Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'जोगवा'ची तळमळ लोकांपर्यंत पोहोचावी- राजीव पाटील

Webdunia
PR
सध्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आणि प्रत्यक्ष थिएटर्समध्येही जोगवा हा चित्रपट गाजतो आहे. त्यावर चर्चाही होते आहे. याचसंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद...

' जोगवा'चा विषय कसा काय सुचला?
- इथे मी योगायोग नाही म्हणणार; पण अगदी अनपेक्षितपणे हा चित्रपट माझ्यासमोर आला. त्याचे असे झाले की, माझे मित्र संजय पाटील ज्यांनी या चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते लिहिली आहेत, त्यांच्याकडून हा विषय माझ्यासमोर आला. संजय पाटील हे स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांनी डॉ. राजन गवस यांच्या 'चौंडक' आणि भंडारभोग या कादंबर्‍या व चारूता सागर यांच्या 'दर्शन' ही कथा अशा तीन साहित्यकृतींवर आधारित एक पटकथा लिहिली होती आणि या पटकथेवर आधारित चित्रपट तयार व्हावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. हा चित्रपट मी दिग्दर्शित करावा असे त्यांना वाटले आणि त्यांनी ही पटकथा माझ्यासमोर ठेवली. पटकथा वाचत असतानाच त्यामध्ये असलेले विषयाचे महत्व लगेच जाणविले आणि मनातल्या मनात चित्रपट आकाराला येऊ लागला. त्याचवेळेला या कथेमध्ये दडलेली प्रेमकथा मला जाणवली. याबाबतीत श्री. पाटील यांच्याबरोबर बसून चर्चा केली आणि त्यामधून 'जोगवा' आकाराला आला.

जोगवाच्या कलाकारांच्या निवडीबद्दल काय सांगाल?
- ' जोगवा'साठी असे कलाकार पाहिजे होते की, ज्यांना सामाजिक जाणीवेचे भान असेल. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक असणे देखील तितकेच गरजेचे होते. उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम, विनय आपटे, प्रमोद पवार, अदिती देशपांडे, अमिता खोपकर या मंडळींनी रंगमंचावर काम केलेले आहे. आणि रंगमंचावर काम करणारे कलाकार आपल्या भूमिकेशी नेहमीच प्रामाणिक असतात.शिवाय एखादी कसलेली भूमिका करण्यासाठी तितक्याच ताकदीचा कसलेला नट मिळाल्यास त्या भूमिकेचे खर्‍या अर्थाने चीज होते, असे मला वाटते. उपेंद्रच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचं व्यक्तिमत्व हे खूप वेगळं आहे. ताय्यपाची भूमिका उपेंद्रच योग्यरित्या साकारू शकतो, असे कुठेतरी आतून जाणवत होते. या भूमिकेला अगदी शंभर टक्के न्याय उपेंद्रने दिला आहे, याचे मला खूप खूप समाधान आहे. प्रेक्षकांनादेखील या आगळ्या वेगळ्या भूमिकेतला उपेंद्र निश्चितपणे आवडेल याची मला खात्री आहे.

जग झपाट्याने पुढे जात आहे आणि तुम्ही मात्र तुमच्या चित्रपटांमधून जुन्याच विषयांना हात घालता आहात. जसे 'सावरखेड'मध्ये एका आदिम जमातीविषयी नि आता 'जोगवा'मधून जोगर्‍या- जोगतिणी विषयी.... तर यामागे तुमचे काही खास '‍‍‍फॅसिनेशन' आहे का?

- '‍‍‍ फॅसिनेशन'वगैरे काही नाही. मुळात 'सावरखेड' हा एक थ्रिलर चित्रपट होता. त्यामध्ये ज्या जमातीविषयी दाखविले गेले, ती एक चोरी करणारी जमात म्हणून ओळखली जाते. मुळातच कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी भीती पसरवितो आणि त्या भीतीच्या सावटाखाली गावातील पर्यायाने सामाजिक वातावरण कसे गढूळ होऊन जाते, याविषयी 'सावरखेड'मधून सांगितले आहे. अगीच अलिकडचे उदाहरण सांगायचे झाले, तर नुसत्या 'स्वाईन फ्लू'मुळे आपल्या समाजात किती भीती पसरली. पण याच बाबतीत जर मलेरिया, न्युमोनियाचे बळी गेलेल्यांची संख्या बघितली तर ती जास्त गंभीर आहे. पण याचा विचार कोण करतो.

' जोगवा'च्या विषयाचा विचार केल्यास, मला तरी ही एक अमानवी, क्रुर प्रथा वाटते. देवाला मुलं वाहायची आणि या मुलांनी आपलं सारं जीवन जोगत्या - जोगतिणीच्या स्वरूपात काढायचं ही कल्पनाच खूप भयंकर आहे. या समाजातील बहुसंख्य लोकांना आपल्यावर लादलेल्या या आयुष्याचा तिटकारा आहे. त्यांनादेखील सर्वसामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. त्यांचेदेखील स्वतःचे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत. पण आपलं- दुर्दैव असं की, च्यासाठी काम करायला संस्थाच तयार होत नाहीत.आज आपण आपल्या देशाला प्रगत देश म्हणतो, त्यात महाराष्ट्राचा उल्लेख प्रगत राज्य म्हणून करतो. आज २००९ साली देखील आपल्या देशात, राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांचे आयुष्यच उद्‍्‌ध्वस्त व्हावे यासारखी शरमेची गोष्ट नाही.

दुसरे असे की, मराठीत या विषयावर आजपर्यंत चित्रपट आले असले, तरीही त्यांच्या समस्येविषयी कुणीच गांभीर्याने भाष्य केलेले नाही. 'जोगवा'च्या निमित्ताने या समस्येला कुठेतरी वाचा फुटेल किंवा त्यामागची तळमळ जरी लोकांपर्यंत पोहचली तरी खूप आहे.

तुमच्या या विचारांना विरोध केला जाईल असे वाटत नाही का तुम्हाला?
- प्रत्येकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते. निव्वळ बोलायचं म्हणून मी सांगत नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने मी कित्येक जोगत्या- जोगतीणीच्या संपर्कात आलो, त्यांच्याशी बोलल्यानंतर जे जाणविले, तेच लोकांपर्यंत पोहचविण्याचा माझा मानस आहे.

पटकथा, संवाद, गीत या तीनही गोष्टींची जबाबदारी तुम्ही संजय पाटील यांच्याकडे सोपविली, यामागे काही खास कारण?
- अगोदर सांगितल्याप्रमाणे संजय पाटील हे स्वतः उत्तम लेखक आहेत. 'जोगवा'च्या पटकथेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी ते गेले अनेक वर्षे अभ्यासदेखील करीत होते. जेव्हा एखा़द्याला एखाद्या विषयाची सखोल माहिती असते, तेव्हा सार्‍या गोष्टी अधिक परिणामकारकरित्या प्रकट होतात, हे संजय पाटील यांनी या निमित्ताने सिद्ध करून दाखविले आहे, यात शंकाच नाही.

हा चित्रपट ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व थरांतील प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून काही खास योजना राबविणार आहात का?
- ते काम माझे नसून निर्मात्यांचे आहे. हा चित्रपट 'आयड्रीम प्रॉडक्शन' तर्फे निर्मित झालेला आहे. ही एक हिंदीतील प्रथितयश निर्मिती संस्था आहे. चित्रपट सर्व लोकांपर्यंत पोहचावा म्हणून माझ्या मनातल्या ज्या काही कल्पना होत्या, त्या मी निर्मात्यांसमोर मांडलेल्या आहेत. एकूणच, संस्थेचा अनुभव लक्षात घेता मला खात्री आहे की, चित्रपट प्रेक्षकांपर्यंत निश्चितच पोहचेल.

एक दिग्दर्शक या नात्याने तुम्ही स्वतः या चित्रपटाबाबत किती समाधानी आहात?
- मी कायमच चित्रपटाचा विचार करीत असतो. त्यामुळे चित्रपटाशिवाय दुसरे कुठलेच काम मी करीत नाही. जसे चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी योग यावा लागतो; तसेच चांगला चित्रपट घडून येण्यासाठी चांगल्या गोष्टी जुळून येणेंखील आवश्यक आहे. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीत, छायाचित्रण आणि अभिनय या सर्वच बाबतीत उत्तम तेच गवसल्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून मी या चित्रपटाबाबत मनापासून समाधानी आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments