Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोबिआ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची भीती मनात घर करून असेल तर हे नक्की वाचा

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (15:09 IST)
सुधीर हुशार व्यावसायिक होता. वयाच्या 32 व्या वर्षीच त्यानं उत्तम भांडवल, प्रतिष्ठा आणि नफाही कमावला होता. त्याची स्वप्नं मोठी होती. परदेशात आणि देशात आपल्या वस्तूंचं नाव व्हावं अशी त्याची मनीषा होती.
 
अडचण एकच होती. ती म्हणजे सुधीरनं चारचौघात मिसळण्याची. एखाद्या मीटिंगमध्ये आपले विचार आणि प्रेझेंटेशन करण्याची त्याला अतिशय भीती वाटत असे. आयत्यावेळी हृदयाचे ठोके वाढत आणि हातांची थरथर सुरू होई. तोंड कोरडं पडायचं आणि मान खाली घालून आवरतं घ्यावं लागत असे.
 
अशी सुधीरची प्रगती खुंटत होती. हळूहळू त्याचं मन खिन्न झालं. आपली स्वप्नं आपल्याच स्वभावामुळे पूर्ण होऊ शकत नसल्याचं दुःख होत असे, तो चिडचिड करू लागला आणि कामावरुन लक्ष उडालं. आपल्या मनाची व्यथा तो कोणालाही सांगू शकला नाही.
 
सुधीरसारखं दुसरं उदाहरण मीनाचं. मीना उत्तम गृहिणी होती. नोकरी, व्यवसाय करण्याऐवजी तिनं गृकृत्यदक्ष व्हायचा निर्णय घेतला. त्याबद्दल ती आनंदी होती. तिची शेजारीण तिच्यासारखीच गृहिणी होती.
 
दोघी शॉपिंग, बाजारहाट एकत्र करायच्या. एकेदिवशी मीनाच्या शेजारणीच्या लक्षात आलं की ती आपल्याशिवाय बाहेर कुठेच जाऊ शकत नाही. तिच्याबरोबर असण्यावरच मीना अवलंबून आहे.
 
मीनाच्या अशा अवलंबून राहाण्यामुळे तिच्यागी रोजच्या कामावर, घडामोडींवर फार बंधंनं येत आहेत. तिने मीनाला एकदा ते स्पष्टच सांगून टाकलं.
 
हे ऐकल्यावर मीना चिडली, दुःखी झाली आणि घरातच बसून राहू लागली. तिच्या इतर मैत्रिणींना मीनाला मदत करायची होती. पण ती का दुःखी आहे हेच समजत नव्हतं.
 
तिसरी गोष्ट आहे सुजितची. सुजितच्या पत्नीच्या लक्षात आलं की पावसाळा सुरू होण्याच्या काळात तो कमालीचा अस्वस्थ होतो. रोज एकच प्रश्न त्याच्या मनात असे... प्रचंड पाऊस पडेल का? पडणार असेल तर मी कुठे बाहेर जाणार नाही...
 
ऑफिसला दांडी मारुन तो घरी बसून राही. येताजाता आकाशातल्या काळ्या ढगांकडे निरखून पाही आणि सुस्कारे सोडत असे. सुजितला नक्की काय झालंय हे त्याच्या बायकोला कळत नसे.
 
चौथं उदाहरण आहे विश्वासचं. विश्वास कामावर जाण्यासाठी रोज बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहनाचा वापर करत असे. परंतु गेल्या सहा महिन्यात मात्र त्यांनं सार्वजनिक वाहानं वापरणं सोडून दिलं आहे. वयाच्या पन्नाशीपर्यंत सहज बसमधून प्रवास करणारा विश्वास हट्टानं खासगी वाहन वापरू लागला. विश्नासच्या कुटुंबीयांना नक्की काय झालंय तेच समजेना...
 
आता या 4 उदाहरणांतून काय बोध घ्यायचा?
 
असा सहज प्रश्न तुमच्या मनात येईल आणि त्याचं उत्तर अगदी साधं आहे. सगळ्यांना भयगंड म्हणजेच फोबिआचा त्रास होत आहे. 'फोबिआ' हा शब्द मूळशब्द 'फोबोस' या ग्रीक शब्दावरुन तयार झाला आहे. त्याचा अर्थ घाबरवणे किंवा घाबरगुंडी असा होता.
 
फोबिआमघील प्रमुख प्रकार आहे तो म्हणजे अॅगोराफोबिआ. म्हणजेच मोकळ्या जागेची किंवा बाजारातल्या मोकळ्या अवकाशाची भीती वाटणे, म्हणजे थोडक्यात वरच्या मीनाची केस.
 
सुधीरचं उदाहरण हे सोशल किंवा सामाजिक ठिकाणी वावरणे आणि भाषण करणे याचा फोबिआ. सुजितला विशिष्ट प्रकारचा म्हणजे वातावरणाचा फोबिआ.
 
विश्वासला सार्वजनिक वाहनातून प्रवासाचा फोबिआ होता.
 
याखेरिज रक्ताचा, उंचावर जाण्याचा, बंद ठिकाणांचा- खोली, थिएटर, लिफ्ट अशा गोष्टींचा फोबिआ काही जणांना असतो. काही लोकांन सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचा फोबिआ म्हणजे भीती असते (घाण वाटणे वेगळं) काहींना सापाचा, कीटकांचा, जाळं विणणाऱ्या कोळ्यांचा, फुग्यांचा, फुलांचा, जिन्यांचा, रांगणाऱ्या मुलांचा, मांजर, कुत्री, ससे अशा प्राण्यांचाही फोबिआ असतो. थोडक्यात पृथ्वीतलावरील कशाचाही भयगंड असू शकतो.
 
तीव्र स्वरुपाची, नाहक, अनाकलनीय भीती इतकी असह्य होते की ती वस्तू, ठिकाण आणि प्रसगांपासून क्षणार्धात दूर होण्याची इच्छा मनात येते आणि प्रत्यक्ष तशी कृतीही घडते.
आपल्याला वाटणारी भीती कितीही तीव्र असली तरी ती नाहक आहे, इतकी भीती वाटायला नको हे कळूनही आजिबात वळत नसतं. त्यामुळे न्यूनगंड तयार होतो आणि कमालीचे नैराश्य मनात येते आणि जीवनशैली आक्रसत जाते.
 
साधारणपणे अशा लोकांची विचित्र, घाबरट, तऱ्हेवाईक, बालिश, लहान गोष्टीचा उगीच बाऊ करणारे अशी संभावना होते. परंतु फोबिआ हा मनोविकार आहे. आणि त्यावर प्रभावी उपाययोजना आहे. हे मात्र कोणी लक्षात घेत नाही. कारण याबाबतीत आपला समाज अज्ञानी आहे.
 
अनेकदा फोबिआ हा मनोविकार जडण्यामागे एखादा केंद्रिभूत भयग्रस्ततेचा अनुभव असतो. किंवा बालपणीची आठवण असते.
 
विश्वासला एकदा ट्रेनच्या प्रवासात अॅसिडिटीमुळे कमालीचे अस्वस्थ वाटले होते. प्रत्यक्षात तो पॅनिक अँक्झायटीचा अटॅक होता.
 
मीनाच्या बाबतीत असा काही प्रसंग घडल्याचं तिला आठवत नव्हतं. सुजितला पावसाळ्यात 26 जुलैला मुंबईत घडलेल्या ढगफुटी आणि प्रलयाची आठवण येत असे.
 
अनुवंशिकतेचं प्रमाण फोबिआमध्ये फारसं आढळत नसलं तरी कुटुंबात कोणाला तरी चिंताग्रस्ततेचा त्रास आढळतो.
 
प्रत्यक्ष भीतीचा अनुभव, त्यावेळची स्थिती, प्रसंग, वस्तू यांची मानसिक सांगड घातली जाते. मनाचं तसं कंडिशनिंग होतं. आणि आपल्या नकळत भीतीचा अटॅक जाणवू लागतो. कारण त्यावेळी तो प्रसंग किंवा त्या परिस्थितीमधल्या वस्तू आसपास असते. यालाच क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात.
 
याचा शोधनिबंध वाचणारे रशियन संशोधक पावलाव यांना यासाठी नोबेल पारितोषिकही मिळाले आहे.
काही लोकांना मानसोपचाराच्या मदतीने, काहींना संमोहनउपचाराद्वारे आणि स्वसंमोहनाद्वारे, तसेच इतर उपचारांनी यातून सुटका करुन घेता येते. याचबरोबर आधुनिक मेंदूशास्त्राच्या संशोधनामधून फोबिआमधील कारणीभूत जीवरसायनांचा संबंध सिद्ध झाला आहे.
 
अशा अत्याधुनिक जीवशास्त्रीय संशोधनामुळे फोबिआ अथवा भयगंडावर उपचार करता येतात. त्यामुळे रुग्णांना फायदा होतो.
 
मानसिकता, मेंदूशास्त्र, ध्यानधारणा यावरिल संशोधनाचे पुढचे पाऊल म्हणजे पूर्णभान अथवा माईंडफुलनेस.
 
पूर्णभानाच्या मदतीने मनात उद्भवणाऱ्या भीतीच्या स्वरुपाचं तत्क्षणी आकलन होतं आणि श्वासोच्छवासाच्या अचूक उपाययोजनेमुळे भीतीची लाट ओसरण्याची सुस्पष्ट जाणीव होते. तसंच भयगंडग्रस्तांचा आत्मविश्वास आपोआप वाढीस लागतो.
 
एकूणात भयगंड अनेक प्रकारचे आणि विविध असले तरी त्यावर मानसिक, औषधशास्त्रीय आणि माइंडफुलनेस असे प्रभावी उपचार आहेत.
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पड़ते का?

या झोपण्याच्या पोझिशनमुळे अ‍ॅसिडिटीपासून ते पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात जाणून घ्या

प्रेम विवाह करण्याआधी पार्टनरला या गोष्टी विचारा

Deja Vu म्हणजे काय? आधीपण पाहिलेली घटना असे जाणवत असेल तर वाचा

40 Plus वयोगटातील महिलांनी चेहऱ्यावर लावावेत या 5 गोष्टी, सुरकुत्या दूर होतील आणि चमक वाढेल

पुढील लेख
Show comments