Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

Webdunia
गुरूवार, 25 जुलै 2024 (10:33 IST)
भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जात असला, लोकसंख्येचा भारतातील साधनांवर ताण येत असला तरी एक वेगळीच मोठी समस्या भारतीय समाजात दडलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा प्रजननदर वेगानं घसरत चालला आहे.
 
आज आपल्याकडे काम करू शकत असलेलं मनुष्यबळ मोठं आहे, लोकसंख्या जास्त असून तरुणांचीही संख्या जास्त आहे असं म्हटलं जात असलं तरी हे चित्र प्रचंड वेगानं बदलण्याच्या मार्गावर आहे.
 
एकीकडे अतिलोकसंख्येमुळे तरुणांना अर्थाजनासाठी काम नाही आणि पुढील दशकांत याच पिढीचं रूपांतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणं, हे एक आव्हान ठरण्याची चिन्हं आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये देशात ज्येष्ठांची संख्याही तितकीच वाढलेली दिसून येईल.
 
हे सगळे संकेत आता दिसत आहेत, याची काही कारणंही आहेत. काही आकडेवारी आणि अभ्यासातून भारताच्या लोकसंख्येची वाटचाल लक्षात येत आहे.
 
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशाचा प्रजनन क्षमता दर म्हणजेच फर्टिलिटी रेट शहरी भागात 1.6 वर तर ग्रामीण भागात 2.1 वर आला आहे. 2050 पर्यंत भारताचा संपूर्ण प्रजनन दर म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट 1.29 वर येण्याची क्षमता आहे.
 
या स्थितीबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे भारताची फक्त लोकसंख्या कमी होणार नसून भारताची आर्थिक वाढ आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात येईल अशी भीती तज्ज्ञांना वाटते.
 
आज आपण ज्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजेच 'डेमोग्राफिक डिव्हिडंड'चा फायदा होत आहे असं म्हणतोय नेमका तोच नाहीसा होणार अशी चिन्हं निरीक्षकांना वाटत आहे.
 
ही स्थिती आता वेगानं वाढत आहे. लोकांमध्ये प्रजननासंदर्भातील आरोग्याची योग्य जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकताही तज्ज्ञांना वाटत आहे.
 
यामध्ये शरीराबरोबर मानसिक आरोग्यही नीट राहावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
 
इंदिरा आयव्हीएम केंद्राचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अजय मुर्डिया यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीत भारतात वंध्यत्व एखाद्या साथीप्रमाणं पसरत चाललं आहे. ही वंध्यत्व लाट सुप्त असून प्रत्येक सहा जोडप्यांपैकी एका जोडप्यावर तिचा परिणाम होतोय असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
आता जरी तरुणांची संख्या जास्त आहे म्हणून मिरवत असलो तरी वृद्धांची वाढती संख्या आणि वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण यामुळे आपलीही आशियातील इतर देशांप्रमाणे स्थिती होईल अशी शक्यता डॉ. मुर्डिया व्यक्त करतात.
 
बदलती जीवनशैली, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं भयावह वेगानं वाढलेलं प्रमाण, अंमली पदार्थांचा वापर, सेक्सद्वारे पसरले जाणारे आजार अशा अनेक कारणांमुळे वंध्यत्वाचा दर वाढलेला आहे.
 
डॉ. मुर्डिया तर म्हणतात, “येत्या काळात या घटकांमुळे भारताच्या लोकसंख्येवर परिणाम होईल आणि त्यामुळे वृद्धत्वाच्या लाटेला सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी आपण काहीच तयारी केलेली नाही.”
 
जीवनशैलीचा वंध्यत्वाशी कसा संबंध आहे?
डॉ. मुर्डिया यांनी व्यक्त केलेल्या भीतीबरोबरच वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण आणि त्याचा बदलत्या जीवनशैलीशी काही संबंध आहे का हे पाहाण्याचा आपण प्रयत्न करू.
 
महिलांमधील वंध्यत्वासाठी एंडोमेट्रिओसिस सारख्या गुंतागुंती, फॅलोपिन ट्यूबमध्ये असणारा अडथळा, प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर, पीसीओएस, युटेराइन फायब्रॉइड्स, अनियमित पाळी, सिस्टिक फायब्रोसिस तसेच प्रतिकारक्षमतेसंदर्भातील अडथळे अशा गोष्टी कारणीभूत असल्याचं दिसतं.
 
तर पुरुषांमधील वंध्यत्वासाठी वीर्यस्खलनातील अडथळे, सेक्रटम व्हेनमध्ये त्रास, शुक्राणूंची कमतरता किंवा त्यांची गुणवत्ता कमी असणं किंवा त्यांची हालचाल कमी असणं अशी अनेक कारणं असतात.
 
नवी मुंबई मधील खारघर येथे मदरहूड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती माने यांनी बीबीसी मराठीला याबाबत अधिक माहिती दिली.
 
त्या सांगतात, "अयोग्य सवयी किंवा चुकीची जीवनशैली असेल तर तुमच्या प्रजनन क्षमतेवर फार मोठा परिणाम होतो तसेच नैसर्गिकरित्या गरोदर राहाण्यात अडथळे येतात. महिलांमध्ये 30 नंतर आणि पुरुषांमध्ये साधारण 40 ते 45 वर्षे वयानंतर प्रजनन क्षमता कमी होत जाते हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही वरचेवर अल्कोहोलयुक्त पेयं अर्थात मद्य घेत असाल तर प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो."
 
डॉ. माने सांगतात, "खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अतिप्रक्रियायुक्त पदार्थ, पाकिटबंद पदार्थांचं सेवन, साखर आणि सोडियम जास्त असलेले पाकिटबंद पदार्थ खाल्ल्यामुळे हार्मोन्समध्ये असमतोल निर्माण होतो. अशा सवयींमुळे लठ्ठपणा वाढीस लागतो आणि पीसीओएससारखे त्रासही सुरू होतात त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो."
 
आई होण्याचं नक्की कोणतं वय योग्य आहे?
आता मुलांना कधी जन्म द्यायचा हा निर्णय सर्वस्वी त्या जोडप्याचा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये लोक त्यासाठी विविध घटकांचा विचार करत आहेत. आर्थिक स्थैर्य, करिअर, आरोग्य, वय, नात्यातलं स्थैर्य, एकमेकांबरोबर वेळ मिळणं यासारखे बरेच घटक त्यासाठी कारणीभूत आहेत.
 
या मुद्द्यावर बीबीसी मराठीने काही डॉक्टरांशी यापूर्वीही चर्चा केली होती.
 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी पाळशेतकर यांच्या मते 25- 35 हे आई होण्याचं सर्वांत योग्य वय आहे.
 
त्या म्हणतात, "35 नंतर आई होण्यात अनेक अडचणी असतात. त्यामुळे 25 ते 35 ही दहा वर्षं योग्य असतात. 35 वर्षांनंतर गरोदर राहण्याचा प्रयत्न केला तर खूप त्रास होतो. हल्ली लग्न उशिरा होतात.
 
त्यानंतर कधीतरी आई होण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुलींनी अतिशय सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी प्रजनन चाचणी केली पाहिजे.
 
AMH(Anti Mullerian hormone) नावाची एक चाचणी असते. त्यात अंड्यांची संख्या कळते. ती जर कमी झाली तर धोका असतो. त्यामुळे मुलींनी सावध रहायला हवं."
 
डॉ. चैतन्य शेंबेकर नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मतेही आई होण्याचं योग्य वय 25 ते 30 आहे.
 
ते म्हणतात, "आमच्याकडे जे IVF साठी पेशंट येतात त्यांचे Ovarian reserve 30 वर्षांच्या वयात कमी झाले असतात. 32 वर्षांपर्यंत तर ते अगदीच कमी झालेले असतात. आपण आता पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करतो. त्यानुसार करिअरवर भर दिला जातो.
 
"त्यामुळे मुख्य अडचण येते. कितीही मुलं हवे असले तरी याच काळात जन्मात घालायला हवीत असं माझं स्पष्ट मत आहे," शेंबेकर सांगतात.
 
डॉ. श्रुती माने सांगतात, महिला साधारणतः विशीच्या मध्यंतरापासून तिशीच्या सुरुवातीपर्यंत जास्त प्रजननक्षम असतात. अर्थात माता होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार असणं आणि मानसिकदृष्ट्याही तयारी असणं महत्त्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एकच उत्तर सगळ्यांना लागू पडणार नाही. एखाद्या जोडप्याला योग्य वाटणारं वय दुसऱ्यांना अयोग्य वाटू शकतं.
 
आई-बाबा होण्याआधी जोडप्यानं काय काळजी घेतली पाहिजे?
गरोदरपण ही एक मोठी जबाबदारी आहे. मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेण्याआधी दोघांनीही एकमेकांशी व्यवस्थित मोकळेपणानं बोलून या निर्णयावर विचार केला पाहिजे.
 
गरोदरपण हे फक्त एका नव्या गोष्टीची सुरुवात होणार म्हणून उत्साहाची गोष्ट नाही तर त्यासाठी योग्य नियोजन आणि होणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी दोघांची एकत्रित कटिबद्धता आवश्यक असते.
 
दोघांनी मोकळेपणाने एकमेकांच्या अपेक्षा, आर्थिक स्थैर्य, पालक म्हणून भूमिका, कर्तव्यं, कामं, संभाव्य आव्हानं आणि मुलांची भावी वाढ याबद्दल बोललं पाहिजे.
 
जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत?
प्रजनन क्षमता वाढण्यासाठी आणि एकूणच आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याती गरज आहे.
 
सर्वांनी योग्य चौरस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. त्यात फळं, भाज्या, प्रथिनं, सर्व धान्यं, डाळी यांचा समावेश असला पाहिजे.
 
दररोज चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं जॉगिंग, पळणे, पोहणे, सायकल चालवणे असे व्यायाम आणि योगासनं-ध्यान यांचाही समावेश जीवनशैलीत केला पाहिजे.
 
गरोदरअवस्था यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी दारू आणि सिगारेट पूर्णपणे वर्ज्य केलं पाहिजे. तसेच रोज उत्तम गुणवत्ता असलेली सात ते आठ तासांची झोपही घेतली पाहिजे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

कोणते योगासन कानांसाठी योग्य आहे जाणून घ्या

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments