ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो.
फुले घेताना ती 'माझी' असतात. पण देवाला वाहिली की 'त्याची' होतात...... किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो..... 'ज्याचे होते त्याला दिले' ... फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो.......
त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.
अगदी तसेच, आपली दु:खे 'त्याच्या' चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे....त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही........
आतापर्यंत जी 'माझी' दु:खे होती. ती आता 'त्याची' झाली. त्यांचा कसला विचार करायचा.....
आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.
शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात.... म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.
आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात.....
तशी मनाची साफ-सफाई करु.... आणि तिथे आनंद पेरुया. तो शतपटीने उगवून येतो.... त्याची जोपासना करु..... त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच .....
दु:ख सोडून दयावे, निर्माल्य बनून जाते.
आनंद पेरत जावा,समाधान बनून रहाते.
-सोशल मीडिया