rashifal-2026

ओव्हरथिंकिंगः तुमच्या डोक्यात सतत विचार सुरू असतील तर हे नक्की वाचा

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (07:23 IST)
Overthinking: संजूची आई त्रस्त होती त्याचं कारण एकच संजूचा सतत विचार करण्याचा स्वभाव. "अरे तुझं लग्न तरी कसं व्हायचं? आणि बायको तरी कशी राहणार तुझ्या बरोबर? असं त्राग्यानं म्हटलं के संजू नेहमीप्रमाणे तंद्रीतून बाहेर येऊन म्हणत असे "आं? मला काही म्हणालीस?"
 
"बाकी सगळं बरं आहे रे, तुझं ते एक ओव्हरथिंकिंग संपायला हवं!" संजूच्या आईने सुस्कारा सोडला.
 
"मम्मी मी उगीचच विचार करीत बसत नाही. मला तुझ्या त्या फॅमिली गप्पांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तुझ्या मनाप्रमाणे मी ओव्हरथिंकिंग करत नाही."
 
शेवटी संजू करत असलेले तथाकथित ओव्हरथिंकिंग योग्य की अयोग्य याचा निर्णय मानसोपचारतज्ज्ञाकडे सोपवला तेव्हा त्यांचं उत्तर मिळालं.
 
सुनीताची गोष्ट वेगळी कंटाळा आला विचार करण्याचा! तेच-तेच विचार आणि प्रश्नांनी मी हैराण झाले आहे. मला सगळे म्हणतात कशाला इतका विचार करतेस. ते करून काय उपयोग? मीही तेच म्हणते ना! या विचारांनी मी खूप नकारात्मक होते. माझे विचार नुसते विचार नाहीत ते नकारात्मक असतात.
 
प्रसादची समस्या आणखीनच वेगळी. त्याच्या मनात फक्त नकारात्मक विचार असतात असं नाही. ते विचार बहुतेकवेळा आपले हात घाण झाले आहेत असा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तो आपल्या हातांकडे पाहत बसायचा.
 
त्या हाताला मागे कधीतरी एकदा घाण लागलेली होती पण तेव्हापासून त्याला वाटत असे की हे या हाताला लागलेली घाण त्याच्या पोटात जाईल मग पोट बिघडेल, पोट दुखू लागेल.
 
अशा विचारांची लिंक लागायची आणि प्रसाद हात धुवून टाकत असे. दोन्ही बाजूला साबण लावून पुन्हा पुन्हा हात धुतले की त्याला ठीक वाटायचं. म्हणजे त्याला ओव्हरथिंकिंगची सवय होती, असं नाही तर हात धुण्याचा मंत्रचळ लागला होता.
 
यावर काही उपाय असू शकतो का? प्रसादला ते ऐकून धक्का बसला.
 
इथे थोडक्यात तीन केस स्टोरी पहिल्या. त्याच विश्लेषण करून ओव्हरथिंकिंगचं रहस्य समजून घेऊ.
 
संजूचं स्वतःच्या ओव्हरथिंकिंगबद्दल असलेलं मत अगदी योग्य होतं. तो आपल्या मनात एखाद्या महत्त्वाच्या विषयातील प्रश्नावर विचार करीत असे.
 
नेहमीच्या गप्पा-टप्पा आणि गॉसिपमध्ये इंटरेस्ट नसायचा. या प्रकारच्या विचार प्रक्रियेला आपण सर्जनशील म्हणू. अर्थात त्याचा प्रश्न ही जातील समस्या असायला हवी. नेहमीच्या उत्तरापेक्षा वेगळा उपाय हवा असणं गरजेचं आहे.
 
संजू त्या विचारांबरोबर खूप टिप्पणी करत असे. अनेक प्रकारच्या आकृती असत, सुचलेल्या उत्तरांची यादी असायची. या सगळ्या गोष्टीवरून त्याच्या ओव्हरीथिंकिंगचं निदान करता आलं. अर्थात आपल्या अशाप्रकारच्या कार्यपद्धतीची संजूनं त्याच्या भावी पत्नीला माहिती करून देणं, नितांत महत्वाचं आहे.
 
तिनेही त्याला त्या सवयीसकट स्वीकारायला हवं. संजूनेही कटाक्षानं काही काळ कुटुंबाकरता जोडीदाराकरता राखून ठेवायला हवा. त्या वेळात त्यानं मनातला विचारांचा संगणक बंद करायला हवा. सुनीताची गोष्टच वेगळी.
 
तिच्या ओव्हरीथिंकिंगला रुमिनेशन अथवा रवंथ असं म्हणतात. ज्याप्रमाणे गाईगुरं रवंथ करीत कडबा चघळत असतात. तसंच सुनीता करत असे. अर्थात जनावरं रवंथ करून अन्नपचन सोपं करीत असतात. सुनीता मात्र त्या रवंथ करण्याच्या प्रक्रियेमधून काही साध्य करत नसे.
 
तिचं मन रवंथ करता करता काळाच्या पुढे धावत असे म्हणजे पुढे काय काय वाईट बघू शकेल यावर विचार करून भयभीत होत असे. सुनीता याच भीतीला नकारात्मक विचार म्हणत असे. सुनीता रवंथ करता करता भविष्यकाळात अडकत असे असं नाही. ती भूतकाळातल्या जुन्या चुकांवर विचार करीत असे.
 
थोडक्यात सुनीता वर्तमान काळातून निसटून जात असे. वर्तमान नसल्यानं ती भयग्रस्ततेच्या मनोवस्थेत हरवून जात असे.
 
अशा ओव्हरथिंकिंगमधून ही स्वतःची सुटका करून घेता येते. पण त्यासाठी तिला स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांशी बांधिलकी मानली पाहिजे.
 
प्रसादचं ओव्हरथिंकिंग विशेष करून विकारात्मक होतं. या सवयीला मंत्रचळ अथवा ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर/ओसीडी असं म्हणतात. या विकारात मनात चुकीचे समाज ठामपणे रुजतात, मनात लुडबूड करतात. त्याची तीव्रता वाढत जाते. चिंताग्रस्तता अधिक भीषण होते आणि काहीतरी 'ॲक्शन' घेऊन मनातल्या भीतीचं निवारण करावं लागत असे. थोडक्यात तो मनातल्या चुकीचे विचार
 
चिंता आणि विशिष्ट सवय (हात धुणे, नमस्कार करणे, मोजणे, खात्री करण्यासाठी पुन्हा पुन्हा चेक करणे) यांचा तो गुलाम झाला होता.
 
या तिघांप्रमाणे अजूनही एक प्रकार आहे. तो विशेष करून सर्वसामान्यपणे आढळतो. त्याला विकार म्हटलं जात नाही पण त्या मानसिक सवयीने खूप वेळ वाया जातो.
 
याला 'प्रोक्रॅस्टिनेशन' असं म्हणतात. साधारणपणे निर्णय घेण्यात दिरंगाई, कामात चेंगटपणा, दीर्घसूत्रीपणा असंही म्हणतात. हो की नाही, आता की मग, असं की तसं, हे योग्य ते ते आयोग्य याविषयी मनाचा ठाम निर्णय होत नाही.
 
एका नाण्याला दोन बाजू असतात पण एकेवेळी एकच बाजू दिसते. तर या मंडळीला एकाचवेळी दोन्ही बाजू दिसतात आणि त्यांना काय करायचं ते सुचत नाही. हा देखील ओव्हरथिंकींग प्रकार असला तरी त्याला 'प्रोक्रॅस्टिनेशन' असं म्हणतात.
 
या प्रकारावर उपाय आहेत का? आहेत नक्कीच आहेत पण त्यासाठी त्या त्या व्यक्तीने कसून प्रयत्न करावे लागतात. या सवयी आपोआप सुटत नाहीत.
 
त्यासाठी मनोनिग्रह, प्रामाणिक प्रयत्न आणि इच्छाशक्तीचा कसून वापर करावा लागतो. इथे त्याविषयी काही सूचना देत आहे. परंतु त्यापूर्वी अत्यंत महत्वाचा मुद्दा.
 
'ओसीडी'वर अर्थातच औषधोपचार करता येतात. मेंदूमधील 'सिरोटोनिन' नामक द्रव्याला अनुलक्षून औषध वापरता येतात. पण फक्त औषध घेऊन पुरेसं होत नाही त्यालाही प्रयत्नांची जोड द्यावी लागते. योग्यप्रकारे बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध विचारसरणी शिकावी लागते.
 
काही सूचना
ज्याक्षणी आपण रवंथ करीत आहोत हे लक्षात येतं त्याचवेळी ताबडतोब थांबलं पाहिजे. म्हणजे 'पॉज' घेतला पाहिजे.
पुढच्याच क्षणी तेच विचार मनात आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.
विचार करताना ज्याठिकाणी आपण वावरत बसलेले असतो तिथून काही क्षणांकरता उठून प्रत्यक्ष उठून दूर गेलं पाहिजे.

मनात उद्भवणाऱ्या चिंतेला दूर करण्यासाठी दीर्घश्वसन आणि त्यापाठोपाठ दीर्घउच्छवास सोडायला हवा. अशाप्रकारच्या दीर्घउच्छवासामुळे मनातली चिंता विरून जाते.

आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित केल्यानं मनाची भूतकाळ किंवा भविष्यकाळ याकडे धाव घेण्याची सवय आपोआप कमी होते. लक्षात ठेवायचं की भरकटणारं मन अशांत आणि दुःखी असते.
अचूक निर्णय, परफेक्ट विचार असं काहीही नसतं. त्यामुळे तातडीने आणि सणकीत निर्णय घ्या असं नाही तर ठराविक वेळात निर्णय घ्या.
विचार करता येणं ही मानवी वंशाला मिळालेली सर्वात मोठी शक्ती आहे, क्षमता आहे, हे विसरू नका.
 




Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

प्रत्येक मुलीने हे 7 मेकअप टूल्स आपल्याकडे ठेवावे

हिवाळ्यात पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

महाभारताच्या कथा : अर्जुनाची द्विधा मनस्थिती

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

पुढील लेख
Show comments