Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळाला पहिलं स्तनपान कधी द्यावं? दूध बाळासाठी पुरेसं आहे हे कसं ओळखायचं?

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (19:26 IST)
1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. भारतीयांना तर 'आईच्या दुधा'चं माहात्म्य अनेक चित्रपट, मालिका, पुस्तक आणि बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतून सांगितलं जातं.
 
नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी तर आईचं दूध अमृताहूनही जास्त गरजेचं असतं. वैद्यकीय तज्ज्ञांनी तर असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते, अगदी पाण्याचीही नाही.
 
आईचं दूध बाळासाठी तर महत्वाचं आहेच पण त्या बाळाच्या माध्यमातून मातृत्वाचा सुंदर अनुभव घेणाऱ्या आईसाठी देखील स्तनपान तेवढंच महत्वाचं आहे.
 
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने बालरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. गीतांजली शाह यांनी बीबीसीला सांगितलेली ही माहिती, जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळासाठी आणि त्या बाळाच्या आई वडिलांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.
 
1. स्तनपान बाळासाठी का महत्वाचं असतं?
स्तनपान आई आणि बाळाचं नातं अधिकाधिक दृढ करतं. बाळाला लागणारे उष्मांक, जीवनसत्व, अँटी बॉडीज, लॅक्टोफेरॉन, इम्युनोग्लोब्लिन्स ही सत्वं बाळाची रोग प्रतिकारकशक्ती वाढवत असतात.
 
बाळाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान अत्यंत गरजेचं आहे. तसेच स्तनपानामुळे बाळाला ऍलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार आणि पोटाच्या विकारांचा धोकाही कमी होतो.
 
स्तनपानाचे फक्त बाळालाच नाही तर आईलाही खूप फायदे आहेत. प्रसूतीनंतर लगेच बाळाला स्तनपान दिल्याने आईच्या शरीरातही अनेक बदल होत असतात.
 
प्रसूतीनंतर एक ते दोन वर्षं स्तनपान दिल्यानं स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यांचा धोका कमी होतो.
 
2. पहिलं स्तनपान कधी?
पहिलं स्तनपान प्रसूतीनंतर लगेच द्यायला हवं. बाळाचा जन्म झाल्यानंतर 20 मिनिटांच्या आत बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे.
 
पहिलं स्तनपान करत बाळाला आईच्या शरीरावर पालथं ठेवावं लागत आणि आईच्या शरीराला बाळाच्या शरीराचा स्पर्श झाला की आईला पान्हा फुटतो.
 
बाळ स्वतः स्तन शोधतं आणि ते दूध पिऊ लागतं. याचं पद्धतीला ‘कांगारू केअर मेथड’ असंही म्हणतात. या पद्धतीत आईच्या छातीवर बाळाला कपडे न घालता उघडं ठेवावं लागतं जेणेकरून आई आणि बाळाच्या त्वचेचा स्पर्श झाला की, बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
 
पहिल्या स्तनपानाला कोलॉस्ट्रम (Colostrum) असं म्हणतात. बाळाच्या जन्मानंतरचं पहिलं लसीकरण हे स्तनपानच आहे.
 
मात्र 20 मिनिटांच्या आतच हे स्तनपान व्हायला पाहिजे, कारण नंतर बाळ झोपून जातं. बाळ सतर्क असेल तरच ते व्यवस्थित दूध पिऊ शकतं आणि आईच्या स्तनांमध्ये स्तनपानाची प्रक्रिया सुरु होते.
 
केवळ सामान्य प्रसूतीच्या केसेसमध्येच नाही तर सिझेरियन झालेलं असलं तरीही बाळाला काही मिनिटांतच स्तनपान दिलं पाहिजे.
 
आधीच्या काळी बाळ जन्माला आल्यावर बाळाला ग्लुकोज किंवा पाणी वगैरे दिलं जायचं मात्र जन्माला आल्यावर आईचं दूध काही मिनिटांतच मिळणं हा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
 
3. स्तनपानाच्यावेळेस बाळाला कसं धरायला हवं?
स्तनपान देताना बाळाला धरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या आपण थोडक्याच वाचू.
 
स्तनपान करण्यासाठी बाळाला घेताना बाळाचं डोकं आईच्या हातात व्यवस्थित टेकायला हवं आणि आईचा हात हा बाळाच्या पाठीच्या मणक्यावर असावा. आईच्या पंजाचा भाग बाळाच्या पाठीशी असायला हवा. बाळाच्या पोटाचा आईच्या पोटाला स्पर्श व्हायला हवा. यामुळे बाळ आरामात दूध पिऊ शकतं.
 
बाळाला अशा पद्धतीने धरल्यास बाळाला आरामात दूध पिता येतं. यामुळे आईच्या स्तनाग्रांना भेगा पडत नाहीत. बाळाला अशा पद्धतीने धरण्याला मॉडिफाइड क्रेडल पोजिशन किंवा सुधारित पाळणा पद्धती असं म्हणतात.
 
दुसरी पद्धत आहे फुटबॉल होल्ड पोजिशन या पद्धतीमध्ये बाळाचे पाय आईच्या शरीराच्या मागे जातात. ज्या मातांची वेळेपूर्वी प्रसूती झालेली आहे किंवा मातेच्या स्तनांचा आकार मोठा असल्यास, बाळाच्या आणि आईच्या आकारात तफावत असल्यास फुटबॉल होल्ड पोजिशन सोपी ठरू शकते.
 
तिसरी पद्धत आहे सिझेरियन पद्धत सामान्यतः सिझेरियन झाल्यानंतर पहिले दोन तीन दिवस आईला जागेवरून उठता येत नाही. यामुळे मग आईने झोपून राहावं आणि नर्स किंवा इतर कुणाच्या मदतीने बाळाला आईच्या बाजूने धरावं. बाळाला आईच्या शरीरावर उलटं धरल्यास बाळ स्तनपान करू शकतं.
 
आणखी एक पद्धत आहे आणि ती म्हणजे आईने झोपून बाळाला कुशीवर दूध पाजणे मात्र ही पद्धत खूपवेळा करू नये. कारण अशापद्धतीने दूध पाजताना बाळाच्या छातीत ते दूध जाऊ शकतं. अशावेळी आई आणि बाळ दोघेही झोपेत असू शकतात. त्यामुळे बसूनच दूध पाजणं महत्वाचं आहे.
 
जुळ्या बाळांना दूध पाजण्यासाठी देखील काही विशिष्ट पद्धती वापरता येतात. जुळ्या बाळांचं स्तनपान करायचं असेल तर आईने बाळांना दोन्ही बाजुंनी धरायला पाहिजे. बाळांचे पाय आईच्या शरीराच्या मागे जायला हवेत.
 
या पद्धतीमध्ये दोन्ही बाळांना धरून बसणं आईला अवघड होऊ शकतं त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतली जाऊ शकते. अशावेळी दोन्ही बाजूला दोन उशा ठेवायच्या असतात. या पद्धतीमुळे आईचा खूप वेळ वाचतो.
 
आता बाळाला स्तनपान करताना बाळ व्यवस्थित दूध पित आहे की नाही हे नेमकं कसं कळेल? तर स्तनपान करतांना बाळाचं तोंड संपूर्णपणे उघडलं गेलं पाहिजे. बाळाचे ओठ बाहेरच्या बाजूने उघडले गेले पाहिजे. बाळाचे ओठ बंद झाले असतील तर स्तनपान व्यवस्थित होत नाहीत.
 
दुसरी बाब म्हणजे बाळाच्या हनुवटीचा आईच्या शरीराला स्पर्श व्हायला हवा. बाळाची हनुवटी आणि आईच्या त्वचेचा स्पर्श होत नसेल तर त्याचा अर्थ बाळ फक्त निपल फीड करतंय असा होतो.
 
कधीकधी असंही होतं की बाळ दूध पितापिताच झोपी जातं. त्यामुळे दुधाचा शेवटचा घोट त्याच्या तोंडातच राहतो. असं झालं असेल तर आईने तिचं स्वच्छ बोट बाळाच्या तोंडात घालायचं आणि बाळाला तो घोट गिळू द्यायचा आणि बाळाची ढेकर काढायची.
 
या दोन तीन पद्धतींमुळे आपल्याला कळतं की बाळ व्यवस्थित दूध पीत आहे आणि त्याला योग्य ते पोषण मिळत आहे. प्रसूतीनंतर दवाखान्यातून बाहेर पडताना आई बाळाला व्यवस्थित स्तनपान करत आहे का हे डॉक्टर आणि नर्सेसच्या मदतीने तपासून घेतलं पाहिजे.
 
4. बाळाला मिळणारं दूध पुरेसं आहे की नाही हे कसं कळणार?
तीन महत्वाच्या निकषांवरून बाळाला पुरेसं स्तनपान होत आहे की नाही हे ठरवलं जाऊ शकतं.
पहिला निकष म्हणजे 24 तासांच्या काळात बाळाला किमान सात ते आठ वेळा लघवी व्हायला पाहिजे. त्यामुळे सात ते आठ वेळा जर लघवी होत असेल तर बाळाला वरचं दूध किंवा बाटलीतल्या दुधाची गरज नसते त्याच्या रडण्याचं कारण वेगळं असू शकतं.
 
दुसरा निकष म्हणजे बाळाचं वजन वाढायला पाहिजे. बाळाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये बाळाचं वजन दहा टक्क्यांनी कमी होतं पण दहाव्या दिवसानंतर बाळाचं वजन वाढायला सुरुवात होते. दिवसाला 20 ते 40 ग्रॅम वजन वाढायला पाहिजे. महिन्याला अर्धा ते एक किलो वजन वाढायला पाहिजे आणि सहाव्या महिन्यात बाळाचं वजन दुप्पट व्हायला पाहिजे. अशा वेगाने बाळाचं वजन वाढत असेल तर आईच दूध बाळाला पुरेसं आहे असा त्याचा अर्थ होतो.
 
तिसरा निकष म्हणजे स्तनपान झाल्यानंतर बाळाने थोडावेळ का होईना पण झोपायला पाहिजे. हे तिन्ही निकष पूर्ण होत असतील तर याचा अर्थ असा होतो की बाळाचं दूध पुरेसं आहे.
 
5. कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाणाऱ्या महिलांनी स्तनपान कसं द्यावं?
प्रसूतीनंतर पहिले तीन महिने प्रसूती रजा मिळते. आजकाल सहा महिन्यांसाठी लॅक्टेशन लिव्ह म्हणजे स्तनपानासाठी रजा मिळण्याचीसुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांनी बाळाच्या योग्य पोषणासाठी सहा महिने रजा घेऊन बाळाचे स्तनपान केलं पाहिजे.
 
जर कामाला जावंच लागत असेल आणि ऑफिस घरापासून जवळ असेल तर दिवसातून दोन वेळा घरी येऊन स्तनपान करायला हवं. जर ते जमत नसेल तर कुटुंबीय बाळाला आईकडे घेऊन येऊ शकतात.
 
ऑफिसजवळ पाळणाघर असेल तर तिथेही बाळाला ठेवून स्तनपानाची सोय केली जाऊ शकते. यामुळे स्तनपानात खंड पडत नाही आणि आईला दूध येत राहतं. स्तनपानात खंड पडला की आईचं दूधच बंद होतं आणि मी मग बाळाला स्तनपान देता येत नाही.
 
आईचं घरी येऊन बाळाला स्तनपान करणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीत Expressed Breast Milkचा पर्याय वापरता येऊ शकतो.
 
जर आईला बाळासाठी दूध काढून ठेवायचं असेल तर सकाळच्या वेळी जेव्हा बाळ झोपलेलं असेल अशावेळी आईने पाठीला आणि स्तनांना शेक द्यावा. त्यांनतर खोबरेल तेल किंवा हातांनी मसाज करावा. असा मसाज केल्यानंतर स्तनांमध्ये दूध जमा होतं आणि त्यानंतर तिने Expressed Breast पद्धतीने हे दूध काढलं पाहिजे.
मात्र आईला हे करणं जमत नसेल, त्रास होत असेल तर अशावेळी वेगवेगळ्या ब्रेस्टपंपच्या मदतीने आई तिच्या बाळासाठी दूध काढून ठेवू शकते. आईचं बाटलीमध्ये काढलेलं दूध बाळाला देतांना मात्र सिरिंज, वाटी चमच्याने द्यायला हवं आणि बाटलीचा वापर करू नये.
 
आई बऱ्याच दिवसांसाठी बाळाला सोडून जाणार असेल आणि दूध जास्त प्रमाणात हवं असेल तर अशावेळी इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपचा वापर केला पाहिजे.
 
साधारण तापमानात ब्रेस्टमिल्क आठ तासापर्यंत चांगलं राहतं, त्याला काहीच करायची गरज नसते. बाळाला ते दूध पाजताना एका चमच्याने ते दूध ढवळावं लागतं. आईचं दूध फ्रिजमध्ये ठेवलं तर किमान 24 तासांसाठी ते दूध चांगलं राहतं. फ्रिजमधलं थंड दूध काढून बाळासाठी कोमट करत असतांना गॅस किंवा मायक्रोवेव्हचा वापर करू नये अशावेळी दुधाचं भांडं गरम पाण्यात ठेवून ते दूध कोमट केल्यास ते बाळाला पिण्यायोग्य होतं.
 
फ्रिजरमध्ये ब्रेस्ट मिल्क ठेवल्यास बर्फ झालेलं हे दूध तीन महिन्यांपर्यंत चांगलं राहतं.
 
काहीवेळा आईचं दूध देणं शक्य नसतं. उदाहरणार्थ आईचा मृत्यू झाला असेल किंवा बाळ दत्तक घेतलेलं असेल तर अशावेळी ब्रेस्ट मिल्क बँकांची मदत घेतली जाऊ शकते.
 
काही अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आईचं दूध बाळाला पाजणं शक्य नसतं. आईला काही विशेष औषधं घ्यावी लागत असतील तर अशा परिस्थितीत आईचं दूध बंद करावं लागतं. मात्र अशा परिस्थिती सोडल्या तर बाळाला 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचं दूध द्यावं आणि सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार सुरू करावा.
 
स्तनपानाबद्दल असणारे समज आणि गैरसमज
स्तनपानाविषयी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते. बाळाला फक्त कोलेस्ट्रॉलची गरज असते आणि आईच्या दुधातून तेच मिळतं. आपल्याकडे बाळाला लोणी, गूळ, मध अशा गोष्टी चाटवण्याची पद्धत आहे पण हे सगळं चुकीचं आहे.
 
उन्हाळा जास्त असेल बाळाला पाणी कमी पडू शकतं अशी भीती वाटू शकते. मात्र आईच्या दुधात 87 टक्के पाणी असतं त्यामुळे बाळाला आईच्या दूधातूनच योग्य प्रमाणात पाणी मिळत असतं.
 
बाळाचा पाळणा हा नेहमी आईजवळच असायला हवा. कारण बाळाच्या आवाजाने, बाळाच्या स्पर्शाने, बाळाच्या वासाने आईला पान्हा फुटू शकतो. त्यामुळे आई आणि बाळाने जवळ असणं खूप महत्वाचं आहे.
 
आई कामाला जात असेल तर अनेकदा सांगितलं जातं की चौथ्या महिन्यापासून कामाला जायचं असेल तर दुसऱ्या महिन्यापासूनच बाळाला बाटलीतून दूध दिलं पाहिजे पण असं करू नये.
 
आणखीन एक गैरसमज म्हणजे बाळाला दोन्ही बाजुंनी थोडं थोडं दूध पाजलं पाहिजे मात्र बाळाला एकावेळी एकाच बाजूने पूर्णपणे पाजलं पाहिजे. कारण स्तनपान करताना जे पहिलं दूध असतं त्याला फोरमिल्क म्हणतात आणि जे दूध नंतर येतं त्याला हॅन्डमिल्क असं म्हणतात.
 
फोरमिल्कमध्ये पाणी आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि हॅन्डमिल्क मध्ये फॅट्स म्हणजे उष्मांक जास्त असतो. त्यामुळे आईने दोन्ही बाजुंनी बाळाला थोडं थोडं पाजलं तर बाळाला फक्त पाणी आणि प्रथिने मिळतात. त्यामुळे बाळाला पुरेसं दूध मिळत नाही.
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळा विशेष रेसिपी : मटारचे पराठे

नियमित मल्टीविटामिन घेणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

या 3 गोष्टी तुपात मिसळून लावा, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा नाहीशा होतील.

Healthy Food : फायबर आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेले हे 5 सॅलड वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे

पुढील लेख
Show comments