अनेकांना पायाच्या तळव्याची आग होत असल्याचा अनुभव होतो. या समस्येवर काही घरगुती उपाय करता येतात.
चंदनाच्या पावडरमध्ये गुलाबपाणी टाकावे आणि हा लेप तळपायाला लावावा. असे केल्याने तळपायाची आग होणे थांबते.
रात्री झोपण्यापूर्वी मलईमध्ये लिंबाचा रस टाकावा आणि त्याने आपल्या तळव्यांना मालीश करावे. सकाळी तो पाय धुवून टाकावा. पायाच्या तळव्यावर ऑलिव्ह तेलाने मसाज केल्यानेही तळव्याची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्याचबरोबर कारल्याचा रस पायाला लावल्यानेही आराम मिळतो. कारल्याच्या रसामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
तळव्याला तूप लावण्यानेही आराम मिळतो.
तिळाच्या तेलाने पायाला आणि तळव्यांना मालीश करावी. मालीश केल्यानंतर कोमट पाण्याने पायाला शेक द्यावा.
देशी तुपात मीठ घालून त्या मिश्रणाद्वारे तळव्याला मसाज केल्यानेही आराम मिळतो. तसेच पायाला भेगा पडत नाहीत.
तळपायाची आग होत असेल तर बॉटल मसाज थेरपीद्वारे उपचार केले जातात. त्याकरिता प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये 30 टक्के एवढे पाणी भरा. ही बाटली फ्रिजरमध्ये ठेवून द्या. बाटलीमध्ये बर्फ तयार झाल्यानंतर ती बाहेर काढा. बाटलीबाहेर जमा झालेले पाणी पुसून काढा. ही बाटली कोरड्या टॉवेलवर अथवा कोरड्या कपड्यावर ठेवा. खुर्चीवर बसून पायाच्या तळव्याच्या मधल्या भागावर ही बाटली ठेवा. आणि ही बाटली आपल्या तळव्यानेच पुढेमागे करा. असे केल्याने तळव्यात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो आणि तळव्यातील पेशींना हलका मसाज होतो. दहा ते पंधरा मिनिटे हा प्रयोग करा. त्यासाठी आपल्याला कोणाचीही मदत लागत नाही. आपण एकट्यानेच हा प्रयोग करू शकतो.