Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवसाला खरंच 8 ग्लास पाणी प्यायलाच हवं का? आपल्याला किती पाणी लागतं?

Webdunia
रविवार, 24 मार्च 2024 (12:17 IST)
तुमची त्वचा कोरडी पडत असेल किंवा तुम्हाला अतिरिक्त थकवा येत असेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्हाला अधिक पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला असू शकतो. पण सतत बरोबर पाण्याची बाटली घेऊन फिरत असाल आणि येता जाता पाणी पीत असाल तर तुम्ही कदाचित तुमच्या शरीराच्या आवश्यकतेहून अधिक पाणी पिताय.
19 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पाश्चात्य देशांमध्ये पाणी प्यायची मजबुरी यायची ती थेट मृत्युपंथाला लागल्यावरच.
 
हायड्रोपथीचे संस्थापक व्हिन्सेंट प्रीसनिट्झ म्हणतात त्याप्रमाणे 'समाजातल्या शेवटच्या स्तरातील अत्यंतिक गरीब लोक'च आपली तहान पाण्यावर भागवण्यात समाधान मानत असत. नाहीतर पाण्याचा वापर उपचार म्हणूनच माहीत होता. व्हिन्सेंट सांगायचे की, पूर्वी लोक जेमतेम पाव लिटर पाणी (Half a pint)देखील एका बैठकीत प्यायचे नाहीत.
 
आता मात्र काळ बराच बदलला आहे. ब्रिटनमध्ये माणसं गेल्या कित्येक वर्षांत प्यायलं नसेल तेवढं पाणी गेल्या काही वर्षांमध्ये प्यायला लागले आहेत. अमेरिकेतही बाटलीबंद पाण्याची विक्री तुफान वाढली आहे आणि सोड्याच्या विक्रीपेक्षा पहिल्यांदाच पाणी अधिक विकलं जाऊ लागलं आहे.
 
दिवसाला अमुक लिटर पाणी पिणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, अशा अर्थाचे मेसेज आपल्याला ढिगाने मिळू लागले आहेत. उत्तम आरोग्य, अधिक उर्जा आणि सुंदर त्वचा यासाठी तर पाणी प्यायला हवंच, शिवाय पाणी पिणे कसं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि त्यामुळे कॅन्सरपासून कसा बचाव होतो, असेही दावे तुमच्या वाचण्या-पाहण्यात ाले असतीलच.
 
लंडनमध्ये अंडरग्राउंड अर्थात मेट्रोच्या प्रवासादरम्यान पाण्याची बाटली अवश्य जवळ बाळगावी, यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं जात आहे. शाळेच्या मुलांना वर्ग सुरू असताना पाण्याची बाटली बरोबर ठेवावी, असं सांगण्यात येत आहे आणि काही ऑफिसमध्येही पाण्याचा भलामोठा जग टेबलाच्या मध्यावर ठेवल्याशिवाय मीटिंगला सुरुवात होत नाही. ध्यास घेतल्यासारखे लोक पाणी प्यायला लागलेत. हे कमी म्हणून की काय आता दिवसभरात किती पाणी प्यावं याचा अनधिकृत सल्ला देणारा एक लोकप्रिय 8 X 8 चा नवा नियम आला आहे.
 
या सल्ल्यानुसार दिवसाला 240 मिली चा एक याप्रमाणे किमान 8 ग्लास पाणी प्यावं. म्हणजे इतर ड्रिंक्स, पातळ पदार्थ, पेय याशिवाय जवळपास दोन लिटर पाणी दिवसभरात पोटात जायला हवं, असं हा नियम सांगतो.
या कथित नियमाला अर्थातच कुठलाही शास्त्रीय आधार नाही. युरोपियन युनियन किंवा तत्सम संस्थेच्या गाइडलाइन्समध्येही एवढं पाणी प्या, हे सांगणाऱ्या या नियमाचा उल्लेख नाही
 
नेमकं किती पाणी प्यायला हवं, हे सांगणारी सारी माहिती इतकी संदिग्ध का आहे? कदाचित यामागे कित्येक दशकांपूर्वीच्या दोन प्रकारच्या सल्ल्यांची किंवा सूचनांची गल्लत करून पसरवलेली चुकीची माहिती असावी.
 
1945 मध्ये अमेरिकेच्या नॅशनल रिसर्च कौन्सिलच्या यूएस फूड अँड न्यूट्रिशन बोर्डाने प्रौढांनी आहाराच्या प्रत्येक कॅलरीमागे एक मिलीलिटर लिक्विड पोटात गेलं पाहिजे, अशी शिफारस केली होती. यानुसार, दिवसाला 2000 कॅलरीएवढा आहार घेण्याची शिफारस असलेल्या स्त्रीने दोन लिटर पाणी किंवा द्रवपदार्थ आणि 2500 कॅलरींची शिफारस असलेल्या पुरुषांनी अडीच लिटर द्रव पोटात घ्यायला हवे.
 
आता यामध्ये फक्त पाणी नव्हे तर सर्व प्रकारची पेय शिवाय ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक आहे - 98 टक्क्यांपर्यंत पाणी आहे अशी फळं आणि भाज्या यांचाही समावेश आहे.
दरम्यान, 1974 मध्ये प्रसिद्ध झालेल्या न्यूट्रिशन फॉर हेल्थ या गाजलेल्या पुस्तकात तज्ज्ञ लेखकद्वयी मार्गारेट मॅकविल्यम्स आणि फ्रेडरिक स्टेअर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी पिणं प्रौढांमध्ये दिसतं. पण या तज्ज्ञ लेखकांनी त्यात हेही नमूद केलं आहे की, या 6-8 लिटरमध्ये सर्व प्रकारचे द्रव पदार्थ, जेवणातले, जेवणानंतरचे चहा-कॉफी तत्सम पेय, शीतपेय, अगदी बीअरचासुद्धा समावेश असू शकतो.
 
दिवसाला किती पाणी प्यावे?
ताज्या संशोधनानुसार, दररोज आठ ग्लास किंवा दोन लिटर एवढं पाणी पिणं शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक आहे. त्याऐवजी 1.5 ते 1.8 एवढं पाणी दिवसभरात पिणं पुरेसं आहे.8x8 नियमानुसार दिवसाला ठरवून 8 औन्सेसचे 8 ग्लास पाणी पिण्याऐवजी तुमच्या शरीराच्या गरजेनुसार, आसपासच्या तापमानाला अनुसरून आणि तुम्ही करत असलेल्या हालचालींच्या अॅक्टिव्हिटीच्या प्रमाणात पाणी प्यायला हवं.
 
तज्ज्ञांच्या मते, जे लोक उष्ण आणि दमट वातावरणात राहतात किंवा समुद्रसपाटीपासू बऱ्याच उंचीवरच्या ठिकाणी राहतात त्यांना आणि खेळाडू, गरोदर महिला, स्तनदा माता यांची पाण्याची गरज इतरांहून अधिक असते.
 
हायड्रेशनचे विज्ञान
पाणी हे अर्थातच महत्त्वाचं आहे. शरीराच्या वजनाचा दोन तृतीयांश भाग पाण्याचाच असतो. याच पाण्यातून पोषकद्रव्य आणि निरुपयोगी पदार्थांचं शरीरात वहन होत असतं. या पाण्यामुळेच शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. आपल्या स्नायूंमध्ये शॉक अॅबझॉर्बरसारखं काम करणारं पाणीच असतं आणि सांध्यांना वंगणही तेच असतं. शरीरात सुरू असणाऱ्या बहुतेक सगळ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये पाणी खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतं.
 
घाम, लघवी आणि श्वासोच्छवासाद्वारे आपण शरीरातील पाणी सतत बाहेर सोडत असतो. त्यामुळे शरीरात सदासर्वकाळ पुरेसं पाणी असणं, द्रवांचं संतुलन राखणं हे आवश्यकच असतं. नाहीतर डिहायड्रेशनचा धोका असतो.
 
शरीरात पाण्याचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा एक ते दोन टक्क्यांनी कमी झालं तरी लगेच डिहायड्रेशनची लक्षणं दिसायला लागतात. पोटात पुरेसं पाणी जात नाही तोपर्यंत ही लक्षणं कायम राहतात. वेळीच त्यांची दखल घेतली नाही तर डिहायड्रेशनमुळे मृत्यूही होऊ शकतो.
 
8x8 च्या कथित पण बिनबुडाच्या नियमाच्या दाव्यानुसार आपल्याला तहान लागली म्हणजे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. तहान लागणं म्हणजे धोकादायक डिहायड्रेशनची सुरुवात आहे, असं आपण आता मानू लागलो आहोत. पण आपल्या शरीराने संकेत दिल्यानंतर त्या संकेतानुसार आवश्यक तेवढंच पाणी घेणं पुरेसं असतं. तहानेपेक्षा अधिक पाणी पिणं योग्य नाही, असं बहुतेक तज्ज्ञांचं मत आहे.
"मानवी उत्क्रांतीत शरीराचं नियंत्रित जलसंयोजन म्हणजेच हायड्रेशन ही महत्त्वाची गोष्ट आपण विकसित केलेली आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याची पातळी कायम राहावी यासाठी माणसाने आपल्याकडे अनेक तंत्र शोधून काढली आहेत," असं आयर्विन रोझेन्बर्ग सांगतात. मॅसेच्युसेट्समधील टफ्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये ते न्यूरोसायन्स अँड एजिंग लॅबोरटीतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
 
सुदृढ शरीर असेल तर शरीरातली पाण्याची पातळी कमी झाल्याचा संकेत मेंदू तातडीने देतो आणि आपल्याला तहान लागते किंवा पाणी प्यावंसं वाटतं. त्याचवेळी मेंदू एक प्रकारचं हार्मोन रीलिज करतो ज्यामधून किडनीला किंवा मूत्रपिंडाला पाणी वाचवून ठेवायचा संदेश मिळतो. याचा अर्थ लघवीवाटे पाणी शरीराबाहेर जाण्यापासून वाचतं.ब्लेनहाइम अँड लंडन ट्रायलथॉनचे वैद्यकीय संचालक असलेले कर्टनी किप्स सांगतात, "तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकलंत, तर कधी तहान लागली आणि किती पाणी प्यायचं हे तेच सांगेल."किप्स हे इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट, एक्सरसाइज अँड हेल्थ म्हणजेच ISEH मध्ये स्पोर्ट अँड एक्सरसाइज मेडिसिनचे प्रोफेसर आहेत.
 
"तहान लागली म्हणजे डिहायड्रेशनला सुरुवात झाली. किंवा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेलीच आहे आणि म्हणून तहान लागेपर्यंत थांबायचंच नाही. त्याआधीच पुरेसं पाणी प्यायचं हा एक गैरसमज आहे. तहान लागणं हे चांगल्या शरीरधर्माचं लक्षण नसतं का? जर इतर सगळे संदेश मिळाल्यानंतर मेंदू कार्यरत होतो हे परफेक्ट असेल तर तहान लागल्यावर पाणी पिणं इमपरफेक्ट कसं? खरं तर याच तृष्णेच्या भावनेनंतर पाणी पिऊन माणूस हजारो वर्षं जगला आहे. त्यातूनच उत्क्रांती झाली आहे," प्रोफेसर किप्स सांगतात.
 
साधं पाणी हे शरीराची द्रवपदार्थांची गरज भागवण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे, कारण पाण्यात काहीच कॅलरीज नसतात. पाण्याव्यतिरिक्त चहा-कॉफीसारख्या इतर पेयांमधूनही हायड्रेशन होत असतं. या पेयांमधल्या कॅफिनमध्ये थोडा डाययुरेटिक इफेक्ट (म्हणजे शरीरातील द्रव कमी करून लघवीचं प्रमाण वाढवणारा परिणाम)असला तरी संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, चहा-कॉफीतूनही थोड्या प्रमाणात हायड्रेशन होतच असतं. त्याप्रमाणे काही मद्य, अल्कोहोलिक ड्रिंक्समधूनही पाणी शरीरात जात असतं.
 
डिहायड्रेशन होतं म्हणजे काय जाणवतं?
डिहायड्रेशन म्हणजे शरीरातून पाण्याचं प्रमण कमी होणं. तुम्ही शरीरात घेताय त्याहून अधिक प्रमाणात द्रव शरीर गमावतं तेव्हा डिहायड्रेशन होतं. NHS ने(ब्रिटनची सार्वजनिक आरोग्य सेवा) डिहायड्रेशनची काही लक्षणं सांगितली आहेत.
 
त्यामध्ये तोंडाला कोरड पडणे, ओळ आणि डोळे कोरडे पडणे आणि लघवीचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी होणं - म्हणजे साधारण दिवसातून चारपेक्षा कमी वेळा लघवी होणं अशी लक्षणं आहेत. पण त्याहूनही अगदी नेहमी दिसणारं लक्षण म्हणजे तुम्हाला तहान लागते.
 
जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होईल? वजन कमी होईल का?
अधिक पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका तर टळतो. पण याव्यतिरिक्त जेवढं प्यावसं वाटतं त्याहून म्हणजे शारीरिक संदेशाहून अधिक पाणी प्यायल्याने आरोग्याला इतर काही फायदे होतात का हे सिद्ध झालेलं नाही.
 
काही संशोधनातून असं पुढे आलं आहे की, माइल्ड डिहायड्रेशनची सुरुवात आपण टाळू शकतो. पुरेसं पाणी पिण्याच्या सवयीने डिहायड्रेशनचा धोका पूण टळतो आणि त्यामुळे मेंदूच्या कार्याला आधार मिळतो.
 
2023 च्या एका अभ्यासात असंही दिसलं की, शरीराला व्यवस्थित पाणी दिलं, शरीर हायड्रेटेड असेल तर वार्धक्याची क्रियासुद्धा मंदावते. हृदयविकार किंवा फुप्फुसाचे दुर्धर विकार टाळले जाऊ शकतात.
 
काही अभ्यासांतून असंही सुचवलं गेलं आहे की, द्रव पदार्थांच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवता येतं. ब्रेंडा डेव्ही या मानवी पोषण, आहार आणि व्यायाम याविषयीच्या तज्ज्ञ असून व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट अँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यासंदर्भात काही संशोधन आणि अभ्यास करून द्रव आहार आणि वजन यांचा संबंध शोधायचा प्रयत्न केला.
 
एका अभ्यासासाठी त्यांनी दोन गट केले आणि दोन्ही गटातील व्यक्तींना तीन महिन्यांसाठी आरोग्यपूर्ण आहार घ्यायला सांगितलं. पण त्यापैकी एका गटाला त्यांनी ठरलेला आहार घेण्याच्या अर्धा तास अगोदर 500 मिली पाणी पिण्यास सांगितलं. दुसऱ्या गटाचा आहार त्याच प्रमाणात होता. पण हे पाणी पिण्याचं प्रमाण त्यात नव्हतं. तीन महिन्यानंतरच्या निरीक्षणांमध्ये पाणी पिणाऱ्या गटातील व्यक्तींचं वजन अधिक प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं.
दोन्ही गटातील व्यक्तींना दररोज किमान 10 हजार पावलं चालण्याचं लक्ष्य दिलेलं होतं. त्यातील जेवणापूर्वी ग्लासभर पाणी पिणाऱ्या गटातील व्यक्तींनी हे लक्ष्य सहजी पार केल्याचं लक्षात आलं. डेव्ही या निरीक्षणामागचं कारण सांगतात की, बहुतेक वेळा अत्यंत सौम्य प्रमाणात डिहायड्रेशन होत असतं पण लोकांच्या लक्षात येत नाही. अगदी 1 ते 2 टक्के डिहायड्रेशन लक्षात येत नाही. पण तरीही त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर आणि उर्जेवर होत असतो.
 
अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मानवी पचनक्रिेया याविषयाच्या प्रोफेसर बार्बारा रोल्स सांगतात की, पाण्यामुळे वजन कमी होतं असं सांगण्यात येतं तेव्हा बहुतेक वेळा कुठल्याही साखर असलेल्या शीतपेयाऐवजी पाणी प्यायलात तर हा परिणाम निश्चित जाणवणारा असतो. पाणी पिण्याचा वजनाशी संबंध याच अर्थी आहे.
 
"जेवणापूर्वी काही वेळ पाणी पोटभर पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते हा दावासुद्धा पुरेशा प्रमाणात सिद्ध झालेला नाही. एक तर असं जास्त पाणी प्यायलं तरी ते पोटातून खूप लवकर बाहेर टाकलं जातं आणि पोट पुन्हा रिकामं होतं. पण तुम्ही तुमच्या जेवणातून द्रवपदार्थांचं प्रमाण वाढवलंत म्हणजे अधिक प्रमाणात पातळ पदार्थ, सूप वगैरे घेतलेत तर त्याने लवकर पोट भरतं आणि कमी कॅलरीज जातात. पदार्थांतून मिळणारं पाणी जठरात अधिक काळ राहतं," प्रोफेसर रोल्स सांगतात.अधिक पाणी पिण्यामुळे तुमची त्वचा टवटवीत होते आणि उजळपणा येतो असाही दावा केला जातो. पण हा दावासुद्धा थेट सिद्ध झालेला नाही किंवा यामागचं शास्त्रीय विश्लेषण अद्याप समोर आलेलं नाही.
 
मग अधिक पाणी प्यायल्याने काय होतं?
आपल्यातले जे कोणी त्या कथित नियमाप्रमाणे आठ ग्लास पाणी पिण्याचं ठरवतात त्यांना त्यातून फायदा होत असो नसो.. फार तोटाही होत नाही. पण आपण आपल्या शरीराने सुचवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायला हवं हा समज मात्र घातक ठरू शकतो.
प्रमाणाबाहेर फ्लुइड कन्झम्प्शन किंवा अतिरिक्त द्रव पोटात गेल्यास सोडियमचं संतुलन बिघडलं. रक्तातील सोडियम पाण्यात विरघळतं. यामुळे मेंदूला आणि फुप्फुसांना सूज येऊ शकते. कारण अतिरिक्त द्रवामुळे सोडियम कमी होतं.किप्स यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, गेल्या दशकभरात जगभरात एखादा खेळ किंवा स्पर्धा सुरू असताना खेळाडूचा मृत्यू होण्याचं प्रमाण पाहता 15 मधली एक व्यक्ती ओव्हरहायड्रेशनमुळे मरण पावलेली आहे. त्यांच्या मते हे होत आहे कारण आपण आपल्या शरीराचे संकेत ऐकेनासे झालो आहोत.आपल्याला तहान लागल्याची जाणीव देणारा मेंदू सक्षम आहे यावर आपला विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आपण डिहायड्रेशनच्या भीतीने आपल्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पिऊ लागलो आहोत.
 
"हे खरं आहे की, रुग्णालयात डिहायड्रेशनच्या अनेक केसेस डॉक्टर आणि नर्सेसना दिसतील. अशा व्यक्ती ज्यांनी कित्येक दिवसात पाणीच प्यायलेलं नाही, अशाही व्यक्ती दाखल होतात. पण या केसेस मॅरेथॉनमध्ये धावताना आपल्याला डिहायड्रेशन होईल ही भीती असणाऱ्या केसेसपेक्षा खूप वेगळ्या आहेत," त्या सांगतात.
योहाना पॅकेनहमने 2018 च्या लंडन मॅरेथॉमध्ये भाग घेतला होता. आतापर्यंतची सर्वांत उष्ण वातावरणात धावलेली ती मॅरेथॉन होती. पण योहानाला या स्पर्धेत आपण खूप पाणी पीत होतो याखेरीज काहीच आठवत नाही. कारण अधिक पाणी प्यायल्यामुळे तिला ओव्हरहायड्रेशनचा त्रास झाला, ज्याला हायपोनॅट्रेमिया असंही म्हणतात. तिला स्पर्धेनंतर त्याच दिवशी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
 
"माझ्या मैत्रिणीला आणि पार्टनरला वाटलं की मला उन्हामुळे डिहायड्रेशन झालं आहे आणि त्यांनी मला भलामोठा ग्लास भरून पाणी प्यायला लावलं.ते पिता पिताच मला जबरदस्त फिट आली आणि माझं हृदय बंद पडलं. मला तातडीने एअरलिफ्ट करावं लागलं आणि हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. तिथे मी रविवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत बेशुद्धावस्थेतच होते," योहाना सांगते. त्या धक्क्यातून योहाना आता सावरली आहे आणि यंदा पुन्हा एकदा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची तयारी करते आहे. पण तिचं म्हणणं होतं की, उन्हात मॅरेथॉन धावणार म्हटल्यावर डॉक्टर, तज्ज्ञ सल्लागार, मित्रमंडळी आणि कुटुंबीय एकच सल्ला दिला होता. मॅरेथॉनच्या पोस्टरवरही तेच लिहिलं होतं - भरपूर पाणी प्या.
 
आपल्याला किती पाणी पिणं आवश्यक असतं?
आपल्या शरीरात कायम पाण्याचं प्रमाण योग्य राखलं पाहिजे, म्हणजेच आपण सतत हायड्रेटेड असलं पाहिजे. पण याचा अर्थ अनेक जण सतत पाणी जवळ बाळगून घोट घोट पीत राहिलं पाहिजे, असा घेतात. आणि याचा परिणाम आपण गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्यात होतो.
 
"अत्यंत उष्ण प्रदेशात - वाळवंटात सर्वाधिक तापमानाच्या दिवशीसुद्धा माणूस तासाभरात जास्तीत जास्त दोन लिटर एवढा घाम गाळतो. आणि हे प्रमाण प्रत्यक्षात येणारं नाहीच," शरीरातून किती पाणी उत्सर्जित होऊ शकतं याचं प्रमाण सांगताना लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट, एक्सरसाइज अँड हेल्थचे संशोधन संचालक ह्यू माँटगॉमरी यांनी सांगितलं. "त्यामुळे तुम्ही जेव्हा 20 मिनिटांच्या लंडन मेट्रोच्या प्रवासादरम्यान लागेल म्हणून अर्धा लिटर पाण्याची बाटली जवळ ठेवता, तेव्हा अगदी ओथंबण्याएवढा घाम आला तरी तेवढ्या वेळात तुम्हाला एवढ्या पाण्याची कमतरता भासणार नाही."
 
तरीही ज्यांना आपल्या तहानेपेक्षा आरोग्य सेवेच्या अधिकृत गाइडलाइन्स काय सांगतात त्याप्रमाणे पाणी प्यायचं असेल तर यूकेच्या NHS च्या सल्ल्यानुसार दररोज सहा ते आठ ग्लास एवढे द्रवपदार्थ घ्यायला हवेत. यामध्ये अर्थातच पाण्याबरोबर लो फॅट दूध, साखरविरहित पेय, चहा, कॉफी यांचाही समावेश आहे.
शरीरातलं पाणी कमी झाल्यावर तहान लागल्याची भावना निर्माण होणं म्हणजे थर्स्ट मेकॅनिझम. जसजसं वय वाढतं तसं या थर्स्ट मेकॅनिझमची संवेदनशीलता कमी कमी होत जाते. त्यामुळे वयस्क लोकांमध्ये डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण लहानांपेक्षा अधिक असतं, असं ब्रेंडा डेव्ही सांगतात.
 
एकदा वय साठीच्या पुढे गेलं की, तहान लागण्याची भावना आणि प्रत्यक्षात पाण्याची कमतरता यांचं नियंत्रण ठेवणारं थर्स्ट मेकॅनिझम पूर्वीसारखं चांगलं काम करत नाही. 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधननुसार, उतार वयात डिहायड्रेशन झालं तर त्याची लक्षणंसुद्धा लवकर लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष होतं.
 
"8x8 rule चा फोलपणा हा त्याच्या इतक्या सरधोपट प्रमाणात आहे. आपण पर्यावरणाचा घटक म्हणून कुठल्या प्रकारच्या वातावरणात आहोत आणि आसपासच्या बदलांवर आपली प्रतिक्रिया काय आहे याचा विचार या सरधोपटपणात नाही. म्हणून सगळ्यांसाठी सारखा नियम, इतकं हे सोपं नाही", रोझन्बर्ग सांगतात. आपण कुठल्या तापमानात आहोत, आपण किती कष्ट करतोय, शरीराची किती हालचाल होते आहे आणि त्यानुसार आपल्याला किती उर्जेची आवश्यकता आहे या सगळ्याचा विचार आपल्याला दिवसभरात किती पाणी प्यावं लागणार आहे हे ठरवताना कऱणं आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
2022 मध्ये, अॅबर्दिन युनिव्हर्सिटीने दिवसाला किती पाणी प्यायला हवं यासंदर्भात एक संशोधन केलं. त्यानुसार दिवसभरात 1.5 ते 1.8 लिटर पाण्याची गरज आपल्याला असते. म्हणजे लोकप्रिय सल्ल्यातल्या 8 ग्लास किंवा 2 लिटरपेक्षा हे प्रमाण कमीच आहे. लोकांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी किती पाणी लागेल हे तपासून जगभरातल्या 23 देशातील शास्त्रज्ञांच्या सहकार्यातून हे प्रमाण त्यांनी ठरवलं आहे. त्यांनी नोंदवल्यानुसार, उष्ण-दमट वाटतावरणात राहणाऱ्या आणि अधिक उंचीवरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अधिक पाणी लागतं. याशिवाय खेळाडू, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचीही पाण्याची गरज इतरांपेक्षा अधिक असते. एखाद्याला किती पाण्याची आवश्यकता आहे हे ठरवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ती व्यक्ती किती उर्जा खर्च करते याचा हिशोब ठेवायला हवा. थोडक्यात पाण्याचा एकच नियम सगळ्यांना लागू होऊ शकत नाही. प्रत्येकाचं पाण्याचं प्रमाण वेगळं असतं आणि ते तसंच असायला हवं.
 
अनेक तज्ज्ञ हे मान्य करतात की, दिवसाला अमूक एक प्रमाणात पाणी प्यायलं गेलं पाहिजे हे प्रमाणित करण्याच गरज नाही. आपलं शरीर तहान लागली की योग्य तो संदेश पोहोचवतं आणि त्यानुसार पाणमी प्यायलं तरी ते पुरेसं आहे. जसं आपल्याला आपण थकलो आहोत, विश्रांतीची गरज आहे किंवा भूक लागली आहे, खायला हवं हे समजतं तसंच पाण्याचं आहे. जास्त पाणी पिण्याचा फायदा कुठला असेलच तर तो हाच की तुम्ही सतत लघवीसाठी उठून जाल आणि अर्थातच मग या हालचालीत अधिक कॅलरी खर्च कराल.

Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Breakfast special : ओनियन पराठा रेसिपी

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

Career in MBA in Healthcare Management : हेल्थ केअर मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

हेअर सीरम कसे वापरावे? जाणून घ्या 5 फायदे

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुढील लेख
Show comments