पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स , चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो
वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो
चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो
हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो
पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो
बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो
पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो
दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो
सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो
इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली
मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले
आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही.?? म्हणून विचारू लागलो
साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली
अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली
मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो
फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना
स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...