Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निसर्गकवयित्री सावित्रीबाई

निसर्गकवयित्री सावित्रीबाई
आपल्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका, आद्य समाजसुधारक क्रांतिजेती सावित्रीबाई फुले यांचं 'कविमन' त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून दिसून येतं. कमीतकमी शब्दात जास्तीजास्त सांगण्याची  किमया कवितेतून साधता येते.
 
विविध विषयांवरच्या अनेक कविता सावित्रीबाईंनी लिहिलेल्या आहेत. पहिला काव्यसंग्रह 'काव्यफुले' 1854 मध्ये आणि दुसरा 'बावन्नकशी सुबोध रत्नाकर' 1891 साली प्रसिद्ध झाला. याशिवाय सावित्रीबाईंनी अनेक लेखही लिहिले आहेत.
 
काव्यफुले आणि बावन्नकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहात सामाजिक, निसर्गविषयक, ऐतिहासिक विषयांवर स्फुट रचना दिसून येते. या दोनही काव्यसंग्रहात एकूण 47 कवितांचा संग्रह आहे.
 
सावित्रीबाईंच्या निसर्गविषयक अनेक कविता आहेत. विविध संकेतस्थळांच्या अभ्यासानंतर 'पिवळा चाफा', 'जाईचे फूल', 'जाईची कळी', 'गुलाबाचे फूल', 'फुलपाखरू', 'फुलाची कळी' या कवितांचा समावेश असल्याचे आढळले. या त्यांच्या कवितेतून त्यांनी निसर्गचक्र आणि मानवी संबंध अनेक ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत.
पिवळा चाफा नेत्र नासिका
रसिक मनाला तृप्त करुनि मरून पडतो..
पिवळ्याधमक चाफ्याचं सुंदर वर्णन करताना रसिक मनाला तृप्त करून तो कोमजून जातो हे वास्तव या कवितेमध्ये वर्णिले आहे. प्रत्येकाला 'परतीच्या वाटेवर' जायचे आहे, मिळालेल्या आयुष्याचं आपल्या विधायक कार्यातून सोनं करणं आवश्यक आहे, हा संदेश या कवितेतून मिळतो.
फूल जाईचे पहात असता
ते मज पाही मुरका घेऊन
'जाईचे फूल' या कवितेमधल्या वरील ओळी म्हणजे जाईचं फूल आणि सावित्रीबाईंचा मूक संवाद स्पष्ट करतात. निसर्गाशी संवाद साधणार संवेदनशील कवयित्री सावित्रीबाईंची ही काव्यसंपदा मनाला भावून जाते. याच कवितेमधल्या यानंतरच्या ओळी तितक्याच प्रभावीपणे जगाची रीतही सांगून जातात...
रीत जगाची कार्य झाल्यावर  
फेकून देई मजला हुंगून..
'मानव व सृष्टी' व 'मातीची ओवी' या दोनही कवितांमधून निसर्गाचं सुंदर वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 'मातीची ओवी' कवितेचं हे शीर्षकच आपल्याला खूप काही सांगणारं आहे, निसर्गाचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे. 
धरतीची माती, रंगीबेरंगी ती
 काळी पांढरी, ती शिवारात
काळसर माती, पीकपाणी देती
 फळे फुले शोभती शिवारात...
या कवितेमधून निसर्गातल्या विविध घडामोडी, धरती, माती, पीकपाणी, पाऊसपाणी, शिवार, पाने, फळे आणि फुले या घटकांचा आणि त्यांचे मानवी जीवनाशी असलेले नाते स्पष्ट होते.
 
'मानव आणि सृष्टी' या निसर्ग कवितेत त्या म्हणतात,
झिमझिम येई पाऊस, बहरली सृष्टीसारी
फळाफुलांचा, वेलबुट्टीचा, नेसते शालू भारी
सातारा येथील नायगाव या निसर्गरम्य गावामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. आपल्या गावावर त्यांनी 
'माझी जन्मभूती' ही कविता लिहिलेली आहे. त्या कवितेतल्या काही सुरेख ओळी ...
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी
विहिरीवर फळे फुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती, मनोहर फिरती फुलपाखरे ।
ऐसा निसर्ग तिथे वावरे...
सावित्रीबाईंच्या कवितांची शीर्षके मनाला खूपच भावणारी आहेत. मातीची ओवी, बळीचे स्तोत्र या दोन कवितांच्या शीर्षकातून कवितेची आणि कवयित्रीची व्यापक दृष्टी दिसून येते.

अरविंद म्हेत्रे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यशस्वी महिला सुधा मूर्ती यांचे विचार