Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंकशास्त्रानुसार रोगनिदान कसे कराल जाणून घ्या

अंकशास्त्रानुसार रोगनिदान कसे कराल जाणून घ्या
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (10:44 IST)
क्रमांक 1 : ज्यांची जन्मतारीख 1,10, 19, 28 आहे, अशा जातकांंचा क्रमांक एक असतो. एक क्रमांकावर रवीचा प्रभाव असतो. या लोकांना नेत्रविकाराचा त्रास संभवतो. अशा लोकांनी टीव्ही अगदी जवळून पाहू नये. तसेच ठराविक अंतरावर पुस्तक वा वर्तमानपत्र ठेवून वाचन करावे. प्रखर सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर घेऊ नये.  
या लोकांनी विशेष करून कामानिमित्त होणारी दगदग टाळावी, अन्यथा ब्लडप्रेशर वा हृदयविकारापासून त्रास होण्याची शक्यता असते.
 
जन्मतारीख 1 व 10 असणार्‍यांना पित्त वाढणे, त्यामुळे डोके दुखणे, तसेच बौद्धिक कामे केल्याने थकवा येणे, बुद्धीवर ताण पडणे, पर्यायाने हृदयावर ताण पडणे, रक्ताभिसरणावर ताण येणे, त्यामुळे खूप वेळा खूपच कठीण परिस्थिती निर्माण होते. जन्मतारीख 19 व 28 असलेल्या व्यक्तींनी लिव्हरबाबतीत जागरूक राहावे, कावीळ वगैरे आजारांत लिव्हरला सूज येणे, भूक नाहीशी होणे, पोटात दुखणे हे विकार घडतात.
 
क्रमांक 2 : क्रमांक २च्या अधिपत्याखाली 2, 11, 20, 29 या तारखांचा समावेश असतो. मानसिक अवस्था बिघडणे, वेडाचे झटके येणे, पित्ताचे दुखणे, पोटदुखी, अल्सर, अमिबियॉसिस, डोकेदुखी (सायनस), सर्दी, पडसे आदी व्याधी चालू होतात. विशेषत: जन्मदिनांक 11, 20, 29 या तारखा ज्यांच्या असतील त्यांनी आपले मानसिक संतुलन बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी. कधी कधी अशा लोकांच्या मनात आत्मघात करून घेण्याचे विचार येत असतात. अशा लोकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा व त्यावर वेळीच योग्य इलाज सुरू करावा. जन्मतारीख 2 असलेल्या व्यक्तींना डोकेदुखी (सायनस) हा त्रास जास्त जाणवेल, तर जन्मतारीख 11 असलेल्या लोकांना अँसिडिटी, पोटदुखी हे विकार जास्त त्रासदायक ठरतील. विशेष करून अशा लोकांनी मानसिक संतुलन राखण्यासाठी पांढरा, पिवळा आदी फिकट रंग परिधान करावेत आणि भडक रंगाचे कपडे परिधान करू नयेत.
 
क्रमांक 3 : ज्या व्यक्तींची जन्मतारीख 3,12, 21, 30 आहे. अशा लोकांना गोड खाणे खूप आवडते. या तीन मूलांकावर गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. वेळी-अवेळी खाण्यामुळे यांना अपचनाचे विकार होतात. अति विचार, काळजी करणे यामुळे स्वभाव चिडखोर बनतो. त्वचेचे रोग, ब्लडप्रेशर, हृदयविकार या रोगांपासून त्रास होण्याची शक्यता असते. विशेष करून मधुमेहाचे दुखणेही यांना त्रस्त करत असते. जन्मदिनांक 12, 21, 30 अशा लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. कधी कधी हा रोग वंशपरंपरागत असतो. दिनांक 3 व 30 असलेल्या व्यक्तींना मज्जातंतूंचे आजार त्रास देतात. अशांनी मानसिक ताणापासून दूर राहावे. 
 
कर्मांक 3 असलेल्या व्यक्तींना दाढदुखी, दातदुखीचा त्रास जास्त जाणवतो, तर जन्मदिनांक 30 ला (कमी दाबाचे प्रेशर) लो ब्लडप्रेशरचा त्रास होतो.
 
क्रमांक 4 : क्रमांक 4च्या अमलाखाली 4, 13, 22, 31 या तारखा येतात. 4 या मूलांकावर हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. हा ग्रह गतीने मंद असला तरी कृतीने अफाट आहे. वेळेवर झोपण्याची सवय नसल्याने यांना निद्रानाशाचा विकार जडतो व निद्रानाशामुळे यांची मानसिक स्थिती नीट राहत नाही. नैराश्य येणे, नेहमी विरोधात्मक विचार 
करण्याने घेतलेले काम अर्धवट टाकण्याची वृत्ती यांच्यात जास्त असते. अति तिखट, तेलकट खाणे, पडून राहणे त्यामुळे यांना हृदयविकार, ब्लडप्रेशर आदी व्याधींना सामोरे जावे लागते. जन्मतारीख 22 व 13 या लोकांना त्वचारोगामुळे त्रास होण्याची शक्यता असते.
 
पाण्यापासून होणारे आजार यांना लवकर होतात. त्यामुळे पोट बिघडणे, अँसिडिटी, अल्सर, कोलायटिस, विषमज्वर तसेच पटकी, कॉलरा या रोगांचाही त्रास यांना होतो. गरगरणे, चक्कर येणे, अशक्तपणा, अंगात रक्त कमी होणे या विकारांचा त्रास 4 अंकाच्या लोकांना होत असतो.
 
क्रमांक 5 : या क्रमांकाच्या अधिपत्याखाली 5, 14, 23 या तारखा येतात. 5 क्रमांक बुधाच्या अमलाखाली येतो. अशा व्यक्ती मूलत: बुद्धिवादी असतात. जास्तीत जास्त बौद्धिक कामे करणे, शरीरश्रमापेक्षा बौद्धिक कामाकडे जास्त कल त्यामुळे मेंदूला ताण सहन न होणे, अति विचार करून मनस्थिती बिघडणे, त्यामुळे यांना न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. अशात मानसिक ताण वाढल्याने निर्माण होणार्‍या समस्यांना सामोरे जावे लागते. उदा. औदासीन्य निर्माण होणे, संशयाने मनाची द्विधा स्थिती होणे, जगण्याची मजा निघून जात आहे असे वाटणे, एकाकी वाटणे, आपल्या भावनांची आपल्या जवळच्या माणसाकडून कदर होत नाही अशा तर्‍हेचा विचार वारंवार येत राहतो. विशेष करून जन्मतारीख 14च्या बाबतीत असे बर्‍याच वेळा घडत असते. तर जन्मदिनांक 23 च्या बाबतीत अति भावविवशता त्रास देत राहते. एरवी दिनांक 5, 14च्या बाबतीत पचनक्रिया बिघडणे, स्नायू दुखणे, वयोमानाने विस्मरण होणे, विशेष करून 23च्या बाबतीत त्वचेचे किरकोळ आजार, मणक्याचे आजार, रोज सर्दीच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात. मानसिक संतुलन उत्तम राहण्यासाठी यांनी हिरव्या व पांढर्‍या रंगांची वस्त्रे परिधान करावीत. म्हातारपणी वटिंगो, पक्षघात, बुद्धिभ्रम हे विकार त्रास देतात.
 
क्रमांक 6 : ज्या व्यक्तीची जन्मतारीख 6, 15, 24 आहे, अशा लोकांवर 6 क्रमांकाचा अंमल असतो. 6 क्रमांकावर शुक्र सत्ता गाजवतो. त्यामुळे यांना होणारे आजार विशेषत: जन्मदिनांक 6 तारखेच्या व्यक्तींना नाक, कान, घसा यांचा त्रास होण्याची शक्यता असते. सर्दीमुळे बारीक ताप, सायनस आदी विकारांपासून त्रास होणे, विशेषत:
जन्मदिनांक 15ला हृदयात धडधड होणे, खोकला होणे, अधूनमधून दमा, हे प्रकार घडत राहतील. तर 24 च्या बाबतीत सर्दीने डोके दुखून बेजार होणे, टॉन्सिल, स्वरयंत्रणांना त्रास होणे. 15, 24 जन्मतारखेबाबत लिव्हरला सूज येणे, दाह होणे या व्याधींपासून त्रास होईल, तर क्रमांक 6च्या अमलाखाली येणार्‍या सर्व तारखा यांनी मूत्राशयाचे रोग, हृदयविकार आदींपासून विशेष काळजी घ्यावी. फेब्रुवारी, एप्रिल आणि ऑगस्ट या महिन्यांत वरील मूलांकाच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
विशेष म्हणजे जन्मदिनांक 6, 15, 24 यांनी प्रेमप्रकरणात खूप सावधानता बाळगावी. कुठेही टोकाची भूमिका घेऊ नये. त्यामुळे मनस्थिती बिघडण्याची शक्यता राहील. त्यामुळे धूम्रपान, मद्यपानाकडे झुकून त्याचे अतिरेकी परिणाम तब्येतीत आढळतील.  
 
क्रमांक 7 : ज्या व्यक्तींचा जन्म 7, 16, 25 या तारखांना झाला आहे, अशांचा क्रमांक 7 असतो. 7 या क्रमांकावर नेपच्यून या ग्रहाचा अंमल असतो. पोटाचे किरकोळ आजार, आतड्याचे आजार, बद्धकोष्ठता, आव पडणे, पोटात मुरडा मारणे हे त्रास जाणवतील. जन्मतारीख 16 व 25 यांना ब्लडप्रेशरचा त्रास जाणवेल. कामाच्या असह्य 
ताणामुळे मनस्थिती ठीक न राहणे, विचार करत बसणे, उगाच पुढील आयुष्याची काळजी करत बसणे, त्यावर योग्य उपाय न शोधता दोष व चुका काढणे, त्यातून नैराश्य उत्पन्न होणे व यातूनच मग निरनिराळ्या आजारांना आमंत्रण देणे असे प्रकार यांच्या आयुष्यात घडत असतात.
 
सतत सर्दीचा त्रास होतो, कफ होतो, म्हणून यांनी थंड पदार्थ व पेये वज्र्य करावीत. यांना त्वचारोग, सायनस, डोकेदुखीचा त्रास जाणवेल. विशेष करून या लोकांनी आपले मानसिक संतुलन बिघडू देऊ नये.
 
क्रमांक 8 : ज्यांच्या जन्मतारखा 8, 17, 26 आहेत अशांचा क्रमांक 8 असतो. 8 हा अंक शनी ग्रहाच्या अमलाखाली येतो. ज्यांचा जन्म 8 तारखेला झाला आहे, त्यांनी कधीही टोकाची भूमिका घेऊ नये. तडजोड करून प्रश्न सोडवावेत. कारण अशा व्यक्ती मानसिक त्रास स्वत:च उत्पन्न करतात. अतिरेकीपणा हा त्यांच्यातला गुण
उद्योगधंद्यांच्या बाबतीत ठीक; पण आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे ठीक नाही.
 
जन्मतारीख 17 व 26 असलेल्या लोकांना डोके दुखणे, पोटर्‍या दुखणे, अपचन होणे, छातीत जळजळणे असे किरकोळ आजार अधूनमधून त्रास देतील. तसेच हृदयविकार, ब्लडप्रेशर यापासूनही त्रास होईल. अशा लोकांनी आहारनियंत्रण करावे व चालण्याचा व्यायाम चालू ठेवावा. चाळिशीनंतर संधिवाताचे दुखणे त्रास देते. अर्धांगवायू, मलबद्धता, कुष्ठरोग, त्वचारोग यांपासून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
जन्मदिनांक 17 व 26 अशा लोकांना लिव्हरविषयी तक्रारी सुरू होतील. अशांनी मदिरापान, धूम्रपान आग्रहाने टाळावे. कधी कधी अशा लोकांना चुकीची औषधे घेतल्यामुळे त्रास होतो. तेव्हा औषध पद्धती चालू करताना तज्ज्ञांचे मत घेऊन औषधोपचार चालू करावेत. निरनिराळ्या औषधोपचार पद्धती चालू ठेवू नयेत. त्या आरोग्यास हानिकारक ठरतील.
 
क्रमांक 9 : जन्मतारीख 9, 18, 27 या तारखांचा क्रमांक 9 आहे. 9 क्रमांक मंगळ ग्रहाच्या अमलाखाली येतो. तसेच शरीरातील रक्तावर मंगळाचा प्रभाव असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना रक्तातून निर्माण होणारे आजार होत असतात. अति चिडखोरपणा, अपमान सहन न होणे, मनाच्या विरोधात घटना घडणे, त्यामुळे यांच्यावर मानसिक परिणाम फार लवकर होतो. त्यातूनच मानसिक आजार निर्माण होतात. कधी संपूर्ण जन्मतारखेत 9 अंकाबरोबर4, 2 व7 अंकांचा प्रभाव असेल तर वरील विधान तंतोतंत खरे ठरते. कारण 2 अंकावर चंद्राचा अंमल, 4 वर हर्षलचा व 7 वर नेपच्यून या तिन्ही ग्रहांचा मानसिक संतुलनाशी जवळचा संबंध आहे.
 
जन्मदिनांक 27 बाबत, यांना डोकेदुखीचा त्रास होणे, प्रखर सूर्यकिरणाचा त्रास होऊन डोकेदुखी, पित्त यांचा यांना त्रास वरचेवर होत असतो. तसेच अति विचाराने झोप न लागणे, निद्रानाश, अंग दुखणे, सर्दी आदी बारीकसारीक तक्रारी चालू होतात. विशेष म्हणजे जन्मदिनांक 9, 18 या लोकांनी रस्त्यावरून जाताना, वाहने चालवताना 
सावधगिरीने वागावे, कारण खूप वेळा यांच्या आयुष्यात अचानक अपघात योग येत असतात. तसेच आगीपासून, विजेपासून शक्यतो दूर राहावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तू टिप्स : घरात नेहमी या 6 वस्तू ठेवल्यानं बरकत होते