Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कधीकधी कंटाळा येणं मेंदूसाठी चांगलं असतं

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (12:55 IST)
जर कोणी तुम्हाला सांगितलं की, आज काहीच न करता शांत हाताची घडी घालून बसा, तर ते शक्य आहे का? तर अजिबात नाही. भले ही आपण शांत बसू पण आपले विचार आपला मेंदू काही शांत बसणार नाही. सतत डोक्यात विचार येत राहतील की असंच बसलो तर काम कसं पूर्ण होईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात हे अगदीच सामान्य आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून ते दिवसाचे सगळे टास्क पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येकाला आपला दिवसाचा चोवीस तासांचा वेळही पुरा पडत नाही.
 
आणि एवढं सगळं होऊनही जेव्हा तुम्हाला कामाचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही तुमचं मन रिझवण्यासाठी मोबाईल हातात घेता.
 
कधी सोशल मीडियावर स्क्रोल करत राहता तर कधी कमेंटना रिप्लाय देता. 
 
त्यावेळी अगदी कोणाच्याच लक्षात येत नाही की, बोअर होणं म्हणजेच एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणं हा सुद्धा एक सोपा पर्याय असतो. 
 
कधी कधी लोक स्वतःच्याच विचारांमध्ये गुरफटून एकटं राहण्याऐवजी स्वतःला 'इलेक्ट्रिक शॉक' देणं पसंत करतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली असून प्रसिद्ध सायन्स जर्नलमध्ये याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. 
 
या संशोधनासाठी एक प्रयोग करण्यात आला. त्यानुसार काही लोकांना एका खोलीत 15 मिनिटांसाठी बसवून ठेवलं. या वेळेत त्यांनी काहीच करायचं नाही असं त्यांना सांगण्यात आलं. त्या खोलीत एक बटण होतं, जे दाबलं की हलका इलेक्ट्रिक शॉक बसायचा. हे बटण दाबण्याचा पर्याय मात्र त्यांना उपलब्ध होता. 
 
आता हलका असला म्हणून काय झालं, इलेक्ट्रिक शॉक कोणाला आवडतो? कोणालाच नाही. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या प्रयोगात जितक्या लोकांनी सहभाग घेतला होता त्यातल्या बऱ्याच जणांनी हे बटण दाबून पाहिलं. 
 
या प्रयोगात सामील असलेल्या 42 पैकी अर्ध्या लोकांनी किमान एकदा तरी हे बटण दाबून बघितलं.  यात एक असा व्यक्ती होता ज्याने 15 मिनिटात जवळपास 190 वेळा बटण दाबले. या प्रयोगानंतर जो रिपोर्ट तयार करण्यात आला होता त्यात म्हटलय की, "लोकांना रिकामं बसायला आवडत नाही. ते सतत काहीना काही करत असतात."
 
सतत सक्रिय राहाणारा एकमेव अवयव
तर आपला मेंदू हा सतत सक्रिय राहणारा एकमेव अवयव आहे. तो खरं तर चोवीस तास काम करतो. आपण झोपल्यानंतरही त्याचं काम सुरूच असतं. आपण झोपेत असताना ज्या गोष्टी तणाव निर्माण करतात त्यांचं व्यवस्थापन करण्याचं काम मेंदू करतो. ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते.
 
आपण झोपेत असताना आपला मेंदू निर्णय घेतो, समस्यांवर उपाय शोधतो आणि नवीन शक्यतांचा विचार करतो, पण आपल्याला याची जाणीव नसते.
 
आपल्या शरीरात नेहमीच 'ऑन' असणारा हा भाग कधीही ब्रेक घेत नाही, ना कधी सुट्टीवर जातो. पण न्यूरोसायंटिस्टच्या मते, आपल्या मेंदूलाही मर्यादा असते.
झोपेत भले ही आपला मेंदू काम करत असेल पण तो या दरम्यान स्वतःची दुरुस्तीही करत असतो. त्यामुळे झोपेसोबत आपल्याला कंटाळा ही यायला हवा. कारण ते आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. 
 
इटलीचे लोकांना या कंटाळण्याच्या गुणाबद्दल बरीच माहिती आहे. तिथं तर या बोअर होण्यासंबंधी 'काहीही न करण्याचं सुख' अशी देखील म्हण आहे. काहीही न करणं हा तिथल्या संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणजे बोअर झाल्यावर तिथले लोक आराम करतात आणि काहीही न करण्याचा आनंद घेतात. 
 
काहीही न करण्याचा अर्थ म्हणजे डुलक्या काढणं नव्हे. तर यामागे खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे दैनंदिन जीवनातील घाई-गडबडीपासून स्वतःला वेगळं ठेवणं, स्वतःचं परीक्षण करणं, आराम करणं आणि आपण वर्तमानात जगतोय याची जाणीव ठेवणं म्हणजेच काहीही न करणं. 
 
बोअर झालं की क्रिएटिव्हिटी वाढते
अमेरिकेच्या रेन्सलेयर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉग्निटिव्ह सायन्सेस विभागात रिसर्चर म्हणून काम करणाऱ्या न्यूरोसायंटिस्ट अॅलिसिया वोफ सांगतात की, "अधूनमधून कंटाळा येणं मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं असतं."
 
फोर्ब्स पब्लिकेशनला दिलेल्या एका स्टेटमेंट मध्ये अॅलिसिया सांगतात की, "कंटाळा आल्याने आपले सामाजिक संबंध वाढीस लागतात. बऱ्याच सोशल न्यूरोसायंटिस्टने यावर संशोधन केलं असून यातून स्पष्ट झालंय की, जेव्हा आपण एखादी गोष्ट करणं थांबवतो तेव्हा आपल्या मेंदूचं नेटवर्किंग सर्वात जास्त सक्रिय होतं. थोडक्यात आपण बोअर झालो की आपली क्रिएटीव्हीटी वाढते. या काळात नव्या कल्पना आकार घेतात."
 
अॅलिसिया याविषयी सविस्तर सांगतात, "बोअर होणं भले ही आपल्याला निरुपयोगी, अनावश्यक वाटेल, पण या काळात आपल्या डोक्यात खूप सारे विचार सुरू असतात. यातून आपल्याला बरीच न उलगडलेली कोडी सुटतात. याच काळात काम न केल्यामुळे आपल्या मेंदूला आराम मिळतो. बरेच प्रथितयश लेखक सांगतात की, एखादं काम करत असतानाच त्यांना नव्या कल्पना सुचल्या आहेत. याला 'इनसाइट' असं म्हणतात."
2019 मध्ये 'अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट डिस्कव्हरीज' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात काही गोष्टी समोर आल्या. यात अभ्यासक संशोधकांनी सहभागी झालेल्या एका ग्रुपला बियांच्या रंगानुसार वर्गीकरण करण्याचं बोरिंग काम दिलं होतं. तर दुसऱ्या ग्रुपला त्यापेक्षा चांगलं काम दिलं होतं.
 
काम संपल्यावर प्रत्येक ग्रुपमधल्या लोकांना उशिरा येण्यासाठी कारणं द्यायला सांगितली होती. यात ज्या लोकांना बोरिंग काम दिलं होतं त्या लोकांनी उशिरा येण्याची खूप चांगली कारणं सांगितली. तर ज्यांच्याकडे तुलनेने चांगली कामं होती, त्यांनी मात्र तितकीशी खास का सांगितली नाहीत. 
 
ब्रिटीश सायकोलोजिस्ट सँडी मान यांच्या 'आर्ट ऑफ बीइंग बोअर' या पुस्तकात केलेला युक्तिवादही असाच काहीसा आहे. म्हणजे त्या सांगतात की, 'बोअर होण्याची भावना इतकी तीव्र आणि प्रेरणादायी असते की यामुळे सर्जनशीलता वाढते आणि व्यक्ती विचार करायला प्रवृत्त होतो.'
सँडी सांगतात, "बोअर होणं एक गुंतागुंतीचं चक्र आहे. यात तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही असता तेव्हा तुम्हाला कंटाळा येतो. पण त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला त्याच उत्साहाची गरज असते."
 
सँडी गेली 20 वर्षे कंटाळा या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, तुम्ही कंटाळवाणेपणाला समजून घ्यायला हवं आणि तरच तुम्ही त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहू शकता.
 
बीबीसीशी बोलताना सँडी सांगतात, "हे एक इमोशन आहे. तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट जाणून घेण्याची एक ओढ असते. एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायची तुमची तीव्र इच्छा असते पण जेव्हा तुम्हाला ती गोष्ट सापडत नाही, तेव्हा एक भावना निर्माण होते. त्याला निराशा किंवा बोअर होणं म्हणतात."
 
सँडीच्या मते, मुलं जेव्हा कंटाळतात तेव्हा पालकांनी नाराज होऊ नये.
 
त्या सांगतात, "कंटाळवाणेपणाची चांगली गोष्ट म्हणजे या काळात तुम्हाला काही विशेष असं करावं लागत नाही. स्वतःचा कंटाळा घालवण्यासाठी त्यांचे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि अशाप्रकारे त्यांची सर्जनशीलता वाढेल."
 
बोअर झाल्याने एकाग्रता वाढते
जशी झोप आपल्या मेंदूसाठी उपयुक्त असते अगदी त्याचप्रमाणे कंटाळा येणं, द्विधा मनस्थिती होणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतं.
 
न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात टिम क्रेडर म्हणतात, "रिकामं बसणं हे सुट्टी घेण्यासारखं किंवा वाईट आहे असं अजिबात नाही. हे आपल्या मेंदूसाठी तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचं आहे. जर कंटाळा आला नाही तर रिकेट्स सारख्या मानसिक आजाराला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं."
कंटाळा येण्याविषयीचा असाच एक लेख अमेरिकेच्या 'सायंटिफिक अमेरिकन' मासिकातही प्रकाशित झाला आहे.
 
यात टिम क्रेडर म्हणतात, "द्विधा मनस्थिती मध्ये आपल्या मेंदूची एकाग्रता वाढते, याचा उपयोग सर्जनशीलतेसाठी होतो. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात चांगली कामगिरी करता येते."
 
'सायकॉलॉजी टुडे'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं य की, अति सूचना मिळाल्यास आपलं लक्ष विचलित होतं. त्याचा कालावधी कमी असतो.
 
अमेरिकेतील इलिनॉयस विद्यापीठाचे प्रोफेसर शाहराम हेश्मत म्हणतात, "अती काम केल्यावर जे दडपण येतं त्यातून निवांत होण्यासाठी एक ब्रेक घेणं आवश्यक आहे. सोशल मीडिया किंवा कंटाळा आणणाऱ्या माध्यमांपासून थोडं अंतर राखणं खूप फायदेशीर असतं."
 
तज्ज्ञांच्या मते, अती माहितीच्या युगात आपल्या मेंदूमध्ये डेटा आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचं ओझ वाढत आहे. म्हणजेच, जितकी जास्त माहिती तितकीच एकाग्रता कमी. 
 
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
सँडी मान त्यांच्या 'आर्ट ऑफ बीइंग बोअर' या पुस्तकात लिहितात की, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात 'डे ड्रीमिंग' करणं चांगलं असल्याचं अनेक अभ्यासातून सिद्ध झालंय.
 
उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास, आजच्या जगात ऑफिशियल ईमेल, सोशल मीडिया, डेटिंग अॅप्सच्या भडीमारामुळे तुमच्या मेंदूच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.
पूर्वीच्या क्षमतेने काम करायचं असेल तर त्यासाठी ब्रेक आवश्यक आहे. म्हणूनच सॅन्डी असो वा इतर तज्ज्ञ, माहितीच्या या अवाढव्य जगात बोअर होणं चांगलं असल्याचं मानलं गेलंय. 
 
सँडी सांगतात "एक वयस्क म्हणून बघायला गेलं तर आपण अशा जगात राहतोय जिथं माहितीचा भडिमार होतोय. आपल्याला जर त्याची सवय झाली तरच आपण त्याचा सामना करू शकतो. जसं की रेडिओ, स्पॅम, मॅसेज याची आपल्याला सवय होते. याव्यतिरिक्त आपण इतर कशाचाही विचार करू शकत नाही. जेव्हा आपल्याला या गोष्टींचा वीट येईल तेव्हाच आपण जीवनातील इतर पैलूंकडे डोळसपणे पाहू."
 
म्हणूनच आयुष्यात थोडा कंटाळा ही यायला हवा. जेणेकरुन काहीही न करण्याचा आनंद घेता येईल.
शाहाराम हेश्मत सांगतात, "त्यामुळे कंटाळा आल्यावर यातून बाहेर पडण्यापेक्षा तो कंटाळा स्विकारावा. आपण मन मोकळेपणाने विचार केला पाहिजे. कारण हीच एक संधी आहे जिथं आपल्याला काय हवंय हे समजून घेता येईल."
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

पुढील लेख
Show comments