाव पाडणारा, सहवासपल्याड पुरून उरणारा तो गुरु. तसंच आपल्या शिष्याला पुरेसं स्वातंत्र्य देणारा. प्रसंगी दुसरीकडे जा! असं सांगणारा खरा गुरु असं मी म्हणेन. मात्र, गुरुचा शिष्याला दराराही वाटायला हवाच.

प्रश्न : गुरुला शिष्य कसा आवडतो?
उत्तर : अर्थातच आज्ञाधारक. पण बंडखोरी करणाराही षिष्य त्याला आवडतो. परंतु आपल्यापेक्षा हुषार विद्यार्थी त्यांना क्वचितच आवडतो. अर्थात असेही प्रसंग घडतात. गुरुला शिष्य आपली गायकी अनुसरणारा, आपल्या इच्छेनुरूप गाणाराच आवडतो. बंडखोरपणाही जर त्याच्यापाठी बंडखोरी करण्याची लायकी असेल तरच ती बंडखोरी गुरुला सुसह्य होते.

प्रश्न : आदर्श शिष्य कसा असावा?

उत्तर : तो उत्तम गवई असावाच. म्हणजे गाण्याचा गळा असलेला. कुठल्याही कष्टाची तयारी असणारा. गळा व बुद्धी दोन्ही बरोबरीने असणारा शिष्य हा आदर्श शिष्य.

प्रश्न : तुम्ही गाण्यातल्या सुरेलपणाला मेलडीला गुण द्याल की बुद्धिमान गायकीला?
उत्तर : गाणं ह्र्दयाला भिडणारं असावं. तसं गोड गळा व बुद्धिमत्ता ही दोन्ही अस्त्र उत्तम गायकीचं लक्षणं मानते मी. उत्तम गायकाजवळ कमाल संवेदनशीलता असायला हवी. संगीतशरणता त्याच्या ठायी हवी.

प्रश्न : ऐकण्याच्या व्यासंगावर तुमचा विश्वास आहे. या संदर्भात पाश्चात्य संगीताबद्दल आपल काय मत आहे?
उत्तर : संगीत ऐकलच पाहिजे. पण पाश्चात्य संगीत मला तेवढं भावत नाही म्हणून ऐकलंही जात नाही. खरं सांगायचं तर पुरेसं मनसोक्त गाणं ऐकायला पुरेसा वेळही मिळत नाही.

प्रश्न : आपल्यापेक्षा वरचढ शिष्य असेल तर गुरुचा अहंकार दुखावला जातो. पण त्याचं श्रेष्ठत्व मान्य करण्याचा मोठेपणा गुरू कसा दाखवतो ?
उत्तर : शिष्यानं आपल्याकडे कितपत शिकावं हे अशावेळी गुरुने ठरवावं. नव्हे ते त्याला ठरवता आलं पाहिजे व ही कबुली प्रत्यक्ष देण्याची गरज नसते.

- माधुरी अशिरगडे
सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

Show comments