Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बाळाला जन्म दिल्यानंतर मी त्याच्या जवळ जायलाही घाबरायचे', काय असतो प्रसूतीनंतरच्या OCDचा हा प्रकार

Webdunia
रविवार, 11 ऑगस्ट 2024 (17:25 IST)
युकेच्या वेल्समधील एका अभिनेत्रीनं ओसीडी (OCD - obsessive compulsive disorder)या आजारामुळे बाळाला जन्म दिल्यानंतर तिला कशी भीती वाटत होती या गोष्टीचं वर्णन केलं आहे. तिच्यामुळेच तिच्या बाळाला धोका आहे असं तिला सतत वाटत होतं.
 
किंबर्ली निक्सन असं या अभिनेत्रीचं नाव आहे. त्या चॅनल 4 सिटकॉम फ्रेश मीटच्या स्टार आहे. बाळाच्या आरोग्याबद्दलच्या त्यांना आपोआप प्रचंड चिंता वाटू लागली होती, असं त्या सांगतात.
 
ओसीडी (OCD)ही एक मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या आहे. यात संबंधित व्यक्तीच्या मनात विचित्र विचार येतात किंवा एकच विचार वारंवार येत राहतो. एकाच गोष्टीशी निगडीत कृती ती व्यक्ती वांरवार करत राहते.
गरोदर असताना आणि प्रसूतीनंतर महिलांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं.
 
ओसीडी ही अशीच एक मानसिक समस्या आहे. याची लक्षणं कोणती, त्याचे काय परिणाम होतात आणि त्याला कसं हाताळावं याबद्दल माहिती देणारा हा लेख..
किंबर्ली यांना काय त्रास होत होता?
"मी माझं काम योग्य पद्धतीनं करत नसल्याची जणू मला खात्री झाली होती. मी माझ्या बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देत नव्हते. त्याला ताप आला आहे का? असं सतत वाटायचं" असं त्या म्हणाल्या.
 
"प्रत्येक वेळेस जेव्हा माझं बाळ रडत होतं तेव्हा मी फक्त थरथरत होते. मी खरंच खूप सतर्क व्हायचे आणि घाबरलेली असायचे."
 
शेवटी किंबर्ली यांना पेरिनेटल ओसीडी (Perinatal OCD) असल्याचं निदान झालं. गरोदर असताना किंवा बाळाला जन्म दिल्यानंतरच्या वर्षभरात महिलांना जेव्हा ओसीडीचा त्रास होतो, तेव्हा त्याला पेरिनेटल ओसीडी म्हणतात.
 
अर्थात पेरिनेटल ओसीडीचं निदान होण्यापूर्वी किंबर्ली यांना त्रास होत होता, तेव्हा तिनं ऑनलाइन मदत मिळवण्याचा प्रयत्न केला.
 
त्यावेली त्यांना जे सल्ले मिळाले त्यात त्यांना असं सांगण्यात आलं की हा त्रास म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये दु:खी झाल्यासारखं वाटतं.
 
पण त्या म्हणाल्या की, "त्यावेळेस मला दु:खी वाटत नव्हतं, मला भीती वाटत होती."
 
किंबर्ली वेल्समधील पाँटीप्रिड शहरातील रहिवासी आहे. त्यांनी वाईल्ड चाईल्ड आणि अंगस, थॉंग्स अँड परफेक्ट स्नॉगिंग या चित्रपटात काम केलं आहे. त्यांची बाळ व्हावं अशी खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आयव्हीएफ (IVF)चे उपचार घेतले होते.
किंबर्ली यांच्या मुलाचा जन्म 2020 मध्ये कोरोनाच्या संकटकाळात झाला. त्रासदायक प्रसूतीनंतर किंबर्ली यांना लवकरच अस्वस्थ करणारे किंवा त्रासदायक विचार येऊ लागले. आपण चुकून आपल्या मुलाला अपाय करू किंवा इजा पोहोचवू, असं त्यांना वाटायचं.
 
'ते विचार खूपच विचित्र असायचे. मला वाटायचं माझ्या बाळाचं काय होईल? मी त्याचं संरक्षण कसं करेन? आपल्या बाळाला आपल्यापासून धोका असेल तर काय होईल? असं त्यांनी रेडिओ वेल्सच्या 'बूक्स दॅट मेड मी विथ ल्युसी ओवेन' ( Books That Made Me with Lucy Owen) या कार्यक्रमात सांगितलं.
 
"खूप थकवा आल्यामुळं जर तो आपल्या हातून पडला तर?" असा विचार करायचे.
 
"आता तटस्थपणे विचार केल्यावर मला जाणवतं की, असं काहीही घडलं नसतं. मात्र त्या स्थितीत तुम्ही खरोखरंच अस्वस्थ होता, मी सुद्धा तशीच झाले होते."
 
"त्यावेळेस तुम्हाला नक्की काय होतं आहे, खरं काय आहे, हे काहीच कळत नसतं आणि तुमचा स्वत:वरच विश्वास राहिलेला नसतो."
 
हे तर माझं बाळ होतं. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी त्याला जन्म दिला आहे. मात्र मी त्याच्याजवळ जायला घाबरत होते. कारण त्याला कोणतीही इजा पोहोचू नये असं मला वाटत होतं.
पेरिनेटल ओसीडी म्हणजे काय?
पेरिनेटल ओसीडी (Perinatal OCD) ही समस्या गरोदरपणात किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर उद्भवते. गरोदरपणात किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर वर्षभरात ओसीडीचा त्रास होतो त्याला पेरिनेटल ओसीडी म्हणतात.
 
या आजाराला पोस्टपार्टम म्हणजेच प्रसुतीनंतरचा ओसीडी सुद्धा म्हटलं जातं. (बाळाला जन्म दिल्यानंतरच्या काही आठवड्यात हा आजार उद्भवतो)
 
अनेकदा हा आजार बाळाला इजा होण्याच्या मोठ्या भीती भोवतीच केंद्रित राहतो. यात चुकून, अपघातानं किंवा मुद्दामहून आपल्या बाळाला हानी पोहोचवली जाण्याच्या चिंतेवर लक्ष केंद्रित झालेलं असतं.
 
एनएचएस (NHS-इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था) नुसार, "या प्रकारची चिंता किंवा भीती वाटणं ही अगदी स्वाभाविक बाब आहे. या प्रकारची चिंता अधूनमधून वाटणं ही एक सर्वसामान्य बाब आहे."
माईंड सायम्रू (Mind Cymru)चे सिमॉन जोन्स यांच्या मते, बाळाच्या आरोग्याबद्दल, सुरक्षिततेबद्दल चिंता वाटणं आणि बाळाची काळजी घेऊ पाहणं, त्याचं संरक्षण करू पाहणं ही एक सामान्य बाब आहे.
 
(Mind Cymru ही इंग्लंड, वेल्समधील मानसिक आरोग्यासंदर्भात काम करणारी संस्था आहे)
 
" दीनचर्येवर परिणाम करतील असे काही विचित्र किंवा अस्वस्थ करणारे विचार करणं. वारंवार बाळाच्या सुरक्षिततेबद्दल विचार किंवा कृती करू करणं. या गोष्टी जर तुमच्या बाबतीत होत असतील तर तुम्हाला पेरिनेटल ओसीडी असू शकतो," असं ते सांगतात.
 
"अतिकाळजी करणं, एखाद्या गोष्टीवरच लक्ष केंद्रीत करणं, वारंवार तोच विचार करणं आणि त्यानुसारच तीच तीच कृती करणं या गोष्टी पालक होण्याशी आणि बाळ होण्याच्या भावनांशी संबंधित असू शकतात."
 
नॅशनल चाईल्डबर्थ ट्रस्टचं या बाबतीत म्हणणं आहे की, गर्भवती असताना ओसीडी होण्याची शक्यता किंवा दर 5 टक्के असू शकतो. तर प्रसूतीनंतर हा दर 9 टक्के असू शकतो. पुरुष आणि महिलांमध्ये ओसीडी होण्याची शक्यता सारखीच असते.
 
'सर्वकाही फक्त मानसिक'
किंबर्ली म्हणतात की, पेरिनेटल ओसीडी झाला असल्याचं निदान होण्याआधी त्यांनी कधीही याबद्दल ऐकलं नव्हतं.
 
"माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर माझी स्थिती फारच वाईट झाली होती. मात्र मला पोस्टनेटल म्हणजे प्रसूतीनंतरचा ओसीडी झाला असेल किंवा नैराश्यं आलं असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं," असं त्या म्हणाल्या.
 
"ज्यावेळी तुम्हाला काय होतं आहे याचं नीट निदान होत नसतं आणि कोणालाही नेमकं काय करावं हे माहिती नसतं तेव्हा त्या गोष्टीमुळे तुम्ही घाबरता."
 
माझ्या दृष्टीनं ओसीडी म्हणजे खूपच नीटनेटकं असणं आणि गोष्टी विशिष्ट प्रकारे आवडणं असंच होतं. मी प्रचंड पसारा करते. माझ्या पतीला मी अक्षरश: वेड लावते. मात्र मी ओसीडीत करतात, तसं काहीच करत नव्हते.
 
"माझ्या सर्व कृती या मानसिक स्वरुपाच्या होत्या. त्यामुळे त्या एकप्रकारे अदृश्यच होत्या. परिणामी त्या ओळखणं किंवा त्यावर लक्ष ठेवणं हे खूपच अवघड होतं."
जोन्स या बाबतीत सांगतात की "ओसीडीचे दोन मुख्य भाग असतात. पहिला एखाद्या गोष्टीचा अति किंवा वारंवार विचार करणं (obsessions) आणि दुसरा त्या विचारांनुसार एखादी गोष्ट शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या वारंवार करणं (obsessions)."
 
"विशिष्ट गोष्टीचा विचार केल्यामुळे किंवा त्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे निर्माण झालेला तणाव किंवा अनिश्चितता कमी करण्यासाठी वारंवार कृती केली जाते."
 
ते म्हणाले, प्रसूतीशी निगडीत मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे कलंक किंवा काळिमा म्हणून पाहिलं जातं. मात्र, ज्यांना वाटतं की असा त्रास त्यांना होऊ शकतो अशांना मदत किंवा आधार घेण्यासाठी माईंड सायम्रू प्रोत्साहन देतं.
 
"तुमच्या भावना, अस्थिर विचार आणि त्याच्याशी निगडीत वर्तन याबाबत एखाद्याशी मोकळेपणानं यावर बोलणं हे अवघड असू शकतं. यामुळे आजाराचं निदान न होण्याची शक्यता असते आणि त्यातून ती व्यक्तीमध्ये एकटं पडल्याची भावना निर्माण होऊ शकते."
 
इतरांना मदत करण्याचा निर्धार
किंबर्ली यांचे इन्स्टाग्रामवर अडीच लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया व्यासपीठावर त्या त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रवास शेअर करत असतात. मानसिक आरोग्य, ओसीडी याबद्दल जागरूकता वाढवणं हा त्यामागचा उद्देश असतो.
 
"प्रसूतीनंतरच्या मानसिक आजारामुळे माझी वाईट अवस्था झाली होती. तेव्हा मी माझ्या स्थितीबद्दल अतिशय प्रामाणिक राहण्यास सुरुवात केली," असं त्या म्हणाल्या.
 
"मागील तीन वर्षांमध्ये मला हजारोंच्या संख्येनं मेसेज आले. ते सर्व प्रकारच्या लोकांकडून होते. पुरुषांकडून, महिलांकडून आणि अगदी दोन आठवड्यांचं बाळ असलेल्या मातांकडून देखील होते."
त्यांनी सांगितलं की, त्यांची मानसिक स्थिती सर्वात वाईट असताना आणि त्या स्थितीबद्दल ऑनलाइन मदत मिळत नसल्यानं त्यांनी एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे, जे लोक भविष्यात अशाप्रकारच्या स्थितीतून जातील त्यांच्या मदतीसाठी उभं राहण्याचा.
 
किंबर्ली आता या आजारातून सावरत आहेत. आपल्या लहान मुलासोबत वेळ घालवायला त्यांना आवडतं.
 
"माझ्या मुलाबरोबर माझं एक अनोखं नातं आहे. माझं हे नातं कधीच असणार नाही, अशी मला खूप चिंता वाटत होती," असं ती म्हणाली.
 
"म्हणूनच मला लोकांना खरोखरंच सांगायचं आहे की, तुम्ही करू शकता आणि कराल. त्यामुळे तुमच्या बाळाबरोबरचं तुमचं नातं अधिक खास होऊ शकेल."
 
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

डिनर स्पेशल मटर पुलाव

Health Benefits of Broccoli : ब्रोकोली हिवाळ्यातील सुपर फूड आहे फायदे जाणून घेऊया

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

केसांना कापूर तेल लावल्याने कोणते फायदे होतात?

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments