Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोन्यात झोपली सतार, सरला रंग

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2024 (06:30 IST)
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली
 
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी
 
हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
 
साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"
 
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा
 
मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा
 
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली
 
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'
 
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!
 
राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?
 
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला
 
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे
 
कवी : ग. दि. माडगूळकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न

आपल्या शरीरासाठी प्रोटीन किती महत्वाचे आहे की नाही?

जर तुम्ही पहिल्यांदाच केसांना रंग देणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो का? ही कारणे असू शकतात

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

पुढील लेख
Show comments